सह्याद्रीवरुन१
क्षितिजाचे सुंदर आणि विशाल वलय-जणू जमीन अस्मानाचे गाढ आलिंगनच- अहोरात्र दिसते त्याच ठिकाणी शांती आणि शोभा ह्या दोन्ही जुळ्या बहिणींचे चिरसाम्राज्य पहावयास मिळते. महर्षींनी स्थापलेले शांतिनिकेतन ह्या साम्राज्याचे एक सिंहासनच होय!
भोवताली भला मोठा ओसाड उघडा माळ आहे आणि मधअये सुमारे २ एकर जमीन ह्या निकेतनासाठी पसंत करून महर्षींनी ती आता तरूलतांनी गजबजून टाकिली आहे. आम्र, अशोक, देवदार इत्यादी प्रकारचे गगनचुंबी वृक्ष एकमेकांच्या खांद्यावर आपले प्रशस्त बाहू ठेवू ठेवून डोलत आहेत. मध्यभागी महालवजा दोनमजली पक्की आणि भव्य इमारत आहे. तिच्यासमोर बागेत टुमदार, स्वच्छ, शुभ्र संगमरवरी दगडाचे ब्राह्ममंदिर आहे. त्याचे अग्रभागी मोकळा मंडप असून त्यावर लोहशलाकाचे नाजुक, निमुळते, गोल घुमट आहे. मंदिराच्या चारी भिंती भिंगाच्याच असल्याने उपासनेस बसले असताही चहूबाजूंचा दूरवर देखावा दिसतो. उपासकांसाठी रांगेने आसने मांडली असून, मध्यभागी वेदीसाठी एक लहानसा संगमरवरी चौरंग आणि त्यावर दोन शुभ्र शंख ठेविले आहेत. भिंतीला लागूनच चारी बाजूंनी प्रधक्षिणा करण्याकरिता येण्यासारखी उंच चबुत-यावरून वाट आहे. त्यानंतर चोहोंकडून थोडीशी मोकळी जागा राखून, भोवताली छातीइतका प्राकार आहे. मंदिराच्या दारावर अँ हे अक्षर लावलेले असून त्याच्या खालील कमानीवर पुढे दिल्याप्रमाणे त्याचा अर्थ लिहिला आहे.
सर्वे वेदा यत्पदमामनंति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति|
यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरंति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योत्येतत् ||१||
बाहेरील बागेत जागजागी सुंदर वृंदावने आणि कुंड्या आहेत. त्यांच्या बाजूंवर उपनिषदांतील गंभीर उतारे व लहान मोठी वचने उल्लेखिली आहेत. त्यांपैकी खाली लिहिलेले अवतरण वाचून तर ह्या स्थळाचे महत्म्य मनात चांगले बाणते.
“एष सेतुर्विधरण एषां लोकांनामसम्भेदाय |
नैनं सेतुमहोरात्रे तरतो न जरा न मृत्युर्न शोको न सुकृतं न दुष्कृतं|
सर्वे पाप्मानोSतो निवर्तन्तेSअपहतपाप्मा ह्येष ब्रह्मलोक:||”
इ. इ. ही वचने वाचीत प्रेक्षक अगदी बाहेरील दाराजवळ आला असता भिंतीत बसविलेला खालील लेख वाचून ह्या आश्रमाच्या उदार आणि पवित्र हेतूची त्याला कल्पना येते इतकेच नव्हे तर ही स्वर्गीय तत्त्वे खुद्द त्याच्या अंत:करणात खोल रूजू लागतात:
“सर्वेषामेवास्मिन् शांतिनिकेतने ब्रह्मोपासनायामधिकार: इह खल निराकारमेकं ब्रह्मैवोपासीत| संप्रदायप्रथितां देवमूर्ति मनुष्यं पशुं पक्षिणं प्रतिकृतिं लिंगं देवप्रतीकं च नाचयेत| नापि पावकं जुहुयात् धर्म स्वोदरं वा समुद्दिदश्य किमपि भूतं मा हंस्यात्| आमिषं मद्यपानं विवर्जयेत्| कस्याप्युपास्यं नावमन्येत| ब्रह्मयोगं मैत्री शमादिकं च परामृश्य समुदपदिशेत्| ब्रीडाकरं प्रमोदं चोतसृजेत|
ह्या निकेतनातील मुख्य प्रेक्षणीय भाग म्हणजे उपरिनिर्दिष्ट सप्तपर्ण वृक्षच होय.
