मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना-३
देवाची पूजा हे भूताचे पाळण| मत्सर तो शीण बहुतांचा||१|
-तुकाराम
ईश्वरावर श्रद्धा बसण्यास आपण भूतमात्राचे ठिकाणी आदरबुद्धी ठेविली पाहिजे व त्यावरील भक्ती दृढ करण्यास मनुष्याशी स्नेहभाव अखंड वाढविला पाहिजे, ह्या दोन गोष्टींविषयी मागे विचार केला आहे. ईश्वराबद्दल आपल्या मनात श्रद्धा उत्पन्न होऊन त्याची भक्ती बाणल्यानंतरची तिसरी गोष्ट म्हटली म्हणजे त्याची पूजा, उपासना, आराधना करणे ही होय. म्हणजे सदैव त्याच्या इच्छेला आपली इच्छा अनुसरून राखणे हे होय. श्रद्धेचे पर्यवसान भक्तीत आणि भक्तीचे सेवेत झाले तरच ती स्थिती खरी म्हणता येईल. आता ही पूजा करण्यास गंध, पुष्प, धूप, दीप इत्यादी पूजेच्या उपकरणांची, किंवा भव्य मंदिर, सुस्वर गायन, नामांकित वक्तृत्ववान उपासक ह्या बाह्य साधनांची, किंबहुना गहन विचार, गूढ ज्ञान, सूक्ष्म कल्पना आणि साक्षात्कार इत्यादी अंत:साधनांचीही आवश्यकता आहे असे मुळीच नाही. प्रपंचात राहून आपले नित्याचे व्यवहार करीत करीतच ईश्वरोपासना साधणे हे अगदी शक्य आहे. ‘देवाची पूजा हे भूताचे पाळणे’ असे तुकारामबुवा म्हणतात “ईश्वरावर प्रीती, पूज्यबुद्धी व अनन्यभाव ही ठेवून त्याप्रमाणे त्याचे मनाने भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे हीच त्याची खरी उपासना होय.” असे प्रार्थनासमाज सांगत आहे. म्हणून आपण आज परमार्थाचे तिसरे प्रापंचिक साधन (मनुष्यसेवेच्याद्वारे ईश्वरोपासना) कसे घडते ह्याचा विचार करू.
ईश्वरविषयक पद्ये गाऊन, ब्रह्मांडी आत्मा नेऊन मुक्तदशेप्रत जाऊन, सर्वसंगपरित्याग करून, मन निश्चल करून, ईश्वराची पूजा होईल. ईश्वरपूजेचा हा मार्ग आम्हांला नापसंत आहे किंवा कमी महत्त्वाचा वाटतो असे मुळीच नाही. पण मनुष्याची सेवा केल्यानेही (निष्कामपणे लोककल्याणासाठी झटल्याने) ईश्वरोपासना उत्तम रीतीने घडते हेच आज सांगावयाचे आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्|
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्||
वगैरे नवविधा भक्तीचे सर्व प्रकार ह्या सेवाधर्मानेही घडतात. पण मनुष्याची सेवा करीत असताना त्याचा पायपोस डोक्यावर घ्यावा लागल्यामुळे अंगामध्ये जशी आणि जितकी कसलेली विनम्रता बाणते, तशी आणि तितकी मंदिरामध्ये कितीही प्रेमळ प्रार्थना ऐकल्याने बाणणार नाही. आपल्या धनदौलतीचे व इतर बडेजावीचे विस्मरण झाल्याशिवाय, मनातील ताठा व अहंभाव पूर्ण नाहीसा झाल्याशिवाय ह्या सेवासदनामध्ये मुळी शिरकावच होणे कठीण पडते मग एकदा शिरकाव होऊन सेवा करीत राहिल्यावर मन नम्र झाल्याशिवाय राहील असे होणार नाही. नम्रतेशिवाय आणखी दुसरे सेवाधर्माने मिळणारे फळ म्हणजे मनाची अखंड शांती हे होय. केवळ ज्ञानाने, अनुभवाने, तर्काने किंवा श्रवणाने मिळणारी शांती केव्हा ना केव्हा भंग पावणारी असते, पण सेवाधर्माने प्राप्त झालेली शांती