जनातून वनात आणि परत
इंग्लंडच्या उत्तरभागी कंबर्लंडशायरमध्ये सरोवर प्रांत (Lake District) नावाचा प्रदेश आहे. उंच पहाड, विस्तृत सरोवरे, दाट वनराजी इ. बहुविधा सृष्टिसुंदरी तेथे नटली आहे. तशात वर्डस्वर्थ, कोलरिज्, साउदे इ. प्रासादिक कवींच्या सहवासाने हे शांतिस्थळ अधिकच पवित्र झाले आहे. उष्णकाळी इंग्लंडचे किंबहुना सा-या सुधारलेल्या जगाचे हे एक हवा खाण्याचे ठिकाण आहे. गेल्या उन्हाळ्याच्या सुटीत प्रो. कार्पेंटर साहेबांनी आमच्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांस आपल्याबरोबर आपल्या कुटुंबात पंधरा-पंधरा दिवस सदर ठिकाणी रहावयास बोलाविले होते. कॉलेजातील व्याख्यानपीठातून व मंदिरातील व्यासपीठातून दिलेल्या ईश्वरविषयक ज्ञानाची पुरवणी वरील उदात्त स्थळी प्रकटलेले स्वरूप प्रत्यक्ष दाखवून करून देण्याचाच जणू ह्या गुरूवर्यांचा हेतू होता.
गेल्या जुलैत मी तिकडे ऑक्सफर्डहून निघालो. पुढे मिळणारा धडा मनावर नीट बिंबावा म्हणूनच की काय वाटेत निराळाच अनुभव आला. आमची गाडी लांब पल्ल्याची असल्या कारणाने ती एक्स्प्रेस होती. वाटेत बर्मिंगहॅम पासून तो लँकेस्टरपर्यंत अगदी निराळा मुलूख लागला. इंग्रजाने बहुतेक सगळ्या जगाचे कंत्राट आपल्याकडे घेतले आहे. म्हणून अर्थात एवढा प्रदेश म्हणजे जगाची एक मोठी वखारच! बर्मिगहॅम, स्टॅफर्ड, शेफिल्ड, मॅचेस्टर अशी अचाट घडामोडीची शहरे आणि त्यांच्या दरम्यान इतर कारखान्यांची गावे ह्यांची कशी येथे खेचाखेची झाली आहे. दाट जंगलातून एकादी चेतलेली वाघीण जशी सुटावी तशी आमची एक्स्प्रेस हजारो जीवांना घेऊन, अशा दाट वस्तीतून लांब लांब झापा टाकीत सुटली. स्टॅफर्डहून लॅकेस्टरपर्यंत सुमारे दीडशे मैलांचा पल्ला तर तिने एकाच उडीसरशी मारला. त्यास पुरे दोन तासही लागले नाहीत.
लहान वस्तु ती स्थूल विसली| तुटकी वाटे कुणी जुडली|
सहज कुटिला सरला झाली| जवळी न बाजुस अथवा आता|
दूर न मज काही||१||
असे झाल्याने मी दुष्यंत राजाच्याच रथात बसलो आहेसे वाटू लागले. शहरे, खेडी, नद्या, नाले इ. आमच्या पायाखालून पार निघून जात. अशा वेगाने आम्ही जात असता समोरून एकादी अशीच राक्षसी आमच्या अंगावर एक मोठा फुत्कार टाकून बिजलीसारखी चमकून जाई! वाटेने मोठी स्टेशने आली म्हणजे आमच्यापुढे रूळांच्या जाळ्याचा गुंता पसरलेला दिसे, पण त्यातूनही ही नेमकी निसटून पार होई!
बाहेर धुराने व धुळीने दिशा धुंद झाल्या होत्या. मांडीवरच्या वर्तमानपत्रावर दोन चार मिनिटांतच कोळशाची भुकटी साचे. छाती करून बाहेर डोकावल्यास चहूकडे नुसती गिरण्यांची धुराडी व त्यांतून निघणारे धुरांचे कल्लोळच दिसत. घरे, देवळे, झाडे व रस्ते ही सर्व सारखीच काळवंडून गेली होती. म्हणून त्या प्रदेशास ब्लॅक कंट्री म्हणजे काळा देश असे नाव आहे. अशा वातावरणात अष्टौप्रहर राहून निर्जीव यंत्राप्रमाणे झीज सोसणा-या हतभागी मजुरांची काय दशा असेल! आमच्या कवीनी नुसत्या कल्पनेनेच भवचक्राची चित्रे काढली आहेत. येथे मात्र ते चक्र प्रत्यक्ष भ्रमत असलेले दिसत आहे! प्रगतीची ही काळी खरबरीत बाजू पाहून माझ्या तोंडातून आपोआपच हे उद्गार निघाले:
“अहागे सुधारणे! तू दिवाणखान्यात येताना कशी नटून येतेस! तुझ्या पदरावर माशी देखील बसलेली खपत नाही. तुझा नाजूक बांधा, कोमल गात्रे, उंची पोषाक व जडजवाहीर पाहून आम्हा पौरस्त्यास कितीही कौतुक केले तरी पुरेसे होत नाही! पण हे गे काय तुझे एथळे स्वरूप! किती हे तुझे कष्ट, कोण ह्या घामाच्या धारा आणि हे हातापायाला घट्टे! येथे तुला नुसते श्वासोच्छवास करण्यालाही वेळ मिळेना. तीच तू मंडळीत बसलीस म्हणजे काय काय ढंग करतेस! येथे तुला नुसती मोकळी हवाही मिळत नाही. दुसरीकडे काय तुझ्या क्रीडा, करमणुकी, चैनीचे प्रवास, रूचीच्या आलटापालटी! नाही आम्हांला हे तुझे बहुरूपी प्रकार कळत. कार्यालयातून क्रीडालयात व क्रीडालयातून पुन: अशा कार्यालयात जाणारी जर तूच असशील तर असे वेश पालटण्यात तला किती शरम वाटत असेल? हाल आणि श्रमाची तर गोष्ट राहू दे. जगात राहण्याची कला आपल्यास चांगली साधली आहे, असे तू किती वेळां तरी म्हणतेस, पण नाही सुधारणे! तुलादेखील अद्यापि पुष्कळ सुधारले पाहिजे आहे. ते कसे ते सांगण्याची आमच्यातही शक्ती नाही, तोवर तुला तरी नावे ठेवून काय फळ! तरी दिसला तो प्रकार कळविण्याचे तूर्त आमचे काम आहे.”
ज्या सुधारणेने आपल्यावर इतके जब्बर मोहिनी-अस्त्र टाकिले आहे तिची अशी कोणती व किती व्यंगे दिसली की मी तिला इतके टाकून व टोचून बोललो? मी तर अग्नीरथातून वा-याच्या वेगाने चाललो होतो. पण तशातच ह्या सुंदरीचे कृष्ण आणि कठोर स्वरूप असे दिसून आले की वरील उद्गार मला नकळतच निघाले! एकाद्या भयंकर स्वप्नाचा काळ फार तर एक दोन पळेच असतो, पण तेवढ्यात कितीतरी स्थितींचा आपल्यास अनुभव येतो! इतकेच नव्हे तर जागे झाल्यावरही त्याचा परिणाम मनावर घडत असतोच! ह्याचे कारण हे की स्वप्नातले देखावे आपण जागृतीत आधीच निरनिराळ्या वेळी पाहिलेले असतात. फक्त त्यांचे एकीकरण मात्र मनाच्या केंद्रस्थानी एक-दोन क्षणांतच झाल्याने आपली अशी कासाविशी होते. अशातलाच काहीसा प्रकार ह्यावेळी माझा झाला. दम न घेता सारखा दोन तास धावत होतो तरी खिडकीतून बाहेर मोकळा प्रदेश असा फार वेळ पहावयाला सापडेना. व्यापाराची घडामोड व उद्योगाची धडपड किती लगट केली तरी मागे राहीनात. एकादे पटांगण नजरेस पडल्यास त्यात धुरकट व दमट हवेत आणि कोळशाच्या राखेत कंगाल पोरे बागडत आहेत असे दिसावे! घरे पहावीत तर कबुतराच्या खुराड्यासारखी रांगेत नेमकी बसविलेली. सोय आणि सांती ह्यांमुळे माणसे इतकी सवंगली आहेत की बिचा-यांस राहता भुई पुरेना. काही हौसेने, काही केवळ निरूपायाने ती अशी दिवसेदिवस अधिकाधिक गर्दी करून राहत आहेत. एकाद्या आधुनिक मोठ्या शहरात सावकाशपणे हिंडू लागल्यास त्यातील मातबर चौक, उपवने, संग्रहालये, चित्रालये इत्यादी मोहक स्थळे नजरेस येतात आणि त्या झुरक्यासरशी शहरातील इतर ठिकाणच्या नानाविध यातनांचा विसर पडतो हे खरे. पण त्याच शहराकडे असे विहंगम दृष्ट्या पाहू गेल्यास त्याचे रूप तितके मोहक दिसत नाही. ह्यावरून मला असे वाटू लागले की,काही गोष्टी सावकाश पाहिल्याशिवाय कळत नाहीत; तर काही झटक्यासरशी पाहिल्याशिवाय कळत नाहीत. असो! अशा रीतीने मी पेनरिथ स्टेशनावर येऊन पोहोचलो. येथे दगदगीचे जग संपले आणि पुढे निराळेच जग दिसू लागले.