महर्षींचे हे अत्यंत आवडीचे स्थान होते. ह्या आश्रमात चोहींकडेच पण विशेषत: ह्या ठिकाणी महर्षींचा पुण्यात्मा जणू घेर घालीत आहे असा भास होतो. ह्या जीर्ण वृक्षाचे तळाशी जेथे महर्षी नेहमी बसत तेथे आता एक सुंदर संगमरवरी वेदी बांधली आहे. तिच्या शिरोभागी ‘तिनि अमार प्राणेर आराम, मनेर आनंद, आत्मार शांति’, हे शब्द आहेत. ह्या वेदीवर बसले असता सुमारे १०-१२ पावलांवर एका संगमरवरी स्तंभावरील फलकावरची ‘शांतं शिवमद्वैतम्’ ही अक्षरे डोळ्यांत भरतात. तेथून हालावेसेच वाटत नाही.
मंदिरात दररोज प्रात:काळी ७ वाजता नित्याची उपासना होते, त्यासाठी एके आचार्य व दोन गायक ह्यांची नेमणूक झाली आहे. एरव्ही वाटेल तेव्हा वाटेल त्यास ध्यान, भजन तेथे करता येण्यासारखे आहे. दर बुधवारी व गुरूवारी मुख्योपासना होतात, त्या बाबू रविंद्रनाथ हे चालवितात. त्यावेळी येथील ब्रह्मचर्याश्रमातील १२५-१५० विद्यार्थी सर्व हजर असतात. पौष्य मासी (डिसेंबर) दरवर्षी येथे एक मोठी जत्रा भरते, तेव्हा आजूबाजूच्या खेड्यांतील ३-४ हजार खेडवळ जमून जुन्या जत्रेतलेच निरनिराळे खेळ करून १-२ दिवस करमणुकीत घालवितात.
ह्या ठिकाणी महर्षींची समाधी कशी नाही, ह्याचे आश्चर्य वाटल्यावरून शोधाअंती त्यांचे नातू द्विपेंद्र बाबू ह्यांनी असे कळविले की आपल्या रक्षेवर समाधी, थडगे अगर कोणतेही स्मारक कोठेही उभारू नये अशी महर्षींनी अगदी कडकडीत आज्ञा दिली आहे, भोवतालच्या खेड्यांतील लोकांत महर्षींसंबंधी इतका अलोट आदर आहे की, ह्या निराकाराच्या निष्काम आणि एकांतिक भक्तांची ही शेवटची इच्छा जर पूर्णपणे पाळली गेली नाही तर त्यांचे देव्हारे हा हा म्हणता माजतील, ह्यात तिळमात्र संशय नाही.
