मनुष्यजन्माची सार्थकता
अब तुम कब सिमरोगे राम । जिवडा दो दिनका मेजवान ।।धृ।।
गरभपनोमें हाथ जुडाया । निकल हुवा बेमान ।।१।।
बालपनोंमें खेल गमाया । तारुनपनमें काम ।।२।।
हात पाय जब कापन लागे । निकल गया अवसान ।।३।।
झूठी काया झूठी माया । आखर मौत निदान ।।४।।
कहत कबीर सुनभाई साधो । यहि घोडा मैदान ।।५।।
मनुष्यदेहामध्ये जी ह्या प्राणाची योजना आहे, ती फार थोडा वेळ टिकणारी आहे. म्हणजे जीव हा दोन दिवसांचा मेजवान म्हणजे पाहुणा आहे. पण ह्या थोड्याच अवकाशात जीवदशेच्या द्वारा चैतन्यरूपी आत्म्याचा उद्धार करावयाचा असतो. म्हणून ज्याला जाणल्याशिवाय मनाचे खरोखर समाधान होणार नाही त्या ईश्वरास होता होईल तो ओळखण्याविषयी कबीरजी आग्रह करीत आहेत. जड स्थितीत असलेली सर्व सृष्टी ईश्वराच्या कायद्याचे पालन बिनतक्रार करीत आहे. चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि तारांगण, वायू आणि वनस्पती ही सर्व ईश्वरास नमून आहेत. गर्भावस्थेत असताना मनुष्यप्राणीही इतर जड सृष्टीप्रमाणे जणू काय ईश्वराची आज्ञा ऐकण्यास तयारच असा हात जोडून असतो, पण तो बाहेर पडून स्वतंत्र झाल्याबरोबर बेईमान होतो. अखिल जडसृष्टी ईश्वराला न जाणताच जे त्याचे नियम पाळीत असते, तेच नियम समजून उमजून पाळणे ही मनुष्यपणाची थोरवी आहे. आणि एवढ्याचसाठी त्याला जीव हा पाहुणा दोन दिवस भेटावयास आलेला असतो. परंतु विपरीत प्रकार असा होतो की आयुष्याचे हे दोन दिवस लहानसहान गोष्टीत निघून जातात. बाळपण खेळात जाते आणि तरुणपण ख्यालीखुशालीत जाते, काम म्हणजे सर्वथैव तिरस्करणीय आहे असे नाही. रामदासांनी म्हटल्यारमाणे “बरे खावे बरे जेवावे । बरे ल्यावे बरे नेसावे । मनासारखे असावे । सकळ काही । ” ही बरेपणाची इच्छा (Decency) अथवा बरे असण्याची आणि दिसण्याची प्रवृत्ती काही (फुट नोट – ता. ११-२-१९११ रोजी केलेल्या कीर्तनाचा सारांश.) वावगी नाही. लहान मुलाला जसा खेळ, तसा तरुण माणसांच्या ह्या कामना साहजिकच आहेत, पण एवढ्यातच त्याच्या सर्व शक्तीचा –हास व्हावा अशी योजना दिसत नाही. खेळ आणि कामना ह्यांच्या द्वारा स्वतःची ओळख करून घेऊन तिच्यायोगे सर्व विश्वाचा जो प्राण त्याची ओळख करून घ्यावयाचा मनुष्याचा थोर अधिकार आहे. आणि तो प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याला स्वतःचीसुद्धा पूर्ण ओळख पटत नाही. तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ अंध अहंकार कसा असतो हे खालील पद्यात बुलाशहा ह्याने दाखविले आहे :
माटी खुद्दी करें दी यार ।।धृ।।
माटी जोडा माटी घोडा । माटीदा असवार ।।१।।
माटि माटिनु मारन लागी । माटी दे हतिहार ।।२।।
जिस माटीपर बहुती माटी । तिस माटी अहंकार ।।३।।
माटी बागबगीचा माटी । माटी दी गुलजार ।।४।।
माटि माटिनु देखन आई । माटी दी बहार ।।५।।
हंस खेल फिर माटि होई । पौंदी पाव पसार ।।६।।
बुलाशहा बुझारत बुझा । लाह शिरो भवसार ।।७।।
गाडी, घोडा, बागबगीचा आणि इतर सर्व संपत्ती हे मातीचेच निरनिराळे प्रकार, त्यांचे सेवन करण्यासाठी जे आपल्यामध्ये इंद्रियगण आहेत तेही पण मातीचेच प्रकार, म्हणून मातीच्या ढिगावर मातीचा ढीग रचण्यामध्ये ज्याप्रमाणे काही विशेष होत नाही, त्याचप्रमाणे केवळ इंद्रियसुखासाठी विषयांची रचना करण्यामध्येही अभिमान बाळगण्यासारखे काहीच नाही. केवळ डोईवर भार मात्र आहे. इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळां अशाही प्रकारचा अभिमान उत्पन्न होतो की आपणांस देव मिळाला, नुसत्या खाण्यापिण्यामध्येच गर्क होऊन आम्ही आपणांस फसवीत नाही तर केव्हा केव्हा एकादी धार्मिक पोकळ समजूत घेऊन आपण स्वतःस धन्य मानीत असतो, आणि केव्हा केव्हा परोपकाराचे कृत्य करीत असताही अशीच फसवणूक होते. हा अनुभव बाबू रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या खालील पदात सुंदर रीतीने निवेदित झालेला आहे :
गर्व माझा हरुनि प्रभु आणिली बहु लाज ।
कवण मुखे संमुख तव राहुं हा मी आज ।।धृ।।