जन आणि वन
जगाचे दोन भाग आहेत. एक जन, दुसरे वन. ह्यासच आधुनिक शास्त्रीय नावे द्यावयाची झाल्यास एकास नीती व दुस-यास निसर्ग असे म्हणता येईल. निसर्गात नीतीचा अत्यंताभाव आहे असे नाही. उलट स्वत: नीतीचा कोणताही प्रदेश निसर्गाच्या बाहेर आहे असेही नाही. निसर्गाच्या विराट मंडळात नीतीचा लहान गोल पोकळीतल्या परमाणूप्रमाणे तरंगत आहे! हाच विषय दुस-या बाजूने निराळा दिसतो. नीतीचे अधिष्ठान मन. निसर्घाचे मूळ प्रकृती. प्रकृतीत मन मुळीच मावण्यासारखे नाही. उलट प्रकृती किती जरी अनंत भासली तरी मन तिला क्षणार्धात गिळून बसते. पण गिळते म्हणून त्यास कळते थोडेच! मन आणि माया, नीती आणि निसर्ग अथवा जन आणि वन ह्या द्वंद्वांचे परस्पर नाते काय आहे, ते कोण सांगू शकेल? ह्या द्वंद्वांचे मूळ जी महावस्तू तिचे केवळ स्वरूप कोठे दिसेल! ‘नकळे महीमा वेद मौनावले जेथे पांगुळले मन पवन’ ते ह्याच ठिकाणी! महंतांनी जर प्रांजलपणे ही कबुली दिली आहे तर आमच्यासारख्या लहानांनी काय विचक्षणा करावी! असा प्रकार असून आम्ही प्रसंगी दुस-याचे शब्द उसने घेऊन ज्ञानाची कितीतरी प्रौढी मिरवितो! वासनेचा थोडा कोठे हिसका बसला की तीनदा उलथून पडतो, तरी पुन: उठल्यावर ‘अहं ब्रह्माSस्मि’ म्हणावयाला आहेच तयार!
प्रयत्नशाली जे महावीर आहेत ते जनात राहून सुधारणा साधोत. ज्ञानशाली जे महायोगी आहेत ते वनात राहून सत्य शोधोत. विषय हेच ज्यांचे सुख ते विषयाची खटपट करोत. वाद हेच ज्यांचे ज्ञान ते वादाची घटपट करोत. मध्यंतर आम्ही साधारण माणसे विश्रांतीसाठी व उपासनेसाठी काही काळ जनातून वनात जाऊ या!
पेनरिथपासून केसिकपर्यंत सरोवर प्रांतात जाण्यास सुमारे १८ मैल आगगाडीचा एक फाटा आहे. पेनरिथ सोडल्यापासून नीतीचा गोंधळ मागे दूरदूर राहू लागला आणि निसर्गाचा सोहळा पुढे जवळजवळ येऊ लागला. दोहोंबाजूस उंच उंच पर्वत हिरव्या गवताच्या झुली पांघरून हत्तीप्रमाणे तटस्थ उभे राहिलेले आणि गंभीर दिसू लागले. अस्तास जाणा-या सूर्याची शेवटची किरणे त्यांवर रेंगाळत होती. समुद्रावरील ताजा आणि मंद वारा आणि रानातील झाडपाल्याचा वास काळ्या प्रदेशातून नुकतेच बाहेर पडलेल्या प्रवाशांस सुखवू लागले. केसिक येथे पोहोचल्यावर सुधारणेची शेवटची खूण जी आगगाडी तिलाही निरोप दिला. माहेरी आल्यावर सासरच्या गड्यास निरोप देताना कितीसे वाईट वाटते हे प्रत्येक सासुरवासिणीस माहीत आहेच.
स्टेशनावर आम्ही तिघे विद्यार्थी उतरलो. आम्ही येण्याची वेळ जरी कळविली नव्हती तरी आमचे प्रोफेसरसाहेब व आमच्या पूर्वीचे आलेले एक विद्यार्थी आम्हांस घरी नेण्याकरिता तेथे वाट पहात उभे होतेच. ऑक्सफर्ड विद्यालयात नेहमी विद्याव्यासंगात पाहिलेल्या प्रोफेसरसाहेबांची मूर्ती येथे किती निराळी दिसली! अंगात पहाडी सडा पोषाक, हातात रानटी काठी, खांद्यावरून आडवी जानव्यासारखी सोडलेली कातड्याच्या वादीस लटकलेली लहानशी दुर्बिणीची थैली, गालावर हासे, तोंडात माहितीचा पुरवठा (खिशातले गाईडबुक जणू पाठच केलेले) भाषणात विनोद, वतनात तत्परता, असे गुरूचे चालते बोलते चित्र पाहून आम्ही वाटेचे सर्व क्लेष केव्हाच विसरून गेलो. बॉरोडेल-दरीत लीथस कॉटेज हे आमचे ठिकाण येथून चार मैल होते. आमचे सर्व सामान घरी रवाना केल्यावर, डरवेंट वॉटर सरोवरावरून बोटीतून लिथस् कॉटेजला जाण्यास निघालो.
गाडीतून उतरल्याबरोबर बदललेल्या परिस्थितीत व बदललेल्या पेहरावात आपल्या गुरूस पाहून आम्ही आमचे श्रम विसरलो असे वर सांगितले, पण स्टेशनातून बाहेर येऊन सभोवती पाहतो तो गुरूंचा गुरू जो परमेश्वर त्यानेतर ह्या ठिकाणी आपला पेहराव अधिकच बदललेला पाहून आम्ही श्रमच काय पण स्वत:लाही हळूहळू विसरू लागलो. डरवेंट वॉटर सरोवर केसिक गावाला अगदी येऊन भिडले आहे. प्रोफेसर, सगळे विद्यार्थी आणि एक युनिटेरियन् आचार्य इतकेजण आम्ही एका क्रीडानौकेत बसून निघालो! सूर्यास्त होऊन गोड संधिप्रकाश पडला होता. अशा शांत समयी देव कसा दिसला! ज्याने जन निर्माण केले त्यानेच वनही केले आहे. जो समाजात वसत आहे, तोच सृष्टीतही वसत आहे. असे असता दर्शनात किती तरी हा फरक! तिकडे समाजात तो स्वरूपाने प्रकटतो. पण ते सत्त्वदर्शन कित्येकास होते? आणि ज्या थोड्यास होते ते तरी कितीदा होते? आणि जे होते ते तरी किती कष्टाने, किती अनुतापाने आणि किती आत्मदंडाने आणि इतक्याही सायासाने एकदा कृपा झाली तर ती टिकते किती वेळ! तुकोबा सांगतात की, ‘आठवचि पुरे| सुख अवघे मोहोरे’ पण ह्या आठवेच्या मार्गातच अगणित अडथळे घडलेलेही पुन्हा त्यांनीच वर्णिले आहे की, ‘कामक्रोध आड पडले पर्वत| राहिला अनंत पलीकडे’ तेव्हा जन म्हणजे अशा अडथळ्यांचा डोंगराळ प्रदेश ह्यात आधीच अदृश्य असे जे सत्त्वरूप त्याचे दर्शन होणे अति कठीण. पण येथे पहा, तोच देव कसा सुंदर रूपाने प्रकटला आहे. आठवण करण्याचेही श्रम नकोत. डोळे उघडले की पुरे, सुख अवघे मोहोरे! समाजात जो इतका दुर्लभ तो येथे किती तरी सुलभ झाला आहे. समाजात जो दुर्मिळ, त्याचा सृष्टीत हा कोण सुकाळ! शास्त्रकारास आणि स्मृतिकारास जो तेथे सहसा लाभत नाही, तो येथे पशुपक्षांस भेट देऊन रमवीत आहे! येथे येण्याचाच अवकाश की ताबडतोब भेट व लगेच सलगीदेखील! पश्चात्ताप नाही, प्रायश्चित्त नाही, इंद्रियदमन नको, देहदंडन नको, पापाची आठवणच नाही. मग क्षमेची गोष्ट कशाला! पुनर्जन्मच हा!!