सह्याद्रीवरून – १
मंगळूर अथवा दक्षिण कानडा हा मद्रास इलाख्यातला वायव्येकडील अगदी कोप-यात खुपसलेला शेवटचा जिल्हा आहे. मुंबईकडे यावयाचे तर आगबोटीचाच काय तो मार्ग सोयीचा आहे. पावसाळ्यात चारपाच महिने तो बंद असता आगगाडीने यावयाचे ते दक्षिणेकडे उलट कोईमतूरपर्यंत ४०० मैल खाली जाऊन पुन्हा जवळ जवळ मद्रासचे बाजूने आणखी ४०० मैल पूर्वेकडे जाऊन जालारपेठ, बंगलोराहून पुण्यास येण्यासाठी एक द्राविडी प्राणायाम करावा लागतो. अलीकडे मोटारीची वाहतूक सुरू झाल्यापासून सह्याद्री ओलांडून हरिहरपर्यंत जवळचा पण दगदगीचा असा एक तिसरा मार्ग उघडा झाला आहे. उंच टेकड्या व खोल द-या, किर्रर्र झाडी व अगदी छातीवर येणारा बिकट घाट, नद्या, नाले, शेते व बागा इ. विविध देखाव्यामुले हा मार्ग अतिशय रमणीय आहे. इतकेच नव्हे तर गेल्या दोन अडीच हजार वर्षांत घडलेल्या बौद्ध, जैन, शैव आणि वैष्णव धर्माच्या झटापटींचे रणांगणही ह्याच कोप-यात विशेष खुलून दिसण्यासारखे असल्याने इतिहासभक्ताला तर हा मार्ग काशीयात्रेप्रमाणे पवित्र वाटतो. म्हणून मला ह्याच मार्गाने येण्याचा जो मोह पडला तो, बरोबर माझी बहीण, एक लहान मुलगा व बरेच सामानाचे लटांबर असतानाही मला काही केल्या आवरता येईना. शेवटी आम्ही तिघे ता. ९ एप्रिल रोजी आपले गाठोडे बांधून मंगळूराहून पूर्वेकडे सह्याद्रीवर डोळा लावून निघालो. तेव्हा पोहोचवावयास आलेल्या काही मित्रांना हासूही ले असावे, पण आमच्या धाकामुळे ते त्यांनी गालातल्या गालात दाबले असावे.
मुडबिद्री
त्याच दिवशी दोन प्रहरच्या सुमारास आम्ही सुमारे बावीस मैलांवर मुडबिद्री येथे पोहोचलो. हा गाव जैनांचे एक मोठे क्षेत्र आहे. ह्याला जैनांची दक्षिण काशी असे म्हणतात. ह्याचे वर्णन मी गेल्या वर्षी एका पत्रात केलेलेच आहे. मूळ नाव मुडबिहार म्हणजे पूर्वेकडील ठाणे असे आहे. विजयनगरची सत्ता स्थापन होण्यापूर्वी भैरवराय उर्फ बैरासू नावाच्या जैन राजघराण्याची सत्ता इकडे निरंकुश होती. त्याचकाली बांधलेली चंद्रनाथ नावाच्या तीर्थंकराची येथे एक साविरखंब (हजार खांबांची) ह्या नावाची बस्ती उर्फ देऊळ आहे. विस्तीर्ण, सुंदर आणि कोठेही भंग न पावलेल्या स्थितीत अद्यापि उरलेली ही बस्ती पाहून टिपू सुलतानासारख्या सर्वध्वंसक परकीयांचे आभार मानावेत की असली उत्पन्नाची इतर ठिकाणे गट्ट करून हल्ली गबर बनलेल्या स्वकीय पण सर्वभक्षक ब्राह्मण पुजा-यांचे अधिक आभार मानावेत ह्याचा काही सहज उलगडा होऊ शकत नाही. ह्याशिवाय येथे आणखी अठरा बस्त्या आहेत. त्यात गुरूबस्ती नावाची सर्वात मोठी व मानाची एक बस्ती आहे. येथील हल्लीची ४०००-५००० लोकवस्ती खाऊनपिऊन सुखी दिसते. येथे अद्यापि जैनांचेच