मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती-२
काय ते विरक्ति न कळे आम्हां| जाणे एका नामा देवाजीच्या||
नाचेन मी सुखे संतांचिये मेळी| दिंडी टाळ घोळी आनंदीया||
कासया उदास होऊ देहावरी| अमृतसागरी बुडोनिया||
कासया एकांत सेवू तया वना| आनंद या जनामाजी असे|
तुका म्हणे मज आहे हा भरंवसा| विश्वेश सरसा चालतसे||
सभोवतालच्या मनुष्यांविषयी आदरबुद्धी राखिली, म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा आपण कशी संपादन करतो हे मागे सांगितले. आता मनुष्यावर प्रीती केली म्हणजे ईश्वरविषयक भक्ती कशी वाढते हे आपण पाहू.
एकाचा दुस-याशी जो स्नेहसंबंध जुळतो तो केवळ कर्तव्यबुद्धीचा किंवा शासनाच्या किंवा कसल्याही दाबामुळे ओढूनताणून आणलेला नसतो, तर तो एक मनाचा स्वाभाविक ओढा असतो. स्वार्थत्याग करून जगाच्या कल्याणाकरिता स्वत:ची आहुती देणे ह्यापेक्षा खाजगी स्नेहसंबंध वाढविणे हा ईश्वरभक्तीचा सुलभ उपाय आहे. ह्या स्नेहसंबंधामुळेच एक व्यक्ती दुस-या व्यक्तीशी गुंतलेली दिसते. ह्यामुळे जगामध्ये आनंद दृष्टीस पडतो. ह्यांच्या अभावी सर्वत्र अंध:कार दिसेल. ह्याकरिता हा संबंध वाढविण्याची योग्य खबरदारी घेणे हे एक आपले परमार्थाचे दुसरे प्रापंचिक साधन आहे.
ज्या दोन व्यक्तींमध्ये निष्काम स्नेहाचा पवित्र संबंध जडतो, त्या दोघांमध्ये सारखेच गुण असतात असे नाही. दोघांमध्ये भिन्न भिन्न सुंदर गुण असून एकाचे गुण आकर्षण करण्याची चुंबकशक्ती दुस-यामध्ये असते. किंबहुना एकमेकांच्या काही क्षम्य उणेपणामुळेही ही परस्पर चुंबकता जोरावते. ‘व्यतिषजति पदार्थानांतर: कोपिSहेतु:’ ह्या न्यायाने केव्हा केव्हा ह्या आकर्षणास विषय झालेला असा जो काही गुण असतो, तो दोघांसही न कळता, गुणांची छाया-प्रतिछाया, तन्मूलक भावनांचा आघात-प्रत्याघात परस्परांमध्ये होऊन त्या दोघांचेही दोष कमी कमी होत जाऊन गुण वाढत जातात, आणि भिन्न स्वभावाला हळूहळू एकात्मकता येऊ लागते. दोघांच्या भिन्न आदर्शाचे प्रतिबिंब परस्परांच्या मनांमध्ये पडून दोन निरनिराळे स्वभाव नसून ते जणू काय एकच आहे असे होते. योद्धा आणि कवी, मुत्सद्दी आणि तत्त्ववेत्ता, कर्ता पुरूष आणि लेखक, अशा भिन्न गुणांच्या मनुष्यांमध्ये स्नेह जुळून दोघांनाही स्वत:च्या आदर्शाची परिपूर्ती करावयास वाव मिळतो. ह्याप्रमाणे स्नेहाच्या ह्या दोन क्रिया आहेत. एक उणीव भरून काढणे आणि दुसरी आदर्श पूर्ण करणे.