समाजात सुख आहे, ऐश्वर्य आहे, प्रीती आहे, प्रगती आहे, पण तेथे पुष्कळ अंशी ह्या गोष्टी असतात. आम्ही बसलो आहो ही नाव जर पुढे न्यावयाची झाली तर आधी वल्ह्यांनी पाणी मागे ढकलले पाहिजे. आणि हाच प्रकार सर्वदा नाही तरी पुष्कळदा समाजात चालला असतो. माझे धन ते दुस-याचे ऋण, माझा आराम तो दुस-याचे कष्ट, गर्दीतून माझे पाऊल पुढे पडावे म्हणून मी इतरांस मागे रेटीत असतो. असा प्रकार असल्यामुळे समाजात शुद्ध सुख मिळणे फार कठीण होते. तेथे इतर आत्म्यामध्ये परमात्म्याचे जे प्रतिबिंब दिसते ते स्थानमानाने थोडे बहुत अशुद्धच असते. पण सृष्टीतला प्रकार वेगळा. येथे आपण व परमात्मा ह्यांमध्ये इतर कोणी येत नाही म्हणून एथली सर्व सुखे निर्भेळ असतात, निश्चित असतात, निरालंब असतात!
असो. आम्ही पाळीपाळीने दोघे दोघे वल्हवीत, भोवतालची शोभा पहात, मधूनमधून विनोद करीत, प्रसंगानुसार ह्या प्रदेशाची प्रोफेसरांच्या तोंडून चटकदार माहिती ऐकत निघालो. ह्या विस्तीर्ण सरोवराचे पाणी इतके स्वच्छ आणि शांत होते की एक मोठा आरसाच पसरलेला! केसिक गाव लवकरच वळणात लपून गेल्यावर आसमंतात कोठेही जीवांची हालचाल दिसेना. आमच्या बोटीभोवती लाटांची काय ती थोडी हालचाल होती तेवढीच. सर्वत्र एकच निर्विकल्प समाधी लागली होती. एका बाजूस सुमारे एक हजार फुटांचा एकदम तुटलेला काळाकुट्ट कडा किना-यावर तोल सांभाळून तटस्थ उभा होता. दुस-या बाजूस हळूहळू उंच उंच होत
जाणा-या पर्वतसपाटीवर दाट गवताचा हिरवा गालिचा पसरला होता. पुढे पुढे ह दोहोंकडचे डोंगर अगदीच जवळ येऊन सरोवरास कवटाळू लागले. अखेरीस सरोवर संपले व आम्ही दरवेंट नदीच्या पात्रात शिरून तसेच बॉरोडेल नावाच्या रमणीय दरीतून वर वर जाऊ लागलो. नागिणीसारखी नदी वरचेवर वळसे मारू लागली. येथे सौंदर्याची तर अगदी सीमा झाली आणि सृष्टिसुंदरीचा गर्व तिच्या पोटात मावेना असे उघड दिसू लागले. किना-यावरील झाडे, लता आणि पर्वत ह्यांच्या प्रतिबिंबाची तर काय बहार! कुलस्त्री एकांतात असताना आरशात आपले रूप पाहून आपल्यासच धन्य मानीत असलेली दिसल्यास कोणास बरे परमावधीची धन्यता वाटणार नाही! आमची नौका पुढे नेऊन ह्या तरूणीचा रसभंग करण्याचे आम्हांला जीवावर आले! आम्ही आता अगदी लीथस् कॉटेजच्याजवळ पोहोचलो. नौका एका झाडाच्या मुळाशी बांधून किना-यावर पाय ठेवितो तोच मिसेस कार्पेंटरबाईनी झोपडीच्या खिडकीतून बाहेर डोकाविले आणि आपला हातरूमाल हालवून मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले!
बॉरोडेलमधील प्रार्थना व भेट
लीथस् कॉटेजच्या वन्य कुटिकेत आमचे जे पुढील पंधरा दिवस अति सुखाचे गेले त्याची गोड सूचना, गुरूपत्नीने वर सांगितल्याप्रमाणे प्रथमदर्शनी दुरूनच जे स्वागत केले त्यात मिळाली होती.
इंग्लिश सरोवर-प्रांत हे एक सा-या युरोपात पाहण्यासारखे स्थळ आहे आणि त्यात डरवेंटवॉटर हे सुंदर सरोवर व त्याच्या काठचे बॉरोडेल नावाचे खोरे ही तर एकाद्याला अगदी वेड लावून टाकतात. म्हणूनच मागे ह्या ठिकाणी मोठमोठे राष्ट्रीय कवी व लेखक संसार अगदी विसरून भृगासारखे गुंगत राहिले, व आता तर युरोप आणि अमेरिकेहूनही रसिकांच्या झुंडीच्या झुंडी येथे येतात! प्रख्यात सौंदर्यवादी जॉन रस्किन हा जेव्हा अगदी लहान होता तेव्हा दाईने त्यास एकदा ह्या सरोवराच्या काठी फ्रायर्स क्रॅग नावाच्या लहानशा खडकावर आणिले, त्यावेळी त्या मुलाच्या अति कोवळ्या व ग्रहणशील मनावर निसर्गाने येथे असा कायमचा छाप मारिला की, ही त्याची प्रथम भेट रस्किन मरेतोपर्यंत वारंवार उत्कंठेने आठवीत असे. आता ह्या खडकावरील झाडीत रस्किनच्या चहात्यांनी वरील भेटीच्या स्मारकार्थ एक सुंदर शिलालेख रोविला आहे!
आमच्या गुरूची कुटिका बॉरोडेल दरीच्या तोंडाशी, डरवेंट नदीच्याकाठी, डोंगराच्या बगलेत जेथून सर्व सरोवर नजरेत चांगले भरेल अशा नाक्यावर उभी आहे. त्यामुळे येता जाता, उठता बसता, कार्य करता, ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरीदेखील हो! सृष्टीचे प्रसन्न मुख आम्हांस सतत दिसत असे. जेवणाच्या पंगतीत बसलो असता एकाएकी दूर स्किडॉच्या शिखरावर सूर्यकिरणाची अपूर्व शोभा दिसे, दिवाणखान्यात क्रीडेत गुंगलो असता मध्येच सरोवरावर मेघधारा नाचू लागत तिकडे लक्ष जाई, खोलीत वाचीत बसलो असता भिंतीखालच्या नदीशी वायू अकस्मात धिंगाणा घाली, आणि पाहता पाहता गुलाम दरीतून शीळ घालीत पार निसटून जाई! ह्या प्रकारे सृष्टीबाला आमच्याशी अहोरात्र सलगी करी पण ती मोठ्याची कन्या म्हणून तिच्या प्रत्येक चेष्टेचे आम्हा सर्वांना उलट मोठे कौतुकच वाटे!
एके दिवशी संध्याकाळी जेवण आटोपल्यावर मी एका समानशील सोबत्याबरोबर बॉरोडेल दरीत शतपावलीस निघालो. अहा! ही शतपावली कधी तरी विसरणे शक्य आहे काय! ह्या डोंगरातील सडकही रूंद, प्रशस्त आणि धुतल्यासारखी स्वच्छ होती. दोहों बाजूस हजार हजार फुटांचे उंचवटे क्वचित अगदी अंगाला येऊन भिडत, क्वचित पुन्हा मागे हटत, त्यांवरून नाना जातींची झाडे पालवली होती, फुले फुलली होती, लता लोंबत होत्या, लोहाळे लगटले होते, भारतीय देखाव्यांची प्रमुख लक्षणे जी रंगीबेरंगी शोभा आणि परिमळाचा दर्प ती मात्र येथे नव्हती, तथापि सौंदर्यात उणीव भासत नव्हतीच. उजवीकडचा कडा सरळ तुटला होता. डावीकडे डरवेंट नदी खडकातून उतरत असता आपल्याशीच मंद स्वरात मंजुळ ओव्या गात होती. त्या स्वरास सृष्टि—राग म्हणतात असे माझ्या मित्राने सांगितले.
