मागासलेले व अस्पृश्य
[विठ्ठलराव शिंदे, निपाणी येथे १९१६ साली भरलेल्या मागासलेल्यांच्या परिषदेस गेले होते. तेथून परत आल्यावर ते लोणावळे येथे सर नारायण यांच्या भेटीस गेले होते. त्यावेळी झालेले संभाषण].
विठ्ठलराव शिंदे- मी, निपाणी येथे नुकतीच जी मागासलेल्या वर्गाची परिषद झाली तिच्या बैठकीस गेलो होतो. ही परिषद पन्नास वर्षांपूर्वी जोतिबा फुले ह्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या तर्फे भरली होती. परिषदेचां पुढाकार कोल्हापूरचे भास्करराव जाधव ह्यांनी घेतला होता. परिषदेला पुष्कळ लिंगायत व जैन गृहस्थ आले होते. ब्राह्मणांच्या विरूद्ध परिषदेचा कटाक्ष होता. सुमारे १५०० माणसे जमली होती. त्यात वरील गृहस्थांशिवाय माळी, तेली वगैरे जातींच्या लोकांचा अधिक भरणा होता. अस्सल मराठे जे आपल्याला क्षत्रिय म्हणवितात त्यांच्यापैकी फार थोडे लोक परिषदेस हजर होते. दोन दिवस परिषदेची बैठक चालू होती. अनेक ठराव पास झाले, त्यात ब्राह्मणांना कुटुंबातील पुरोहितपणाचीकार्य करावयास बोलावू नये. मागासलेल्या जातीत शिक्षणाचा प्रसार जारीने करण्याचे प्रयत्न करावे हे मुख्य विषय होते. ब्राह्मणांच्या विरूद्ध ह्या परिषदेतून पुष्कळ भाषणे झाली. ह्या परिषदेनंतर मागासलेल्या वर्गाच्या राजकीय हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे त्याचा विचार करण्यासाठी निराळी राजकीय परिषद भरली होती.
सर नारायण- पण काय हो, ह्या परिषदेत अस्पृश्य वर्गाच्या लोकास येण्याची परवानगी होती काय?
विठ्ठलराव शिंदे- त्यांचेकडून परवानगी मिळणे शक्य नाही, हे जाणूनच त्या वर्गातील कोणी लोक आले नाहीत.
सर नारायण- तुम्ही तर अस्पृश्यता निवारक मंडळीचे चिटणीस, त्यांच्या उन्नतीसाठी झटणारे आणि मग येथे अस्पृश्यांना मज्जाव होता अशा परिषदेला तुम्ही हजर कसे राहिलात.
विठ्ठलराव शिंदे- त्यांनी आपल्या परिषदेचे मला आमंत्रण दिले आणि मी गेलो. माझ्याप्रमाणे सव्हँट ऑफ इंडिया सोसायटीचे नारायणराव जोशीही आले होते. परिषदेनंतर कित्येक जैन, लिंगायत व इतर गृहस्थांनी आपल्या मिशनच्या शाळा येऊन पाहिल्या. परंतु ते आपल्या परिषदेमध्ये अस्पृश्यांना येऊ देणार नाहीत, आमच्या सारख्यांची त्यांना सहानुभूति हवी आहे म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रणे पाठविली इतकेच.
सर नारायण- पण ह्या लोकांना अस्पृश्यांसंबंधी काही सहानुभूती तरी वाटते काय?
विठ्ठलराव शिंदे- त्यांना काही सहानुभूती वाटते असे मला वाटत नाही. माझा तर असा अनुभव आहे की, मागासलेले म्हणून आपल्याला म्हणविणा-या लोकांपेक्षा अस्पृश्यांच्या उद्धाराविषयी ब्राह्मणांनाच अधिक कळकळ वाटत असून त्यांचीच ह्या कामी अधिक सहानुभूती आहे.
सर नारायण- दक्षिणप्रांती मी गेलो होतो तेव्हा मलाही तुमच्यासारखाच अनुभव आला.