रस्त्यात खेळत असताना लंगोटीयार एक, शाळेतला सोबती दुसरा, तरूणपणी तिसरा आणि वृद्धापकाळी निराला असे स्नेहसंबंध केव्हा केव्हा बदलत जातात, ह्यावरून त्याचे वर दर्शविलेले मूळ स्वरूप अस्थिर आणि खोटे आहे असे होत नाही. रस्त्यातल्यापेक्षा शाळेतला सोबती आपल्या मनाशी अधिक तादात्म्य पावतो. शाळेत स्वत: आपल्या मनाची वाढ आणि भूक वाढल्यामुळे संसारात शिरल्यावर आपल्यास शाळेतल्याहून थोर सोबत्याची जरूरी भासते. आणि वृद्धपणी ह्याहूनही निराळ्या सोबत्याची उणीव भासते. ह्यावरून स्नेहतत्त्वाचा अस्थिरपणा सिद्ध होत नसून ते विकासमान तत्त्व आहे हे दिसून येते. आपल्या स्वभावाची जसजशी वाढ होते तसतसे आपण निरनिराळे मित्र करीत असतो आणि उलटपक्षी जसजसे आम्ही निरनिराळे मित्र करू तसतशी आपली वाढ होत जाते. म्हणजे एका पायरीवरून दुसरीवर, दुसरीवरून तिसरीवर अशी आपण आत्मिक चढण चढत असतो. म्हणून ह्या अपूर्व संसारामध्ये स्नेहसंबंध ही पवित्र बाब आहे आणि तिचे अन्तिम पर्यवसान ईश्वरभक्तीमध्ये होणार असल्यामुळे ती एक आध्यात्मिक शिडीच होय.
प्रसिद्ध इंग्लिश राजकवी टेनिसन ह्याने “In memoriam” ह्या आपल्या काव्यात मित्रवियोगाच्या आपल्या दु:सह वेदनांचे जे काळीज करपून सोडणारे आणि डोळ्याला अंधेरी आणणारे वर्णन केले आहे ते वाचून वाचकांच्या मनाला प्रथम त्याच्या सत्यत्वाबद्दल किंचित शंका येऊ लागते. मरण हे सर्वांनाच येणार म्हणून मातेला कितीही सांगितले तरी ती आपल्या मुलाच्या मरणामुळे आक्रोश करणारच. पत्नी पतीकरिता, बंधू बंधूकरिता शोक करील, पण मित्र मित्राकरिता इतका शोक करील हे खरे वाटत नाही. हे कवीचे लाघव असेल असे वाटते. जात्या भ्याड कवी वीररसात्मक काव्य लिहिताना कल्पनेने ज्याप्रमाणे शौर्याची भावना आपणांमध्ये आणतो, त्याप्रमाणे टेनिसनने कवित्वाच्या जोरावर हे काल्पनिक वर्णन केले असावे असे प्रथम वाटते, पण अधिक विचार केल्यावर आणि त्या काव्याचे पुन:पुन्हा परिशीलन केल्यावर, त्या कवीचे नव्हे, तर साधारण मानवी कल्पनाशक्तीच्या संबंधानेही आपण फार कोती समजूत करून घेतली असे दिसून येईल. टेनिसनला खरोखरच दु:सह वेदना झाल्या, ह्याचे कारण त्याचे आपल्या मित्रासी तसेच अभेद्य तादात्म्य झाले होते आणि त्याचा भंग झाल्यामुळे त्याला वेदना होत होत्या. अशा तादात्म्याचा ज्यांना अनुभव नाही आणि कल्पनाही नाही त्यांना ते वर्णन नुसते कवीचे लाघव वाटणे साहजिक आहे. मित्राच्या जिवास त्याचा जीव लागून गेल्यामुळे व त्याशी एकाकार झाल्यामुळे त्याच्या वियोगामुळे आपले अर्धे अंग कापून गेल्याप्रमाणे त्यास वेदना होऊन लागल्या. परंतु ह्या वेदनांमुळे त्याला नुसता प्राकृत माणसाप्रमाणे शोकच होऊन राहिला असे नाही. शोक तर झालाच, पण क्रमाक्रमाने त्यामध्ये अति गंभीर विचारजागृती होऊन हळूहळू थोर तत्त्वांचे दर्शन होऊ लागले. विरह, उद्वेग, निराशा, विचार, शंका, आशा, श्रद्धा आणि शेवटी आनंद अशी त्याच्यामध्ये आध्यात्मिक अनुभवाची परंपरा उत्पन्न झाली. ज्या मित्रावर आपण जीव की प्राण असे प्रेम केले तोच जणू आपल्या आकुंचित कुडीतून उडून जाऊन दशदिशा फाकला, जो आपल्या प्रेमाचा साठा आणि विनाशी विषय होता तो आता सर्वत्र पसरलेला आणि अनंत काळ टिकणारा असा झाला. अज्ञेयवादी टेनिसन स्नेहसंबंधाच्या प्रभावामुळे किंबहुना त्याच्या विरहामुळे श्रद्धाळू आणि आनंदवादी भक्त बनला.