चहूकडे इतके निवांत की पातळ पानही लवत नव्हते. शांतीचे साम्राज्य जणू डोळ्यांनी निरखू लागलो. सुधारणेची कटके तिने येथून बारा कोस पळविली होती. सुधारणा, उद्धारणा वगैरे विचारांचा गवगवाही बंद पडला. बाह्य शांतीमुळे अंतरातील खोल शब्द अधिकाधिक स्पष्ट ऐकू येऊ लागले. ९|| वाजले होते तरी असा गोड संधिप्रकाश पडला होता की, वाचता सहज यावे. समोर कॅसल क्रॅगच्या निमुळत्या मनो-यावर दशमीचा चंद्र लोंबत होता. आम्ही दोघे संगतीने चललो होतो, तरी बोलक नव्हतो. स्वत: कौतुक करण्याचीही वेळ मागेच टळून गेली होती, मग संवादाला जागा कुठे राहिली! जसजसे पुढे जावे तसतशी दरी आकसू लागली. नकळतच सृष्टीने आम्हांला शेवटी अगदी अंत:पुरात नेले! तेथे जिवलग जनांचीही स्मृती उरली नाही. निकट विषयांचेदेखील भान उडाले. लौकिकातून नाहीसेच झालो!
असा कोण जादूवाला ह्या भरलेल्या अंत:पुरात होता की, ज्याने आमची अशी पाहता पाहता पराधीन अवस्था करून सोडली! वरती जो एकदा लय लागला तो खाली करण्याची काही शक्ती उरली नाही.
आनंद होत होता काय आम्हांला?
सांगवत नाही. काही वेळापूर्वी मात्र झाला होता खरा.
आम्ही काही पहात होतो काय?
नव्हतो! दिसत होते पण काहीतरी!
मागितले का काही?
छे हो! काय मागावयाचे?
जिवाला कसे होत होते?
मधूनमधून सुस्कारे बाहेर पडत होते!
ते का म्हणून?
कोणी सांगावे! काहीतरी आतून बाहेर निघत होते व काही बाहेरून आत शिरत होते-छे, मी काहीतरी वेड्यासारखे वर्णन करीत आहे.
एकूण हा प्रकार काय? आणि ते कोण?
“prayer is the burthen a sigh,
The falling of a tear,
The upward glancing of an eye,
When none but God is near.”
-(Montgomery)
(मुखी श्वास, आसवे गाळी| नेंत्री वरतीच न्याहाळी|
अशा या प्रार्थनेच्या काळी| जवळी तोचि एकला||१||)
कवीने हे वरील उद्गार कोणत्या वेळी काढले असतील ते असोत. मला तर आता असे कळून चुकले आहे की, वरील जो प्रकार घडला ती माझी प्रार्थना होती. आणि परमेश्वरावाचून जवळ कोणी नव्हते. एकूण प्रार्थनेचे काम इतके साधे व सोपे आहे काय? होय. कार्ळाइलही तेच सांगत आहे.
“Prayer is and always remains a native and deepest impulse of the soul…On the whole, silence* is the one safe form of prayer known to me in this poor, sordid era-though there are ejaculatory words too, which occasionally rise on one,with a felt propriety and variety.”
*ह्याचे भाषांतर तुकारामाच्या विचारात असे आले आहे:-
‘करावी ते पूजा मनेची उत्तम| लौकिकाचे काम काय तेथे’ ||१||
देवी! अशी प्रार्थना करावयाला व ही भेट घ्यावयाला सरोवर प्रांतापर्यंत येण्याचीच जरूरी आहे काय? नाही. जेथे कसली उपाधी नाही, अशा कोठल्याही उघड्या जागेत आणि मोकळ्या हवेतही उपासना घडण्यासारखी आहे. माणसांच्या गर्दीतही देवा तू भेटतोस. नाही कसे म्हणू! घरी आईची माया, बहिणीची प्रीती, पत्नीचा अनुराग, पुत्राचे वात्सल्य, समाजात शेजा-याची सहानुभूती, मित्रांचा स्नेह, राष्ट्रात देशभक्तांची कळकळ व संतांचा अनुग्रह आणि शेवटी जगतात महात्म्यांची निरपेक्ष अनुकंपा इत्यादी दर्शनेही तुझ्याशिवाय इतर कोणाची असू शकतील? जनात तुझा असा साक्षात्कार घडतो खरा, पण तो किती विरळा. उलटपक्षी किती कठीण अनुभव येतो! पण एथले तुझे रूप कसे अबाधित आणि अखंड आहे! हे वरचे आकाशाचे छत कधी फाटेल काय! हा खालचा सरोवराचा आरसा कधी फुटेल किंवा मळेल काय! ह्या पाखरांचे गळे कधी बसतील काय! हे पर्वताचे तट, हा वा-याचा पंखा, वृक्ष, वल्ली, दळ, पाषाण, पाणी, आकाशातील मेघ ह्यांवरूनही सर्वत्र ईश्वरा ‘तुझी कुशलधाम नामावली’ कशी सुवाच्य रेखाटली आहे! लहान बालके देखील ती वाचून आनंद पावतात! मग आम्ही का असे वारंवार विन्मुख व्हावे! हे कल्याणनिधान, आम्ही स्वत:भोवती जो क्षुद्र चिंतेचा गुंता निरंतर गोवीत असतो तो तूच करूणेने उकल, आणि आतासारखेच वेळोवेळी आपल्याकडे कृपाहस्ताने आम्हांला ओढून घे. आमच्या इच्छेनेच तुजकडे येण्याची आमची शक्ती नव्हे!
वगैरे वगैरे प्रार्थना देव भेटून गेल्यावर, उघडपणे करीत आम्ही परत कुटिकेत आलो.
वर्डस्वर्थ भेट आणि डव्ह कॉटेजची यात्रा
मूर्तिपूजक आणि सौंदर्योपासक असे जे प्रकृतीचे भक्त आहेत, त्यांचे हा सरोवर प्रांत म्हणजे एक मोठे क्षेत्रच आहे. ह्या क्षेत्रातील उपाध्यायाची कायमची नेमणूक वुइल्यस वर्डस्वर्थ ह्यजकडे आहे. ह्या कवीचा लौकिक-जीवनकाळ जरी १७७०-१८५० ह्या अवधीतच आटपला तरी ह्या क्षेत्रात उपाध्येपणाचा धंदा तो अद्यापि चालवीत आहे असे म्हणण्यास फारशी हरकत येणार नाही. ह्या प्रांती पदोपदी कोणातरी मोठ्या पुरूषाचे स्मारक पाहाण्यात येते अगर पुण्यकथा ऐकण्यात येतेच. झाडी, माळ, रस्ते, वाटा एकंदरीत सर्व वातावरणच ह्या पवित्र आत्म्यांनी गजबजून गेले आहे. ह्यामुळे येथे येणा-या परकीयांची, विशेषत: मजसारख्या पौरस्त्याची मोठी चमत्कारिक स्थिती होऊन जाते. मूळ देश पहावा तर तळहाताएवढा. भूगलातच नव्हे तर इतिहासातही, आकृती लहान पण हल्ली पराक्रम भूमंडळी मावेनासा झाला आहे. पराक्रम खोटा आहे, असे कोणीही समंजस मनुष्य म्हणत नाही. गुणांचा मक्ता काही ह्याच राष्ट्राला दिलेला नाही. ते सर्वात कमीजास्त आहेत. पण गुणांचे चीज, किंबहुना बोभाट देखील करण्याची इकडच्या लोकांना जी हातोटी साधली आहे ती पाहून निदान पौरस्त्याला तर फार फार कौतुक वाटल्यावाचून रहात नाही. मोठा पुरूष जन्मला की पुरे, तो सर्व राष्ट्राचे धन होऊन बसतो. त्याच्या पश्चात त्याचे स्मारक काय करू, कसे करू, असे सर्व राष्ट्राला होऊन जाते. मोठमोठ्या शहरांत जेथे माणसांची गर्दी फार तेथे स्मारकांचीही गर्दी जमलेली असते, हे सांगावयाला नकोच, पण अशा निर्जन व निवांत स्थळीदेखील कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने स्मारकेही पुढे येतातच. हे पाहून ह्या राष्ट्राची मोठी धन्यता वाटते. ह्यावरून पाहता वर्डस्वर्थला येथे जो आदर मिळत आहे तो त्याच्या थोरवीला मुळीच जास्त नाही. जास्त असो, कमी असो, जो मिळतो तो असा बिनबोभाट मिळत आहे की, एकांतप्रियता हा त्याचा मोठा गुण त्याच्या स्मारकात विशेषच खुलून दिसत आहे.