प्राबल्य आहे. जमीन व व्यापार त्यांच्याच हाती आहे. पण विद्या आणि धर्माचे स्वरूप मात्र केवळ उपचारात व सोवळेपणात उरले आहे. हल्लीच्या इमारती जरी ५००-७०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन दिसत नाहीत, तरी जैनधर्माची व संस्कृतीची ह्या प्रांतातील घडलेली प्रभावशाली कारवाई पाहाता हे ठाणे बरेच प्राचीन असावे असे वाटते. पडुबुद्री (पश्चिमेकडचे ठाणे) नावाचे समुद्रकिना-याजवळ दुसरे एक ठाणे आहे. त्यावरून म्हैसूराकडून जैनांचा धर्म व त्यांची राजसत्ता सह्याद्री ओलांडून जी पश्चिमेकडे वळली त्या ओघाचे हे टप्पेच असावेत असे वाटते. येथे जैन राजाचे लष्कर होते असे सांगतात. चंद्रनाथाच्या उठावदार बस्तीचा कोट शाबूत आहे. बंदूक ठेवून मारण्यासाठी धिप्पाड भिंतीला जी पल्लेदार ऐसपैस भोके आहेत, त्यावरून त्या ठिकाणावर मागे कटकटीच्या काळी मोर्चे बंदी होत असावी अशी जबर शंका येते. ह्यावरून जैन धर्माची शिकवण कशीही असो, जैन राजे म्हणजे केवळ शेळपट होते असे दिसत नाही. देवळावरच जर मोर्चेबंदी तर त्यांनी आपल्या अहिंसावादाला हल्लीप्रमाणे बारा वाटा मोकळ्या ठेवल्या नसतील असा तर्क करावयास हरकत वाटत नाही. केवळ जमिनीसाठी किंवा इज्जतीसाठीदेखील स्थानिक जमीनदार आपल्या वै-यांचे अमानुष रीतीने खून करून पोलीसांनाही उलट बगलेत दाबल्यासंबंधीची इकडे बरीच प्रसिद्धी आहे. असो, तरी जैनसाधूंपैकी प्रत्येकाजवळ वाटेतील किड्यांवर पाय पडू नये म्हणून मोराच्या पिसांचा झाडू असतोच.
आज चैत्री पौर्णिमा असल्यामुळे चंद्रनाथाचा वार्षिक रथोत्सव होता. नुकतीच श्रवणबेळगोळा येथील गोमटेश्वराला अभिषेक करण्याच्या महापर्वणीसाठी म्हैसूराकडे महायात्रा झाली. म्हणून हिंदुस्थानातील दूरदूरच्या प्रांतांतून हजारो जैन यात्रेकरू तेथे जमले होते. त्यांपैकी बरेच आज त्या उत्सवासाठी येथे आले होते. रथयात्रा किंबहुना समग्र मूर्तिपूजेचा संभार आणि देवालयाची रचना ही हिंदूंनी जैन आणि बौद्धधर्मीयांकडूनच घेतली आहे हे जाणून मलाही हा रथोत्सव अनायासे पहावयास मिळतो त्याबद्दल आनंद वाटला. एका अजस्त्र रथावर कागदाच्या घोड्यांचे भव्य घुमटाकृती शिखर करण्यात आले होते. रात्री बाराला सुरू होऊन सुमारे तीन तास हा उत्सव चालू होता. रथापुढे वाजंत्री होते. पण देवदासी किंवा वारांगनांच्या नाचाचे दक्षिणेत जे सर्वत्र प्रस्थ माजले आहे ते येथे जैनांच्या कोणत्याच देवालयात दिसले नाही. बाकी सर्व थाट एकाद्या वैष्णव उत्सवाप्रमाणेच होता. मजुरांच्या खांद्यावर लांब-लांब बळकट वासे देऊन त्याला दहादहा बाराबारा दिवट्या लावल्या असून त्या दोहों बाजूंनी चालवून जी रोषणाई केली होती ती येथे मी नवीनच पाहिली.