गवसलासि तू म्हणूनी मज मी फसवी मनिंच्या मनी ।
फजित होत संसारि या करिता तुझे काज ।।१।।
कळेनाचि आमुच्या घरी वससि कुठे प्रभु तू तरी ।
कधि न तुझ्या चरणी मला लाविले राजराज ।।२।।
त्यजुनि तिला दिनरजनी माझेचि ठायी गेलो रमुनी ।
तव न वैभवी देखिले तुला विफल चक्षु काज ।।३।।
काव्याचे वाहिक आणि आंतरिक असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात बाहेरील सर्व पदार्थांचे हुबेहूब वर्णन असते, परंतु त्यात कवीचे हृद्गत दिसून येत नाही. दुस-या प्रकारात कवीने आपले अंतस्थ अनुभव निवेदिलेले असतात. चित्राचाही हाच प्रकार आहे. छायाचित्रांमधून (Photographs) चित्रकाराचा मागमूसही लागत नाही. परंतु चित्रकार, प्रेम, करुणा, वैराग्य, वीर्य, इत्यादी आपल्या अनुभवाचे जेव्हा बाहेरील एकाद्या देखाव्याच्या द्वारा चित्र काढतो तेव्हा ते वरिष्ठ दर्जाचे ठरते. चित्र आणि काव्य ह्यांचे हे दोन प्रकार ज्याप्रमाणे एकाहून एक श्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे जीवित्वाचे प्रकार आहेत. केवळ बाहेरचे भोग भोगून अथवा केवळ आपल्याच कल्पनेत दंग होऊन आपण राहिलो तर ‘तव न वैभवी देखिले तुला विफल चक्षुकाज’ असा पश्चात्ताप होणार आहे. पण जर आम्ही प्रत्येक वेळी आमच्या शुद्ध आणि पवित्र विचारामध्ये आणि आचारामध्ये ईश्वरी इच्छेचा विलास पाहू लागलो आणि संसारातील निरनिराळ्या प्रसंगी त्याचा समागम अनुभवू लागलो, तर आमचे जीवित
दुस-या प्रकारच्या चित्राप्रमाणे आणि काव्याप्रमाणे गंभीर आणि पूर्ण होईल. रविंद्रनाथांचे वरील पद हे दुस-या कोटीतले आहे. आणि ते त्यांच्या आध्यात्मिक जीविताचे द्योतक आहे.
असो. ह्याप्रमाणे ईश्वराचे वैभव पाहून ते ईश्वराचे आहे अशी मनाची भावना न होता आपण तिच्यात दंग झालेले असतो आणि डोळे असून आंधळे होतो. अशा रीतीने बाळपण आणि तरुणपण निघून गेल्यावर म्हातारपणी आपण निःसत्व होऊन पडतो. ईश्वरभजन करणे म्हणजे केवळ तोंडाने किंबहुना मनानेही ते स्मरण करणे एवढेच असते तर ते म्हातारपणी घडले असते. पण ज्याअर्थी कबीरजींनी ‘निकल गया अवसान’ असे म्हटले आहे त्याअर्थी भक्तिमार्गाचा अवसानाशी म्हणजे शक्तीशी निकट संबंध आहे असे होते. भक्ती म्हणजे प्रेममय शक्ती होय. ती नसेल तर आपली काया आणि माया म्हणजे शरीर आणि धन ही विफल होतात आणि आपले मरण मात्र खरे होते. प्रेममय शक्तिशिवाय जिवंत रहाणे म्हणजे निष्फळ आहे. केवळ शारीरिक अस्तित्व म्हणजे जीव नव्हे.
जिन प्रेम रस चाखा नहीं, अमृत पिया तो क्या हुवा ।
जिस इश्कते सिरना दिया, जुग जुग जिया तो क्या हुवा ।।१।।
औरो नसी हत तूं करे खुद अमल करता नहीं ।
दिलका कुफर टूटा नही, हाजी हुवा तो क्या हुवा ।।२।।
जब इश्कके दरयामें, गरकाव यह होता नही ।
गंगा जमना द्वारका नहाता फिरा तो क्या हुवा ।।३।।
वली पुकारे हो पिया पिया, पियाई पुकारते जिया दिया ।
मतलब हासल न हुवा रो रो मुवा तो क्या हुवा ।।४।।
ह्याप्रमाणे प्रेमरस जीविताचे मुख्य तत्व आहे. ह्या प्रेमाने ईश्वरही बद्ध आहे, तो म्हणतो :-
सुनो सकळ नारीनर, प्रेमबारी नयनसे ।
जानो मर्म मेरा सभी भक्तशुद्ध नयनसे ।।१।।
जैसे वत्स गायपास, रहे सदा आसपास ।
वैसेही मै भक्तसंग, रहता चिर दिन लिये ।।२।।
प्रेमका भिकारी मैं, खडा हूँ तुमरे द्वार पर ।
नही मिलति प्रेम भिक्षा, मुझको तुमसे प्रिय नर ।।३।।
ह्याप्रकारे ईश्वर स्वतःस प्रेमाचा भुकेलेला भिकारी म्हणवितो आणि भक्त ईश्वराचा दास म्हणवितो.
मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा ।
तूं दिवान तूं दिवान तूं दिवान मेरा ।।१।।
एक रोटी और लंगोटी द्वार तेरे पावा ।
भक्ति भावदेह आरोग्य नाम तेरा गावां ।।२।।
तूं दिवान मेहरबान नाम तेरा वारया ।
दास कबीर शरण आयो चरणलाग तारया ।।३।।
अशा रीतीची ईश्वराशी तद्रूप होणारी प्रेममय शक्ती आपल्या जीवितामध्ये उदयास आली पाहिजे आणि तिला कालावधी मुळीच लागू नये. कबीरजींनी म्हटल्याप्रमाणे हा घोडा हे मैदान अशी आपली तत्पर स्थिती जीवितामध्ये असली पाहिजे.