वर्डस्वर्थची कविता म्हणजे सायंकाळच्या चिंतनासारखी शुद्ध आणि उदात्त, गंभीर आणि प्रसन्न आहे. तिचे सेवन केल्याने मनाला क्षोभ होत नाही की माज येत नाही, किळस वाट नाही किंवा आळस वाटत नाही. ह्याची कृती म्हणजे खासगी अनुभवाची लहान लहान पद्ये, जणू रामबाण मात्रेच्या गोळ्याच! इतरांचे सूर नुसते कानांतच राहतात. पण ह्याच्या सुरांचे ठसे अंतरातल्या फोनोग्राफवर तात्काळ उठून पुन: कधी तसा बाह्य प्रसंग आल्यास ते आपोआप आत वाजू लागतात! फ्रेंच ग्रंथकार व्हॉल्टेअर म्हणतो की, ‘काव्यमध्ये नीतीचा उद्गार इंग्रजी कवींनी जितक्या जोराने केला आहे त्याहून जास्त इतर कोणीही केला नाही.’ आणि वर्डस्वर्थने अस्सल नीतीची जी कामगिरी बजावली आहे, तशी इतर कोणत्याही इंग्रज कवीने बजावलेली नाही. नीतीच नव्हे तर त्याच्या काव्यात धर्माचीही जिवंत आणि जागती ज्योत जळत आहे. त्याचे पद्य म्हणजे परमात्म्याचे परंपरया स्तोत्रच. परंपरया म्हटले म्हणून त्याची प्रत्यक्षता कमी असे मुळीच नव्हे, उलट अनेक रूढ धर्मात देवाच्या ज्या सहस्त्र नामावळीचा घोष चालू आहे, त्यावरूनही परमेश्वराचा संबंध इतक्या प्रत्यक्षपण जडण्याचा मुळी संभव नाही. वर्डस्वर्थची नीती आणि धर्म ही दोन्ही नवीन जन्मलेल्या बालकाच्या उल्हासासारखी ताजी आणि नेणती आहेत, आणि तितकीच तंतोतंत निकट प्रत्यक्ष आहेत! ह्याचे कारण हेच की, मुलाप्रमाणे वर्डस्वर्थनेही आपला सृष्टीशी अगदी अव्यभिचरित आणि अखंडित संबंध राखला होता. तो म्हणतो:
The World is too much with us,-late and soon;
Getting and spending,-we lay waste our powers;
Little we see in Nature that is ours;
We have given our hearts away,-a sordid boon.
ज्या फुलाजवळून आम्ही सहज न पाहता जाऊ त्यातच भ्रमर येऊन तासानुतास अडकून पडतो तीच स्थिती वर्डस्वर्थची होत होती हे त्याच्या खालील चरणावरून दिसते.
To me the meanest flower that blows
Can give thoughts that do often lie deep for tears.
असा हा सृष्टीचा भक्त आणि भोक्ता ईश्वराचे गुण डोळ्याने पाहून, तोंडाने गात मरेतोपर्यंत ह्याच प्रदेशात राहून गेला. बॉरोडेलहून सुमारे २५ मैलांवर डोंगराच्या कुशीत ग्रासमिअर नावाच्या सुंदर सरोवराच्या काठी ग्रासमिअर खेड्यात डव्हकॉटेज नावाच्या कुटिकेत वर्डस्वर्थ राहत असे ती पाहण्यास आम्ही एके दिवशी गेलो.
स्ट्रॅटफर्ड-ऑन-एव्हन ह्या गावी शेक्सपियरच्या स्मारकाचा जो भपका, थाटमाट आणि गोंगाट दिसला तशातला येथे मुळीच प्रकार नव्हता. एक झोपडी केवळ साधेपणाची आणि शांतीची मूर्तीच! दगडमातीचे हे माणसांनी बांधलेले घरकुल, पण भोवतालची सर्व भोवतालची सर्व सृष्टी त्याकडे कशी आदरपूर्वक पहात बसली होती. झोपडीच्या भिंती मजबूत पण ठेंगण्या होत्या. त्यांना आत बाहेर चुन्याची सफेती फासली होती. (हल्ली ह्या देशात अशा सफेत भिंतीत क्वचित एकाद्या जुन्या खेड्यात आढळतात). खपरेल अगदी खालपर्यंत येऊन नम्रता दाखवीत होते. इंग्लिश घराचे मुख्य लक्षण जे धुराडे ते तर फारच जुन्या चालीचे, त्यावर शेकडो हिवाळ्यांच्या खुणा दिसत होत्या. घराभोवती पुराणपद्धतीचे पण हल्ली दुरूस्त राखलेले वळणदार कंपौंड होते. त्यातून आत जाण्यास १८ व्या शतकातले फाटक होते. आम्ही प्रत्येक ६ आण्याचे तिकीट घेऊन आत गेलो.
आत गेल्यावर १०० वर्षांमागची इंग्रजी साधी रहाटी आणि उच्च विचार ह्यांचे दाखले खाली फरशीवर, बाजूस भिंतीवर, वरती पाटणीवर भरपूर दिसू लागले. कवी १८०२ मध्ये एकदा लंडनला गेला असता त्याचे असे उद्गार निघाले होते:-
... ... ... .... I am opprest
To think that now our life is only drest
For show mean handy work of craftman, cook
Org groom____we must run glitting like a brook
In the open sunshine or we are unblest,
Rapine avarice, expense,
१८०२ साली जर बिचा-याला ही स्थिती दिसली तर १९०२ साली परवा झालेला राज्याभिषेक समारंभ पाहून त्याला काय वाटले असते! ते काही असो. पण हा समारंभ आणि ही झोपडी दोन्ही एकाच देशात, एकाच काळी कशी असू शकतात, ह्याचे मला मोठे कोडे पडले. ही झोपडी पाहण्यास वर्डस्वर्थचे भक्त म्हणविणा-या हजारो खुशालचंदांची जी येथे गर्दी येते त्यांच्यात वर्डस्वर्थचा साधेपणा दशांशानेही नसतो, तरी ते ह्या झोपडीचे कौतुकच करीत असतात! तिचे फोटो घेतात, तिच्या प्रतिकृती बनवितात! कवीला लंडनातली मूर्तिपूजा सोसली नाही. मला तर ग्रासमिअरमधील मूर्तिपूजा अधिक दु:सह झाली! असो.
या खोपटीत कवी आणि त्याची जिवलग आणि चहाती बहीण डोरोथी अशी दोघेच रहात असत. तळमजल्यात काळ्या दगडाची फरशी होती; ती अगदी झिजली होती. ती पहात पहात आम्ही जेव्हा भिंतीतील मोठ्या व ओबडधोबड चुलीजवळ आलो, तेव्हा कवीच्या एकंदर रहाटीचे चित्र पुढे दिसू लागले. चुलीजवळ रिकाम्या चकाट्या पिटण्यात कधी आनंद होत नसे. तो म्हणतो:
Better than such discourse, doth silence long,
Long, barren silence, square with my desire,
To sit without emotion hope or aim,
In the loved presence of my cottage fire,
And listen to the flapping of the flame,
Or kettle wispering its faint under song.
