कै. अण्णासाहेब शिंदे चरित्र व कार्य
पुण्यानगरीस ललामभूत असलेले एक सन्माननीय नागरिक श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांना तारीख २ रोजी अर्धांगाच्या विकाराने देवाज्ञा झाली. कै. शिंदे यांचा जन्म १८७३ मध्ये झाला बालपण जमखंडी संस्थानात गेल्यामुळे तेथील हायस्कुलातच मॅट्रिकपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. कै. अण्णासाहेब हे जात्याच बुद्धिमान असल्याने त्यांनी शिष्यवृत्तीच्या जोरावरच फर्ग्युसन कॉलेजातील उच्च शिक्षणाची पायरी गाठून ते पूर्ण केले. व पुढे वकिली करण्याच्या उद्देशाने एल एल. बी. चा अभ्यास चालविला. फर्स्ट एल एल. बी. ची परीक्षा झाल्यावर त्यांचा ओढा प्रार्थना समाजाकडे वळला व ते त्या संस्थेचे एक प्रचारकही झाले. पुढे याच कार्यासाठी ‘युनिटेरियन’ शिष्यवृत्ती त्यांना मिळाली व १९०१ साली ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात तुलनात्मक कार्याचे अध्ययन करण्यासाठी ते तिकडे गेले. ऑक्सफर्ड येथे जाण्याच्या अगोदर त्यांनी लोकमान्यांची भेट घेऊन त्यांस आपला बेतही कळविला होता. लोकमान्यांनी त्यांना कसे प्रोत्साहन दिले ही गोष्ट कै. अण्णासाहेबांनी आपल्या आठवणीत दिली आहे. श्री. सदाशिवराव बापट यांनी संपादित केलेल्या आठवणीच्या द्वितीय खंडात कै. अण्णासाहेब यांनी दिलेल्या या आठवणी प्रसिद्ध झाल्या आहेत. (पृ. २००) त्यांत राष्ट्रीय वृत्तीत मुरलेले कै. शिंदे व लोकमान्य यांचे मन एकमेकासंबंधी व परस्पर कार्यासंबंधी कसे होते याची साक्ष उत्कटत्वाने नजरेस येते. १९०३ साली लिव्हरपूल येथे भरलेल्या त्रैवार्षिक युनिटेरियन परिषदेस ते हजर होते. त्यावेळी त्यांनी ‘लिबरल रिलिजन इन इंडिया-’ हा प्रबंध तेथे वाचला होता. तेथून परत आल्यावर प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी त्याने आसेतु हिमाचल प्रवास केला व १९०६ साली ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ ची स्थापना करून आपले सामाजिक ऋण फेडले. याच कामाची धुरा वहात असताना ते भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळाचे काही काल चिटणीस होते. त्यांचा राष्ट्रीय चळवळीकडेही विशेष ओढा असल्यामुळे त्यांनी १९३० साली राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतला व त्यात ६ महिन्यांची त्यांना कारावासाची शिक्षा झाली होती. अलीकडे ब-याच वर्षांपासून त्यांना अर्धांगाचा विकार जडल्यामुळे त्यांनी मिशनचे कामही हातावेगळे करून ते दुस-याकडे सोपविले होते. कै. शिंदे यांनी आपले जीवनध्येय कोणत्या रीतीने आचरणात आणले हे त्यांनी लिहिलेल्या स्वत:च्या चरित्रावरून सहज लक्षात येईल. कै. शिंदे यांचा भाषा शास्त्राचा अभ्यास चांगलाच होता. अस्पृश्य समाजाच्या उन्नत्तीसाठी त्यांना अहर्निश चिंता असल्याने त्यांनी आपले विचार प्रसिद्ध केले आहेत. कै. शिंदे यांच्या निधनाने महाराष्ट्र समाजाची मोटी हानी झाली ही गोष्ट कोणासही नाकबूल करता यावयाची नाही. याची उत्तम साक्ष त्यांच्या पार्थिव देहास अग्नी देताना जी भाषणे झाली, त्यावरून प्रत्ययास येईल. कै. शिंदे यांच्या निधनाने पुण्यपत्तनातील एक थोर पुरूष नाहीसा झाला.