अखंड आणि अभंग अशी असते. कारण, शांतीचा भंग करणा-या सर्व काही कारणांना न जुमानण्याची सवय ह्या सेवाधर्मातच लागण्याचा संभव आहे. सेवाधर्मानेच लागण्याचा संभव आहे. सेवाधर्मानेच मनाला एकाग्रता येते. ध्यान करीत असताना अंत:करण शुद्ध होते खरे, पण केवळ ध्यानाने त्यास तशी सवय लागत नाही. आत्मपरीक्षणाच्या तीव्र कसोटीस उतरण्याला सेवाधर्म हाच एक मार्ग आहे. आपण बरे करीत असताना लोक मत्सराने किंवा अज्ञानाने वाईट का म्हणतात! किंवा आपण धडधडीत वाईट करीत असताना लोक बळेच मतलबान किंवा भोळेपणाने आपले विनाकारण देव्हारे का माजवितात! ह्या दोन्ही परस्पर भिन्न अनुभवांचा विचार करून, अशा ह्या व्यर्थ निंदास्तुतीपासून आपल्याला दूर कसे ठेवावे हे सेवेशिवाय साधणार नाही. ह्यावरून सेवेमध्ये भक्तीचे नऊच नव्हे तर अनेकविध सारेच प्रकार आणि त्यांची फळेही लाभतात हे दिसून येईल.
स्वत:च्या आप्तांच्या, जातीच्या, किंवा देशाच्या उत्कर्षाकरिता झटणे हाही सेवाधर्मच होय. पण त्यामधील स्वत:चा मध्यबिंदू पुसून टाकून केवळ नि:स्वार्थपणाने जर आम्ही सेवा करू तर ती अधिक श्रेष्ठ होईल. ह्या सेवेची किंमत आणि तिचे महत्त्व तिच्या प्रमाणावर नसून तिच्या प्रकारावर आहे. म्हणजे पुष्कळ लोकांचे आपण कल्याण करीत असू, पण ते “आपले” लोक आहेत अशा भावनेने जर करीत असू तर त्याची किंमत एकाच मनुष्यावर पण नि:स्वार्थपणाने केलेल्या उपकारापेक्षा कमी मानता येईल. स्वार्थाने आणि अहंभावाने एकाद्या संग्रामात मिळविलेल्या द्ग्विजयाची किंमतही एका अनाथ विधवेस दु:खातून मुक्त करणे, निराश्रित वृद्धाची आजारात शुश्रुषा करणे, अनीतीच्या आडवाटेने अडखळणा-यास सरळ वाट दाखविणे, किंबहुना तान्हेलेल्यास पेलाभर पाणी देणे ह्या साध्या दिसणा-या गोष्टीहूनही कमी आहे.
ईश्वराची आराधना करणे म्हणजे तो मनुष्यासारखा स्तुतिप्रिय आहे, किंवा मनुष्याप्रमाणेच काही तरी इकडचे तिकडे त्याला खूष ठेवण्याची जरूरी आहे, अशातला मुळीच प्रकार नाही, किंवा वरील जे उपकाराचे प्रकार सांगितले ते वेळप्रसंग पडल्यास त्यांची फेड इतरांकडून आपणास व्हावी अशा बुद्धीने करावेत असेही नाही तर दुस-याची दु:खे आणि गरजा पाहून आपल्यामध्ये अनुकंपेची जी प्रेरणा होते, ती ईश्वरानेच केलेली एक सूचना असे समजून ती मानली पाहिजे, एरवी ईश्वराच्या स्तुतीचे उगीच अवडंबर माजवून त्याची आज्ञा न पाळल्यास त्याची उपासना केली असे कधीच होणार नाही. अशी फाजील स्तुती व तोंडपुजेपणा साधारण मनुष्यालाही आवडत नाही, मग सर्वज्ञ परमेश्वरास तो कसा गोड लागेल?
ह्या वरील विवेचनावरून प्रपंच आणि परमार्थ ह्यांमध्ये एकवाक्यता कशी आहे हे दिसून येईल. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ ही निरनिराळ्या स्थळी आहेत ही जशी अडाणी समजूत आहे, तशीच प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न मार्ग आहेत, ही अडाणी समजूत आहे. हे दोन भिन्न नसून एकच आहेत.