वरच्या मजल्यात बसावयाच्या खोलीत कवीच्या काही वस्तू, चित्रे वगैरे दोन जड खुर्च्या आणि इतर काही सामान ठेविले आहे. निजावयाचे खोलीत त्याचे अंथरूण तसेच राखून ठेविले आहे. दुस-या एका खोलीत त्याच्या पुस्तकाच्या सर्व आवृत्ती व हस्तलिखिते तावदानात व्यवस्थेने मांडून ठेविली आहेत. काही महत्त्वाची हस्तलिखिते भिंतीवर काचेतून टांगली आहेत. त्याने जी सृष्टीतील निरनिराळ्या देखाव्यांवर गाणी (Sonnets) रचली आहेत, त्यांचे विषय हुबेहूब दाखविण्याकरिता काही वास्तविक व काही काल्पनिक फोटोग्राफ एका चौकटीत एकीकडे टांगले आहेत.
ही झोपडी डोंगराच्या अगदी पायथ्याशी चिकटलेली असल्यामुळे दुस-या मजल्यातून मागच्या बाजूने बाहेर पडले की आपण परसात येतो. हे परसू म्हणजे डोंगराची सरळ उतरणच आहे. बागेत सृष्टीवर कोठेही बलात्कार केल्याचे चिन्ह दिसत नाही, पण तिच्या संमतीने जी साफसफाई आणि वेणीफणी करावयाची तितकीच केली आहे. बागेतील आसने म्हणजे खडकातल्या पाय-या, झाडांच्या वाकलेल्या फांद्या वगैरे. आगंतुक जड एकच बाक जे ठेविले आहे त्याचीही भोवतालच्या परिस्थितीशी पूर्ण संगती आहे! हल्ली येथे कोणी राहत नाही, फक्त दाखविण्यासाठी एक दोन बाया मात्र असतात.
नंतर आम्ही ग्रासमिअर खेड्यातील देवळाच्या स्मशानभूमीतील कवींचे कबरस्थान पाहिले, ते तळ्याच्या अगदी काठालाच आहे. त्याचे आणि त्याच्या प्रिय बहिणीचे थडगे एकमेकाला चिकटून आहेत. दोन लांब चौकोनी भुईसपाट निराळ्या फरशा आणि त्याभोवती दाट हिरवे गवत ह्याशिवाय तेथे काही नाही. देवळाची इमारत किंचित मोठी जुन्या ओबडधोबड नॉर्मन घाटाची आणि भक्कम बांधणीची आहे. देवळात एका खांबावर कवीचा संगमरवरी मुखवटा ठेविला असून खाली या अर्थाचा लेख आहे:-
To the memory of W. Wordsworth…who,
By the special gift and calling of God, was raised
Up to be the chief minister not only of the noblest
Poetry but of high and sacred truth….
असो, ह्या प्रकारे आमचे ह्या प्रांतात १५ दिवस अगदी नकळत गेले. ह्यांपैकी बहुतके दिवस, सकाळी ८ वाजता न्याहारी करून संध्याकाळी ८ वाजता जेवणाचे वेळेपर्यंत खांद्यावर फराळाच्या पडशा टाकून जंगलातून हिंडत, पाण्यावरून तरंगत, पर्वतावरून सरपटत काळ घालविला म्हणावयाचा. ऑक्सफर्डचे प्रोफेसर व विद्यार्थी म्हणजे केवळ पुस्तकातील किडे नव्हेत. लीथस् कॉटेजमध्ये निघणा-या आमच्या एका गमतीच्या पाक्षिक पत्रिकेत प्रोफेसर कार्पेंटर साहेबाबद्दलचा जो उल्लेख आहे तो अगदी खरा आहे आणि मासलेवाईक आहे.
Each day he does a mountain climb,
A ten mile row, theree meals, a witticism
And fills the intervening time with
Pali texts and hebrew criticism.
खरोखरच आम्हा सर्वात प्रोफेसरच अधिक बळकट व काटक ठरले. किती चालले तरी तोंडावर थकल्याचे चिन्ह नसे. वाट शोधून काढणे, लहानसान माहिती देणे, श्रमाची सर्व कामे स्वत: हौसेने व काळजीने करणे वगैरेंची कशी अगदी त्यांना सवयच जडलेली. कोणी थकून मागे राहिल्यास पुन्हा त्याचेसाठी मागे जात. कोणी फार पुढे गेल्यास वाट चुकतील म्हणून पुढेही जात, घरीही निरनिराळे खेळ खेळून व नाना सुभाषिते सांगून सर्वांस उल्हासात ठेवीत.
अशा भल्या गुरूची, गुरूपत्नीची व आनंदी सहाध्यायाची शेवटी रजा घेऊन मी एका स्कॉच सरोवराची वाट धरली.
स्कॉच सरोवरात
स्कॉटलंडचे राजधानीचे शहर एडिंबरो हे सगळ्या ग्रेटब्रिटनात अत्यंत सुंदर आहे. समुद्रकाठी टेकड्यांच्या आंदोलावर, ह्यास ठिकाण फार अनुकूल मिळाले असून, स्वत:चा बांधाही पाखरासारखा आटोपशीर व टुमदार आहे. त्यामुळे अवजडशा लंडनसारख्या शहरातून आलेल्या पांथाचे मन ह सकृद्दर्शनीच हरण करिते. युरोपात हे एक पाहण्यासारखे स्थळ असून आत्मसंतुष्ट स्कॉच लोकांस ह्याबद्दल मोठा अभिमान वाटत आहे. आजूबाजूच्या सात टेकड्यांमध्ये हे वसले असल्याकारणाने स्कॉच लोक ह्यांस आधुनिक अथेन्स असे म्हणतात, व आल्यागेल्यांस त्यंचे मत विचारतात. इतकेच नव्हे तर अथेन्सची सर आणण्यास तेथील एका प्राचीन इमारतीच्या अवशेष राहिलेल्या खांबांच्या रांगेचे येते एका टेकडीवर हुबेहूब अनुकरण केले आहे. ह्या स्वच्छ व सुखी नगरीत एक आठवडा घालवून पुढे मी ग्लासगो येथे गेलो.उद्योगाची धडधड, व्यापाराची घडामोड, गर्दी, धूर आणि धुरळा इ. आधुनिक सुधारणेची वरवर दिसणारी लक्षणे येथे भरपूर आहेत. तीनच दिवस येथे राहून माझे इष्ट स्थळ जो स्कॉच सरोवर प्रांत, तिकडे निघालो. पण तितक्याच अवधीत मला भावी एकांताच्या सेवनार्थ फार चांगली भूक लागली होती.
ग्लासगोच्या एका धुकटलेल्या बोगद्यातून आगगाडीने मला फरफटीत बाहेर ओढून एके सुप्रभाती क्लाईड नदीच्या खाडीत निवांत पाण्यावर आणून सोडिले. किती तरी आराणूक वाटली मनाला! पण येथेही माणसांची गर्दी काही चुकली नाही. इतका वेल कामात गुंतलेल्यांच्या गर्दीत होतो, तर आता विश्रांती घेणा-यांच्या गर्दीत पडलो! ज्या बोटीत मी उतरलो ती आधीच भरून गेली होती. अशा भरलेल्या बोटी वेळोवेळी बंदरातून निघून, गिरिगव्हर, मैदान, जंगल इ. निरनिराळ्या प्रांती शिरत. ह्या गर्दीपैकी काहीना काम फार पडल्यामुळे व काहीना काम मुळी नसल्यामुळे शीण आला होता. तथापि शरण आलेल्यांचे गुणावगुण न पाहता सृष्टिमाता सर्वांचे सारखेच सांत्वन करू लागली. सुधारणेचा ताप किती आहे हे खरे पहावयाचे असल्यास एकाद्याने अशा विश्रांतीच्या ठिकाणी किती व कोणत्या प्रकारची झांगड लागून गेलेली असते ते पहावे. इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड इतकेच नव्हे तर युरोपातील निरनिराळ्या ठिकाणांहून विशेषेकरून अमेरिकेतून लोक येथे येतात व तसेच इतर ठिकाणीही जातात. डोंगराच्या खबदडीतही सुखाचे प्रत्येक साधन पुरविणारी, व अहर्निश सृष्टि-नटीचे सर्व हावभाव दाखविणारी हॉटेले येथे सर्वत्र सज्ज होऊन वाट पहात उभी आहेत. खुश्कीने व जलमार्गाने प्रवासाचे दर कमी करून भपकेदार वर्णनाची गाईडबुके लिहून, जाहिराती देऊन वगैरे वगैरे नाना उपायांनी व्यापारी लोक गि-हाईकांस घरातून बाहेर काढतात. तशात, फॅशनदेवीचे नवस पुरविणेही इकडे फार जरूरीचे झाले आहे. ज्या ठिकाणी हिवाळा व पावसाळा घालविला तेथेच उन्हाळ्यातही राहणे म्हणजे इकडच्या संभावितपणाला शोभत नाही. अशा अनेक कारणांमुळे मला ही गर्दी जमलेली पाहून फारसे आश्चर्य वाटले नाही. आश्चर्य वाटले ते हे की, ह्या लोकांची विश्रांती घेण्याची त-हा दगदगीचीच. निदान मला ती तशी भासली. रेल्वेवर काम करून शिणलेले तरूण पुरूष, पोस्टात खपणा-या तरूण मुली, गिरणीतले मजूरही, एथील निरनिराळ्या भागांतील इतिहासप्रसिद्ध स्थळे व सुंदर देखावे रात्रीचा दिवस करून पाहून जात असतात.
