महाराष्ट्र सुधारक आगळा
साखरेचा मासा पाणियात पोहे| ऐसे कधी होय सांगा वेगी||१||
मेणाची न्हाणूली आगीमध्ये न्हाये| ऐसे कधी होय सांगा वेगी||२||
स्वप्नींची अंतूरी जागेपणी पाहे| ऐसे कधी होय सांगा वेगी||३||
बहुरूपी राजा परचक्र साहे| ऐसे कधी होय सांगा वेगी||४||
अज्ञानाची पूजा मोक्षासि खोळंबा| कधी सोडाल बा सांगा वेगी||५||
राममोहनाने बंगाल्यात भक्तीची व ज्ञानाची आणि त्या पायावर सुधारणाकर्माची घटना केली. तिचे नाव ब्राह्मसमाज. ही चळवळ महाराष्ट्रात इ. स. १८६७ साली प्रार्थनासमाज आणि १८७३ साली सत्यशोधक समाज उर्फ सार्वजनिक सत्यधर्म ह्या नावाने सुरू झाली. पण ह्या दोहीनाही यावे तसे यश आले नाही. कारण केवळ महाराष्ट्रातील अपवित्र दुही. बंगाली राष्ट्र एकजिनशी आहे. महाराष्ट्रात जातींचीच नव्हे तर वर्गांची बजबजपुरी अजूनी गाजत आहे. न जाणो हे दोन्ही नवशिके समाज कदाचित मावळतील, पण ही बजबजपुरी किती दिवस राहील हे सांगवत नाही. निदान ह्या दुंडा राक्षसीला घालवून देण्यात दोन्ही समाज आज तरी पंगू झालेले भासत आहेत. जोपर्यंत ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्यांची सांगड जमत नाही आणि ह्या सांगडीवर बसून बहुजनसमाज भवनदी तरत नाही, तोपर्यंत असल्या शाब्दिक चळवळी झाल्या काय व गेल्या काय सारखेच. अशा चळवळी साखरेच्या माशाप्रमाणे गोड असतील पण भवनदीत टिकाव कसा लागेल! इतर चळवळी सांगावयाला नकोच. त्यांचा नुसता चिवडा झाला आहे. त्यात लहान मोठे पडले आहेत. पण त्यांनाही निश्चयाने धार्जिणे नाही. कमी अधिक तकलुपी आहे.
(चाल-न्याहारीचा वकुत होईल)
ऐका हो कीर्ती ह्यांची| हल्लीचे चिवडेवाले||धृ||
भले भले किती तरि मोठे| नामांकित नाणवलेले
लोकमान्य लोकांशीही| रायांशी लाडके साले
असले हे गोड दुधारी| राजकारणाचे भाले
हे राज्यचक्र फिरविती
संसारही पण सुधरीती
तारिती धर्म-नय-नीति
सारेचि काही हे करिती| हल्लीचे चिवडेवाले||१||
वार्तापत्राचा निकटा| जनमना लाविती चटका
काव्य नाट्य साहित्याची|कधि मधी गोडशी गुटिका
साह्यार्थ जुन्या धर्माच्या| कधि वेदांताचा फटका
रायांच्या अवती भवती
अल्पांच्या पुढती पुढती
बहुजनात सवेचि शिरती
हे सर्वगामी फिरती| हल्लीचे चिवडेवाले||२||
लोकांचे शिक्षणरूपी| घेतात पसारभर पोहे
ग्रामोद्धाराचे त्यात| मिसळती फुटाणे पाहे
चालत्या राजकारणाची| चटणी तर सवंग आहे सत्याचे चिवडे केले
आग्रह-पाटित ते भरले
सर्वाहि पुढे फिरवीले
हल्लीचे चिवडेवाले| धावती कसे लवलाही||३||
जे सत्याग्रहार्थ झटले| ते कारागृहात कुजती
लोकांचे सेवक कोण| कोठले| कुणा माहीती
जे खरे लोक उपदेष्टे| गत झाल्या त्यांच्या गोष्टी
उरले हे छंदी फंदी
चालत्या क्षणाचे बंदी
जन, त्यांचे चरण मी बंदी
सत्याग्रह चिवडा चंदी| त्यासाटी सदा भुकेले||४||
युगि युगांतरी जे येती| ते नव्हत कधी हो असले
अल्लाचे प्यारे होती| लोकातील साळे भोळे
त्या काव्य कुशलता नाही| ना पंडितगिरिचे चाळे|
त्यांचेच आज करू स्मरण
फेडू की प्रेमाचे रीच
मग मरूनि जाऊ ते मरण
ह्या जगताचे पुरे, पुरे सोहाळे हल्लीचे चिवडेवाले||५||
ह्या चिवडेवाल्यांची चलती आजकाल सर्व जगभर आहे. ह्यांची धूळ देवधर्म सांदीत लोटीत आहे. कोठे देवालाच धुडकावून तर देवाला तमाशातले सोंग देऊन हे चिवडाचंदी दैत्य मतलब साधीत आहेत. ह्या नगा-याच्या घाईत राममोहनांची सारंगी ऐकू येत नाही, जोतिबाच्या तुणतुण्याला कोण पुसतो?
महाराष्ट्र सुधारक आगळा
सत्याचा पालनवाला| हा धन्य जोतिबा झाला
पतिताचा पालनवाला| हा धन्य महात्मा झाला
जन्माचा मलाकार
कर्माची खडी तलवार
जनतेचा जागा शेर
त्या समान कोण तो बोला| हा धन्य जोतिबा झाला||१||
बोलीचा रोकडा मेख| चालीचा कणखर रेख
सत्याचा पाठीराखा| धर्माचा की जिव्हाळा
धन्य धन्य जोति फुलारी
शाद्बिकांसि झाला भारी
दीन दुबळ्यांचा कैवारी
किती वानू त्याच्या लीला| हा धन्य जोतिबा झाला ||२||
किती झाले जे छळ सगळे| परि हासुनि ते गिळियेले
लोकभ्रम निर्दाळीले|वर्णाश्रम केला उजळा
कुणि शिकुन शहाणे ठरले
कुणि विकुन पुढारी बनले
कुणि भिकून महात्मे झाले
सच्चा हा सेवक आगळा| हा धन्य जोतिबा झाला||३||
वेदांनी देव चोरियला| बुव्वांनी धर्म बाटविला
शहाच्यांशी संशयो झाला| मग धन्य ज्योति उदेला
महाराष्ट्र हा ज्ञानेशाचा
महाराष्ट्र हा तुक्याचा
जोतिबा हा लोकांचा
परि सरळा सेवक विरळा| महाराष्ट्र सुधारक आगळा||४||
इतका जर जोतिबा मोठा होता तर तो मागे कसा पडला बरे? आजकाल पुढे यावयाला इंग्रजी चांगले आले पाहिजे आणि इंग्लंडला जाऊन आले पाहिजे. जोंतिबाची ही बाजू लंगडी होती. त्याला संस्कृत येते, निदान तो ब्राह्मण जन्मून जादूटोणा जरी करिता, तरी तगला असता. तळेगाव ढमढेरे येथील न्हावी लोकांमध्ये त्यांनी मोठी चळवळ केली. स्वावलंबन शिकविले. विधवांचे वपन करू नये ही त्यांची शिकवण. पण भुजबळ नावाच्या एका जादूटोणेवाल्याला हे खपेना. त्याने जोतीला चांगला शह दिला. तेव्हा सनातन्यांनी विधवांचा पक्ष सोडून भूजबळाला पुढे केले. वगैरे वृत्तांत हल्लीच्या समाजसेवकांना स्पृहणीय आहे.