असा आमच्या ह्या प्रापंचिक स्नेहाचा महिमा आहे. तो संबंध आम्ही निष्ठेने जर चालवू तर तो फलदायी होईल. कोणी म्हणेल स्नेहसंबंध ही स्वाभाविक बाब आहे तर तेथे निष्ठेची काय जरूर आहे? तो आपोआप वाढत जाईल. पण मनुष्यस्वभावामध्ये जशी संघातक तशीच विघातकही बीजे आहेत. आणि कित्येक वेळां जसे आंतरिक दोषामुळे तसेच बाह्य उपाधीमुळेही आपल्या स्नेहाच्या प्रवाहात विक्षेप घडतो. अशा वेळी आपल्या अंगी निष्ठेचे बळ असल्यास ह्या विघ्नातून आपण पार पडू. प्रवाहातून पोहत जाणारा मनुष्य भोव-यात सापडला असता त्याच्या अंगी कस असल्यास तो त्या भोव-यास फोडून बाहेर पडतो. एरवी त्यातच बुडून जातो. त्याप्रमाणे आपण स्नेहसंबंध निष्ठेने चालविण्याचे बळ अंगी संपादिले तर अंतर्बाह्य कारणामुळे वेळोवेळी घडणा-या ह्या आमच्या स्नेहसंबंधाच्या प्रवाहातील विक्षेपाच्या भोव-यामधून आम्ही पार पडू. एरवी तो संबंध मध्येच तुटून गेल्याची अनेक उदाहरणे आढळतात. अशा रीतीने आमरण स्नेहसुख भोगून जर मित्रवियोग घडला तर तो वियोगच, टेनिसनला अनुभव आल्याप्रमाणे, ईश्वरी दर्शनास कारण होईल. ह्याप्रमाणे परलोकाप्रत गेलेल्या आपल्या मित्रावर निष्कामवृत्तीने केलेल्या प्रेमामध्ये अविनाशी अनंत भक्तीची बीजे कशी रूजलेली असतात हे कळेल. सुरवंटाचा जसा पतंग बनून तो सर्वस्थळी आनंदाने वावरू लागतो, तसा आमचा विदेही मित्र सर्वव्यापी झाला असता आमचे मनही त्याच्या मागोमाग भ्रमण करीत सर्वव्यापी होते. ह्यापरती ईश्वरभक्ती वेगळी कोठे राहील? अशा मित्राचा वियोग झाला तर काही वेळ आपण गडबडून जाऊ, पण पुढे विवेकासहित आपल्यामध्ये वैराग्याचे बळ उत्पन्न होऊन, सर्व जग माझा मित्र आहे असे आपणांस वाटेल. आपली आकुंचित वृत्ती नष्ट होईल, आपणांस आनंदीआनंद होईल. असे सुखवादी झालो म्हणजे आपण ईश्वरभक्त झालो असे म्हणावयाचे. मग तुकारामाने सांगितल्याप्रमाणे-
ऐसे भाग्य कई लाहाता होईन| अवघे देखे जन ब्रह्मरूप||
मग तया सुखा अंत नाही पार| आनंदे सागर हेलावती||
हा अनुभव आपणांस येईल. पण त्यासाठी अगोदर आपण आपल्या भोवतालच्या मनुष्यामध्ये स्नेहसंबंधाचे वलय वाढवावे. मनुष्यावर प्रेम न करता मी ईश्वराचा भक्त आहे असे कोणालाही म्हणविता येणार नाही. ह्याकरिता राजाने प्रजेवर, पतीने पत्नीवर, धन्याने चाकरावर हाच स्नेहसंबंध प्रेम किंवा निष्ठा ठेवून वाढवावा. म्हणजे त्याचा लय ईश्वरभक्तीमध्ये होईल.