असो. आमची आगबोट क्लाईड नदीच्या रूंद खाडीतून लवकरच लाखलाँग नावाच्या सुंदर व चिंचोळ्या सरोवरात शिरली व स्कॉटलंडच्या पश्चिम भागातील हायलँड नावाच्या जगप्रसिद्ध डोंगरी प्रदेशात वरवर जाऊ लागली. दोहोंकडे केवळ सामसूम होते. शांती आणि समाधान ही स्वर्गीय भावंडे पहाटेच्या प्रहरी येथे विश्रंभाने दोहों काठांवर झोपीच गेली होती जणू! प्रत्येक वळशासरशी नवेनवेच पडदे आम्हांपुढे पसरत. आता सरोवर संपले, पुढील खडकावर आम्ही उतरणार असे म्हणतो तोच पुन: पाणी आणि पर्वत, गवत, वृक्ष आणि वेली ह्यांचे अकल्पित भांडार पुढे दिसू लागे. अखेरीस लॉखलाँगच्या अगदी शिरोभागी अँरोखर नावाच्या जंगली बंदरात आगबोट रिकामी झाली. ह्या लहानशा ठिकाणी घरापेक्षा हॉटेलांचीच संख्या अधिक होती आणि घरात राहणा-या साध्याभोळ्या हायलंडरांनाही ह्या लाघवी सुधारणेने पैशाची चट लावून दिली होती हे लवकरच दिसून आले.
येथून दीड मैलावर सगळ्या, ‘स्कॉच सरोवराची राणी’ जी लॉखलोमंड तिचा अमल सुरू होतो. ह्या सर्व प्रदेशात वस्ती फार विरळ विरळ आहे. मैल-दीड मैलावर एकादी शेतक-याची झोपडी अगर गृहस्थाचा वाडा लागतो. सुदैवाने ह्या एकांत स्थळी मला तीन निरनिराळ्या झोपड्यांत जागा मिळाल्याने ह्या सर्व प्रदेशात फिरून पाहण्यास सापडले, आणि हॉटेलात राहणा-या नागरिक लोकांचा संसर्गही थोडा वेळ चुकविता आला. लॉखलोमंडच्या दुस-या बाजूस ४-५ मैलांवर प्रख्यात कवी सर वॉल्टर स्कॉट ह्याच्या ‘लेडी ऑफ दि लेक’ ह्या काव्यातील मुख्य स्थळ लॉख कॅट्रीन हे आहे. ही तर सौंदर्याची खाणच स्कॉट कवीला लाभली होती. सरोवराच्या शिरोभागी ट्रोसॉक्स नावाच्या मनोहर दरीकडे जाताना एलन्स आईल नावाचे वरील काव्यातील नायिकेचे सुंदर स्थान लागते. त्याला अगदी चिकटूनच प्रेक्षकांची नौका जात असताना प्रत्येकाचे अंत:करण सद्गदित झाल्यावाचून राहत नाही. यावत्काळ हा डोंगर, हे सरोवर व ही दरी पृथ्वीवर राहतील तावत्काळ स्कॉटच्या नावाला व त्याच्या साध्या सरळ व सोप्या भारतीला बाध येणार नाही ही साक्ष पटते. मी दरीत शिरलो तेव्हा:
“All in the Trossak’s glen was still,
Noon tide was sleeping on the Hill”
हा कवीचा दाखला मला प्रत्यक्ष पटला! येथून पाऊल परत घेणे जिवावर आले!
बेन लोमंड शिखरावरील समाधी
ऑगस्ट महिन्यात एके दिवशी सकाळी लगबगीने न्याहारी आटोपून, लोमंड सरोवराच्या काठी हार्बेट बंदरावर आगबोटीची वाट पहात मी उभा होतो. जिच्या मुद्रेत सायंकाळचे प्रसंगी एक प्रकारच्या आध्यात्मिक औदासिन्याची आणि चिंतनगांभीर्याची शोभा दिसत असे ती ही ‘स्कॉच सरोवराची राणी’ आज सकाळी आपल्या सर्व परिवारासह अत्यंत सुप्रसन्न दिसत होती. आज दिवस इतका स्वच्छ व सोज्वळ होता की, ह्या उन्हाळ्यातला हा अगदी पहिल्या प्रतीचा असे लोक म्हणू लागले. पैलतीरावर ‘बेनलोमंड’ प्रवताचे निमुळते शिखर इतरांहून उंच आकाशात गेले होते. येथून सुमारे ५ मैलांवर पर्वताचे पायथ्याशी रॉबर्टनान नावाच्या एका कोप-यातील बंदरावर मी एकटाच उतरलो आणि हळूहळू चढण चढू लागली. येथे एकांत म्हणजे अगदी पूर्ण प्रतीचा होता. जिवलग माणसे व देशबांधव हजारो कोसांवर, एतद्देशीय मित्र, ओळखीचेही शेकडो कोस दूर, आसमंतात माणसांची कोठेही चाहूल दिसेना, प्रदेश अनोळखीचा, वाट गैरमाहितीचा, इतके असूनही मी अपरिचित स्थळी आहे असे वाटेच ना. जंगली हिंस्त्र पशूंची तर गोष्ट राहोच, पण साप, विचूं इत्यादी क्षुद्र किड्यांची येथे वार्ताही नाही. फार तर काय पायात काटाही मोडण्याची भीती नाही, अशी येथील डोंगर व राने अगदीच माणसाळून गेली आहेत. एकदोन शतकांपूर्वी ज्या प्रसिद्ध व बाणेदार रॉबरॉय रामोशाने हा सारा प्रदेश दणाणून टाकला होता त्याचीच गुहा व कबर पाहण्यास आता कॉलेजातील तरूण मुली बायसिकलवरून शेजारच्या पहाडात एकट्याच हिंडत आहेत! असो, ह्या प्रकारे ह्या स्थळाचा आता उग्रपणा जरी सर्वस्वी नाहीसा झाला आहे तरी येथील एकांतवासाला व जंगली शोभेला अद्याप तिळमात्र बाध आलेला नाही.
मी रान तुडवीत वरवर चाललो. एक टेकडीच्या माथ्यावर जावे तो अवचित पुढे दुसरी टेकडी दत्त म्हणून उभी राही. तरी चढण्याचा कंटाळा येईना की थकवा वाटेना. भोवताली प्रदेश अगदी उघडा, झाड ना झुडूप, पायाखाली मात्र हिरवेगार गवताचे दाट आणि दमट हांतरूण हांतरले होते. नजरेत कोठे पशू येईना की पाखरूही येईना. केव्हातरी एकाद्या दगडाच्या मागे रवंथ करीत पडलेले एकादे स्कॉच मेंढरू दिसे. पण ह्या सत्त्वशून्य प्राण्याच्या अशा क्वचित दर्शनामुळे माझ्या एकांतात म्हणण्यासारखा व्यत्यय येत नव्हता. सहज चुकून मागे नजर गेल्यास, खाली लांबवर पसरलेला अप्रतिम देखावा दिसे. २५ मैल लांब त्रिकोणाकृती लॉखलोमंड सरोवर अगदी क्लाईड नदीला जाऊन भिडले होते; जणू एक भले मोठे पिंपळाचे पानच कोठूनतरी तुटून ह्या विस्तीर्ण प्रदेशात पडले आहे! पण ते पाहूनही माझ्या आत्मचिंतनाचा भंग होईना की ऊर्ध्वगतीत खंड पडेना.