येथील जैनसमाज मुख्यत: वैश्यवृत्तीचा व अशिक्षित असल्यामुळे त्याच्या दानशूरपणाचा ओघ देवभोळेपणाच्या वाळवंटातच गडप होत असल्यास नवल नाही. चलतीच्या काळी ह्या अठराही बस्तीतून किती ऐश्वर्याचे सोहाळे चालत असतील, ह्याची आता नुसती कल्पनाच करण्यापलीकडे मार्ग उरला नाही. पण हल्ली यात्रेच्या दिवसांतही ह्या विस्तीर्ण, सुंदर आणि धडधाकट देवालयांतून अगदी निर्जन एकांतवास दिसत होता! ह्यावरून जैन समाज इकडे कसा मागे घसरत आहे हे उघड होत आहे. एक जैन कोट्याधीश निपुष वारल्यामुळे, सरकारमार्फत त्याची मिळकत धर्मकार्यास लावून त्याच्या भव्य वाड्यात आता एक संस्कृत पाठशाळा चालविण्यात येत आहे. तिचे पुस्तकालय पाहिले. मुख्य उपाध्यायांना भेटलो. म्हणण्यासारखे विशेष काहीच दिसले नाही. प्राचीन ग्रंथ जुन्या कानडीत लिहिलेले बरेच आहेत असे ऐकले. पण ते सोवळ्यात ठेवलेले आणि वेळही फार नव्हता, म्हणून ह्या सोवळ्याच्या किल्ल्यावर हल्ला चढविण्याची दगदग केली नाही. हजार खांबांच्या देवळाची शिल्पकला मात्र पहाण्यालायक आहे. ती मात्र सोवळ्यात नसल्यामुळे पहाण्यास मिळाली. दक्षिण कानडा व मलबार ह्याला पूर्वी केरळ देश असे नाव होते. सर्व केरळी मुलूख पावसाळी व रेताड असल्याने दगडाची उणीव व लाकडांची चंगळ म्हणून ह्या सर्व भागातील देवळांचा अधिक भाग लाकडी आणि फार तर भिंती व खांब तेवढे लॅटराईट म्हणजे ठिसूळ दगडाचेच असावयाचे. पण ह्या भव्य देवळाच्या भिंती व खांब तांबड्या वाळूच्या भरीव व भक्कम दगडाचे व कलाकुसरीने भरलेले आहेत. म्हणून त्यांची प्राचीनता ७०० वर्षांपूर्वी फार नसावी असे वाटते. तथापि ह्याचे छप्पर लाकडीच आहे. त्याचा घाट शेजारच्या घाटावरील इतर प्रांतात कोठेही न आढळणारा व फक्त केरळ देशातच आढळणारा असा आहे. इतकेच नव्हे तर तो नेपाळ, तिबेट व ब्रह्मदेशातील छप्परांच्या घाटाशी अगदी तंतोतंत जुळतो. शिल्पशास्त्रज्ञ फर्ग्यूसन ह्याच्या दृष्टीने ही फार आश्चर्याची बाब आहे. म्हणून इकडील शिल्पकला ईशान्येकडून आलेल्या बौद्ध व जैन मिशन-यांनीच प्राचीन काळी आणिली असावी असा तर्क आहे. नेपाळातही पाऊस व लाकूड फार व दगड कमी, म्हणून तिकडचीच भौतिक परिस्थिती इकडे असल्यामुळे येवढ्याच कोप-यात हा प्राचीन अवशेष उरला आहे. जो घाट पूर्वी बहुतेक लाकडी असे तो कालांतराने मध्ययुगात दगडचुन्याचे उठविण्याचा परिपाठ पडला असावा असे जे फर्ग्यूसनचे म्हणणे आहे तेही यथार्थ दिसते. पण हा दगडी इमारती बांधण्याचा परिपाठ ह्या प्रांतात सात-आठशे वर्षापूर्वी नसावा.
