गुरूवर्य विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे सेवेशी-
महाराज,
आम्ही अस्पृश्य वर्गाच्या खालील संस्थांतर्फे आपण जी अस्पृश्य वर्गाची, हिंदुसमाजाची आणि पर्यायाने मानवजातीची आजपर्यंत सेवा केलेली आहे, तिच्याबद्दल कृतज्ञबुद्धीने हे मानपत्र आपणांस सादर अर्पण करीत आहोत. अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीला अलीकडे महत्त्व आलेले आहे, आणि सध्या महात्मा गांधी ह्या चळवळीचे मोठे पुरस्कर्ते असले, तथापि ह्या चळवळीचे जनकत्व आपणांकडेच आहे ही गोष्ट अस्पृश्य समाज विसरला नाही व विसरणारही नाही. अस्पृश्यता निवारण्याच्या बाबतीत आपण महात्मा गांधीलाही गुरूच्या ठिकाणी आहात. अस्पृश्यता निवारणे आणि अस्पृश्यांना उन्नत करणे ह्या बाबतीतील आपले प्रयत्न नि:स्वार्थी व मानवजातिविषयी आपणांस वाटणा-या प्रेमाचे व न्यायाचे द्योतक आहे, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अस्पृश्यता घालवून अस्पृश्यांना उन्नत करू इच्छिणारे नि:स्वार्थी बुद्धीचे आपणांसारखे आपणच आहेत.
गरीब शेतक-यांविषयीची कळवळ आपल्या कारागृहवासाने आपण सिद्ध केलेलीच आहे. इतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणेत आपण केलेली कामगिरी, इतिहाससंशोधनाचे आपले प्रयत्न, निगर्वी पण स्वाभिमानी वृत्ती, पवित्र आणि तपस्व्याला शोभण्यासारखे आपले आचरण ह्या आणि इतर अशा अनेक सद्गुणांमुळे आपण ह्या भरतभूमीला भूषणभूत झाला आहात.
आपल्या ह्या सर्व सद्गुणांमुळे आणि विशेषत: अस्पृश्य वर्गाविषयी आपणांस वाटत असलेल्या आस्थेमुळे तो वर्ग आपणांकडे आकृष्ट झालेला आहे. त्याला अन्य त-हेने आपले उतराई होणे शक्य नाही. ह्यास्तव आपली क्षमा मागून आम्ही आपणांस आयुरारोग्य चिंतितो, आणि आपण ह्या मानपत्राचा स्वीकार केला म्हणून आपले आभार मानून हे मानपत्र आपल्या चरणी सादर करितो.
(१) ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस सोशिएशन
(२) डिप्रेस्ड इंडिया असोशिएशन
(३) मध्यप्रांत महार शिक्षण संस्था
(४) महार तरूण संघ
(५) सी. पी. व-हाड एज्युकेशन सोसायटी
(६) महार सेवा दल
(७) चोखामेळा समाज
(८) विश्व सेवा दल
(९) दलित युद्ध मंडळ
(१०) विश्वसेवक समाज, उंठखाना
(११) अरूणोदय समाज, सीताबर्डी
(१२) एज्युकेशन इंप्रूव्हमेंट सोसायटी