‘आत्मैवात्मनो बंधु:’ ही वाणी मला आजच्या इतकी पूर्वी कधीच कळली नव्हती; आपल्या खोल कपाटात अनुभव आणि अनुताप, ज्ञान आणि दर्शन बोध आणि प्रेरणा, इ. एक का दोन अनेक त-हेचे दैवी भांडार भरले असता आम्ही एकमेकांपुढे आपले दैन्य आणि दारिद्र्य किती तरी दाखवितो. भोवतालच्या वनस्पती-पायाखालचे गवतही नाही का आपल्या बळावर वाढत! मग आम्हीच का अशी स्वत:ची हेळसांड आणि पुष्कळदा असा दुरूपयोगही करतो? मदत मागावयाची ती दुस-याला का? ज्ञान धुंडावयाचे ते बाहेर का? पुस्तकाचे प्रामाण्य, माणसाचे माहात्म्य, मातीधोंड्याची आवश्यकता, वगैरे वगैरे कोण हे समजुतीचे व आग्रहाचे प्रकार आणि अशा हट्टाने किती डोईफोड! हा जो आमचा असा छळ होतो तो कोणी कोपलेला देव करीत नाही किंवा देवाचा कोणी प्रतिस्पर्धी सैतानही करीत नाही. तर आम्हीच आमच्या स्वत:चे न ऐकता असे आत्मशत्रू बनतो. लाज आणि संतोष, शिक्षा आणि शिफारस, बंधन आणि मोक्ष ह्या सर्व बाबतीत आमचे आम्हीच कारण आणि याला साक्षही स्वत:चीच, अशा ह्या आत्मसंभाषणात मी गुंतलो होतो. मजबरोबर जणू कोणी तरी पोक्त माणूस चालले आहे. आणि मी जर इकडे तिकडे पाहीन अगर मध्येच थांबेन तर ह्या माणसांचा जणू मोठा उपमर्द होईल अशा काही भावनेमुळे मी आजूबाजूस वाजवीपेक्षा फारसे लक्ष न पोहोचविता सारखा सरळ चढत होतो. अखेरीस अशा नादातच बनलोमंडच्या माथ्यावरील सर्वात उंच टोकावर मी आलो.
येथे दोन तरूण विद्यार्थी भेटले. आश्चर्याचा पहिला झटका निघाल्यावर, व अशा परक्या स्थळी अशा तीन परक्यांचे जे साहजिक स्वागत व संभाषण व्हावयाचे ते झाल्यावर ते दोघेही डोंगर उतरून दरीत दिसेनासे झाले. मी मागे माझ्याच समागमात राहिलो. बेन नेव्हीसचे शिखर खेरीज करून, सर्व ग्रेटब्रिटन देशातील अत्यंत उंच स्थानी एका शिळेवर मी आपले आसन मांडले. क्षुद्र पण क्षमय् गर्वाची थोडी झुळूक वाहिल्यावर, लगेच आतबाहेर निवांत झाले.
बारा वाजले होते, वारा वाहत नव्हता, थंडी वाजत नव्हती, उष्मा वाटत नव्हता, बाजूस शेदोनशे कदम कोरडी आणि सपाट जमीन होती. शेवटी एकदम कडे तुटले होते. वर पसरलेले आकाशाचे अवीट घुमट खाली भोवतालच्या विस्तीर्ण क्षितिजवलयावर टेकले होते. त्यावर मध्यंतरी ढगाचा कोठेही डाग लागला नव्हता. दिनमणी मधोमध तळपत होता. त्या प्रकाशात चाळीस मैलांवरचा ग्लासनो शहरातला धूर आणि धुरळा दिसत होता. (समुद्रसपाटीपासून हे स्थान ३१९२ फूट उंच आहे.) पर्वत, नद्या, सरोवरे, बेटे, माळराने वगैरे आसमंतातील सुमारे १०० मैलपर्यंतची कारागिरी चर्मचक्षूपुढे दिसू लागली. अनंत स्थळ आणि अनंत काल हे दोन भिन्नजातीय गोल परस्परांच्या पोकळीत तरंगत आहेत, असा देखावा चित्तचक्षूला दिसू लागला. खाली लोमंड सरोवरावरून एकादी आगबोट केव्हातरी दुरून तरंगत जात असताना लहानशा हंसीसारखी दिसे. पुढे पसरलेल्या एवढ्या अफाट चित्रपटात त्या हंसीशिवाय चैतन्याची इतर खूण म्हणून दिसेना! तसेच चित्तचक्षूपुढे पसरलेल्या स्मृतिपटात केव्हातरी एकादे व्यक्तिचरित्रातील पापपुण्य अगर मानवी इतिहासातले सुखदु:ख ह्याची नुसती ओझरती आठवण होऊन जाई, ह्यापेक्षा जास्त येथेही हालचाल घडेना, हळूहळू हे दोन्ही बाहेरचे व्यापार बंद पडू लागले. आत काय व्यापार चालला होता ते कोण लिहू शकेल! काही काळाने सर्वच सामसूम झाले!!
दोन वाजता ही समाधी आटोपली. नंतर मी वनातून परत जनाकडे हळूहळू उतरू लागलो. मोठ्यांची एकदोन वाक्ये आठवली आहेत ती येथे देतो:
I had heards of Thee by hearsay;
But now my eye seeth Thee,
Book af job XLII Old Test
कां जे ध्यौर्लोक आणि पाताळ | अथवा पृथिवी आणि अंतराळ| अथवा वशदिशा समाकुळ| दिशाचक्र ||१५|| हे आघवेची तुवां एके| भरले देखत आहे कौतुके| परी गगनाही संकट भयानके| आल्पविजे जेवि ||१६|| नातरी अद्भुत रसाचीया कल्लोळी| जाहाली चवदाही भुवनासि कडियाळी| तैसे आश्चर्यचि मग मी आकळी| काय एक ||१७|| नावरे व्याप्ति हे असाधारण | न साहवे रूपाचे उग्रपण | सुख दूरी गेले तरी प्राण |विपाये धरी जग ||१८||
ज्ञानेश्वरी गीता अ. ११ श्लोक २०.
वरील पत्रात मी माझ्या निरनिराळ्या खासगी अनुभवास ‘प्रार्थना’ ‘भेट’ ‘समाधी’ अशी मोठी नावे दिली आहेत. त्यावरून वाचकास ही आत्मप्रौढी आहे असे वाटेल आणि केलेले वर्णन अतिशयोक्तीचे आहे असा आरोप येईल. पण खरा प्रकार तसा नाही. वरील प्रसंगी कोणाही य:कश्चित् मनुष्याची वरील अवस्था होणे साहजिक आहे. फार तर काय, खालील प्राण्यातही जेथे जेथे चैतन्याचा अधिक विकास झालेला असतो तेथे तेथे वरील सौंदर्यदर्शनाचे प्रसंगी वरील समाधीचा म्हणजे चैतन्याच्या एकीकरणाचा प्रकार सहज घडतो. मेघास पाहून मोर नाचून नाचून तटस्थ होतो. वसंतगामी कोकिळा गाऊन गाऊन स्तब्ध बसते. “सर्प भुलोनि गुंतला नादा| गारूडिये फांदा घातलासे|” हे तुकाराम सांगतात. असा जर सर्वत्र सृष्टीनियम आहे तर त्याला माझेच मन का अपवाद असेल!
आता, वरील अनुभव सर्वसाधारण मानाने सर्वच माणसांस होण्यासारखा असून, किंबहुना होत असूनही जर काहीजण तिकडे तादृश लक्ष पुरवीत नसतील अगर लक्ष पुरवूनही त्या त्या अनुभवांचा तादृश्य अर्थ करीत नसतील तर ती त्यांची खुशी. पण ह्या बाहेरच्या खुशीच्या भिन्नत्वामुळे आतील स्वाभाविक अनुभवास बाध येत नाही किंवा भिन्नत्वही येत नाही. अनुभव तो प्रकृतीच्या आणि प्रसंगाच्या मानाने सर्वत्र सारखाच यावयाचा. त्या अनुभवाचा झटका केव्हा केव्हा इतका जबर बसतो की, काव्य, कादंबरी, साहित्य ही सर्व बापुडी त्याच्या यथार्थ वर्णनाचे कामी केवळ पंगू ठरतात मग अतिशयोक्तीची गोष्ट कशाला!