कारकळ
मुडबिद्रीहून सुमारे १०-१२ मैलांवर कारकळ ह्या नावाचा तालुक्याचा गाव ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. ही पूर्वी बैरासू जैन राजघराण्याची राजधानी होती. कारकळ-करोकल्ल-काळादगड अशी ह्या नावाची कानडीत व्यत्पत्ती सांगतात. इमारतीसाठी काळा दगड येथे विपुल मिळतो. वस्तुत: मुडबिद्रीपासूनच सह्याद्रीच्या हातापायांचा पसारा आढळू लागतो व काळ्या दगडाच्या टेकड्या दिसतात. रामसमुद्र नावाचे एका सुंदर दरीस बांध घालून एक तळे केलेले आहे. ते रामराय ह्या राजाने बांधले असावे. ह्याच तळ्याच्या काठी पुण्याच्या पर्वतीसारखी एक टेकडी शहराला लागूनच आहे. तिच्या माथ्यावर “घुमटाराज” नावाचा कारकळचा प्रसिद्ध व अक्षरश: दिगंबर पुतळा उभा आहे. हा एकाच दगडाचा असूनही ४३ फूट उंचीचा आहे. अगदी नग्न सावयव शरीर, धीरोदात्त व प्रसन्न मुद्रा, साधे पण भरीव सौंदर्य, आणि भोवतालचे शांत वातावरण ही सर्व पाहून जैन धर्माविषयीच नव्हे तर शिल्पकाराविषयीदेखील अनुकूल अशी पूज्य भावना उत्पन्न होते. वेणूर नावाचे येथून १०-१५ मैलांवर एक लहानसे खेडे आहे. तेथेही एक असाच ३५ फूट उंचीचा पुतळा आहे. तिसरा सर्वात उंच असा पुतळा श्रवण-बेळगोळा येते ५६ फूट उंचीचा आहे. हे तिन्ही पुतळे (एकेकाच) दगडातून कोरून काढलेले आहेत, ही एक त्यातल्या-त्यात आश्चर्याची गोष्ट आहे. ह्या सर्वांना गोमटेश्वर अथवा घुमटाराज हेच नाव आहे. ह्या पुतळ्यांविषयी व पूजेच्या संप्रदायाविषयी खात्रीलायक आणि पूर्ण असा खुलासा मिळत नाही. शेडबाळ येथे परवा जी अखिल भारतीय जैन परिषद झाली, तिचे अध्यक्ष श्री. नेमीसागर वर्णीजी ह्या जैन संन्याशाची मी मुडबिद्रीत भेट घेतली. त्यांनी सांगितले की, पहिल्या आदिनाथ तीर्थकरांचे दोन मुलगे पहिला भरत हा चक्रवर्ती झाला व दुसरा बाहुबली हा सामान्य राजा होता. त्या युगात माणसे फार उंच, बलवान व दीर्घार्यु होती. त्यातल्या त्यात बाहुबली हा तर भीमाप्रमाणे फारच धिप्पाड व बलिष्ठ होता. आपल्या थोरल्या भावाने चक्रवर्ती व्हावे म्हणून ह्याने राज्य व संसारलोभ टाकून तटस्थ वृत्ती स्वीकारली, हे दाखविण्यासाठी हे पुतळे उभे केले आहेत, वगैरे दंतकथा आहेत. पण जगात दुसरीकडे असे भव्य पुतळे कोठेच नाहीत, येथेच ते का आढळतात ह्याबाबतीत आमचे अज्ञान पाहून आमचे इतिहाससंसशोधन किती कमी दर्जाचे आहे ह्याबद्दल खंती वाटते. ह्या पुतळ्याच्या एका बाजूस एक शिलालेख आहे. त्यावरून इ. स. १३५४ चे सुमारास हा उभारण्यात आला असावा असे साऊथ कॅनरा डिस्ट्रिक्ट मॅन्युअलमध्ये म्हटले आहे. हा भव्य पुतळा एका मोठ्या सात-आठ फूट उंचीच्या प्रशस्त चौथ-यावर उभा केला आहे. जैनांशिवाय इतरांना ह्या चौथ-यावर चढण्याची मनाई असल्याने हा लेख प्रत्यक्ष वाचण्याची मी दगदग केली नाही. ह्या चौथ-याभोवताली सुमारे १-१|| एकर चौरस मोकळी जागा सोडून जाड भिंतीचा चौफेर असा भक्कम तट बांधला आहे. एका बाजूने वेशीवजा एक बळकट दरवाजा आहे. कोणी पहावयास गेल्यास टेकडीखालील पुजारी कुलूप उपडून दाखवावयास वर येतो. ह्या टेकडीवरून भोवतालच्या शहराचा डोंगराळ, दाट झाडीचा, विशेषत: पायथ्याशी पसरलेल्या रामसमुद्राचा देखावा फारच रमणीय व स्फूर्तिकारक दिसतो. समोरच दुस-या एका लहानशा टेकडीवर चतुर्मुख बस्ती नावाचे एक जुने व अगदी शाबूत असलेले भव्य जैन देवालय आहे. ह्याला चारीकडे तोंडे आहेत, ही सर्व इमारत छपरासुद्धा दगडी आहे.
