दास्यभक्तीची ध्वजा
सर्वव्यापी परमेश्वराचे दास होऊन दास्यभक्तीची ध्वजा धारण करणाराचे साहजिकपणे जगात कसे वर्णन असते, हे मनोहर रीतीने तुकारामांनी एका पद्यामध्ये वर्णिले आहे. महाभारतात धर्म, अर्जुन, कृष्ण ह्यांचे स्वभाव वर्णिले आहेत व त्यांच्याद्वारे पुरूषस्वभावाचे चित्र पुराणकारांनी रेखाटले आहे. त्याचप्रमाणे रामायणात असेच चित्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता व मारूती ह्यांच्याद्वारे उमटविलेले आहे. रामायणात मारूती व महाभारतात भीम ह्यांच्या चित्रांचा आज विचार करून भीम कसा होता सांगितले आहे! तर ओबडधोबड, धट्टाकट्टा, कोणत्याही स्थितीची त्याला पर्वाच नाही. त्याचे सामन्याचे शस्त्र काय तर मोठा दगडाचा सोटा म्हणजे गदा. कोणत्याही गोष्टीचा विधिनिषेध नसावयाचा. लहानसहान अडथळ्याने आपण गडबडतो; पण त्याची त्याला काहीच भीती नाही. आला राग की, मारला शत्रूला एक सोटा नि बसवला त्याला खाली. मारूती भीमापेक्षाही ओबडधोबड, डोंगर, झाडझुडूप ही त्याची आयुधे. पण भीमाचे अंत:करण कसे होते? पांडव कुंतीसह अज्ञातवासात गेले. त्यासमयी एकदा एका गावी त्यांची वस्ती झाली. तेथे बकासूर नामक दैत्य लोकांना पीडा देई. रोज एका मनुष्यप्राण्याचा बळी त्याला दिला तरच तो आणखीन त्रास देत नसे. पांडव ज्यांचे घरी उतरले होते, तिथे एके रात्री हा चिंताग्रस्त वाद निघाला की उद्या बकासुराच्या भक्ष्यस्थानी मुलाने जावे की बायकोने जावे की नव-याने जावे? त्याप्रसंगी भीम वरून जरी रानटी दिसे पण त्याचे अंत:करण कोमल होते. ते कळवळून आले. त्याने कुंतीला विचारले की, मी जाऊ का बकासुराच्या भक्ष्यस्थानी पडायला? हा ब्राह्मणाचा पोर मेला तर मरेना, बकासुर मरेना, गाव मरेना, त्याला काय त्याचे होते? धर्म होता, अर्जुन होता, दुसरे भाऊ होते. पण त्यांच्यामध्ये बारीक विचार नव्हता. राजाचा किंवा गावक-यांचा काही करार असेल अशा विचारांनी ते ग्रासून जायचे. तेही कोमल नव्हते असे नाही. पण भीम खरा कोमल होता. दास्यभक्तीची ध्वजा भीमाने जशी घेतलेली होती, तितकी इतरांनी घेतलेली दिसत नाही. भक्तीने अंगाची कातडी जाड व टणक होती, वज्रदेह बनतो. इतकेच नाही तर अंगाचीही कातडी तशीच टणक बनून कितीक सुया, टाचण्या, खिळे, गोळे आले तरी त्यांना ती पुरून उरते. पण अंत:करण मवाळ मृदुही झाले तरी ह्याला ध्वजा पाहिजे असते. ध्वजेत जय सुचविला जातो. आपण एकदा दास झालो आणि कोणाचे तर विष्णूचे; जो सर्वांत समाविष्ट आहे त्याचे दास झालो म्हणजे मग पुढे जायचेच जायचे. त्यावेळी मग बारीक बारीक विचार, बारीक बारीक अडथळे आले तर त्यांना भिऊन थांबा कशाला? आता तुम्ही म्हणाल, काय हो असेच केले पाहिजे का? तर होय. असेच आहे ते.
कामात एकदा आपण पडलो की, अंग सुया बोचून जाडच होत जाते. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उतरल्यावर वारा लागणार, उन्ह लागणार, पाऊस लागणार. दास्यभक्तीची ध्वजा घेऊन रानावनात हिंडू लागले तर कातडी नाजूक कशी राहणार? पण हे लक्षात ठेवा की, जी कारणे कातडीला कोमल करतात; तीच कारणे काळजाला कोमल करतात. कातडी मऊ व्हावयाला तितक्याचपरीने मन खरोखर निर्लज्ज व्हावे लागते. जेव्हा कळवळा आला, तेव्हा द्रौपदीची लाज राखण्यास भीम उठत असे. कारण भीम आतून किती कोमल! भीम म्हणजे मुलांसाठी पुराणकारांनी केवळ भेसूर चित्र काढून ठेवलेले नाही. आबालवृद्धांस, स्त्रीपुरूषांस सर्वांनाच भीम सांगत आहे की, अंत:करण कोमल करावयाचे असेल तर कातडी मृदु राहण्याकडे पाहू नका. नारळाची कवठी किती जाड. फुटता फुटत नाही, पण आत मगज किती मऊ, व त्यातले पाणी तर किती गोड!
अशारीतीने दास्यभक्तीची ध्वजा आपण चालवू लागलो म्हणजे वर्तनातून कृत्रिमता जाते. उलटपक्षी मानलेले हक्क, मानलेले अधिकार, आपण निर्माण केलेली कर्तव्ये ह्यातच गुरफटलो तर मन कठीण होते. शेतकरी अंगाने किती टणक कठीण असतो पण त्याचे मन किती कोमल! राग आलेला लवकर विसरतो. पण नागरिक जन आपण बनविलेल्या किल्ल्यात बसलेले असतात. त्यांच्या चालीरीती, त्यांचे मान-अपमान ह्यांची त्यांच्यावर पुटे बसतात. निसर्गात राहणारे लोक धडधाकट होतात व हे नागरिक जन आपल्या शरीराभोवती, घराभोवती, शहराभोवती कोट घालून घेऊन बसलेले. ह्यांचा आत्मा सर्व कुजून सडून गेलेला. ही सर्व वेष्टने झुगारून द्या. लौकिकाची, स्वार्थाची कामे सोडून ज्या आपल्या खरोखरी गरजा असतात त्या भागविण्यास झटावे लागते. तो व्यायाम करा म्हणजे शरीर निरोगी रहाते. आपली सुखे सर्व स्वाभाविक होतात. गरजा कृत्रिम नसतात. म्हणून त्या भागविण्यात वृथा कालव्यय होत नाही व टिकतही नाही. दास्यभक्तीची ध्वजा खांद्यावर मुळीच नसते पण ठेवली तर मोडते.
तेव्हा आपण स्वाभाविक राहणीने राहूया म्हणजे भीमासारखे होऊ. तसे झाले नाही तर दास्यभक्ती आमच्या संगीतातच राहील व ती आपणात लवमात्र येणार नाही.