“घुमटाराजा” चा मागमूस काही समजत नाही, इतकेच नव्हे तर त्या शब्दाची व्यत्पत्तीही सहज लागण्यासारखी नाही. “गोमटेश्वर” हे नाव गोतमेश्वरावरून वर्णविपर्यास होऊन झाले असावे. पण अशी व्यत्पत्ती स्थानिक जैनांना पसंत नाही. श्री. नेमीसागर म्हणतात की, ज्या बाहुबलीचे पुतळे आहेत तो फार उंचच होता असे नव्हे, तर तो फार सुंदरही होता व त्याला कामदेव असे दुसरे एक नाव होते. त्याच्याशी गोमटेश्वर ह्या नावाचा संबंध आहे. गोमटे म्हणजे सुंदर असा शब्द इकडील कोकणी भाषेत फार प्रचारात आहे. व तो आमच्या जुन्या व बालबोध मराठीत अद्यापि आहे. हा शब्द कामदेव ह्या शब्दापासून आलेला असणे अगदीच अशक्य नाही. तरी श्री. नेमीसागर हे संस्कृतज्ञ असल्याने गाम म्हणजे पृथ्वीवर आणि अहति म्हणजे भटकतो जो तो गामटे असा ह्या पदाचा अर्थ करतात. हा फारच दूरान्वय दिसतो. त्यापेक्षा गोतमराज हाच मूळशब्द असणे अधिक सरळ दिसते. प्राचीन पर्शियाचा सायरस नावाचा प्रसिद्ध राजपुत्र आपल्या बापाचे मरणाचे वेळी दूर कामगिरीवर गेला होता. त्याचा फायदा घेऊन मीडिया देशातील एका मघजातीच्या घोमट नावाच्या ब्राह्मणाने तोतया बनून काही दिवस राज्य बळकाविले. त्याचा पराजय करून सायरसने राज्य परत मिळविले. त्या घोमटाचा गोतम ह्या नावाशी संबंध असल्यास शोधकांनी पहावे. व्यत्पत्ती काहीही असो, पण मूर्तिपूजकांच्या कडव्या शत्रूलाही क्षणभर आपला विरोध विसरावयाला लावणारे गोमटेश्वराचे हे सावळे, गोमटे स्वरूप व सुंदर सात्विक ध्यान काही अवर्णनीय प्रकारचे आहे. ते पाहून आणि दंतकथेतील त्याचे चरित्र ऐकून सहृदय माणसाला भडभडून उमाळा आल्यावाचून रहात नाही. कारकळ शहरात किंवा आसमंतात कोठेही जा, हा पुतळा आपल्या उंच तटाच्याही वरून छातीइतका वर उंच डोकावून पहाताना कित्येक मैलांवर दिसतो. प्रेमळ व भाविक जैन यात्रेकरूंची मने हा गोमटेश्वर कशी हस्तगत करून घेत असेल हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणे अशक्य!
ह्याशिवाय हिरेअंगडी नावाचा कारकळ शहराचा एक प्राचीन भाग आहे, तेथे नेमीनाथ नावाच्या तीर्थकराची एक बस्ती आहे. ती विस्तीर्ण व पहाण्यालायक आहे. तेथे अंगणात एक भलाभक्कम ४० फूट उंचीचा एकच दगडाचा जयस्तंभ तीन मजली उंच अशा एका चौथ-यावर तोलून उभा केला आहे. त्याचे शिल्पकाम तर दृष्ट लागण्यासारखे सुंदर आहे. घडविणाराची सौंदर्यलोलुपताच नव्हे, तर हा अजस्त्र स्तंभ कोठल्या खाणीतून काढला, तो तेथे उभा कसा केला आणि त्यावर ही प्रमाणशुद्ध आणि नयनमनोहारी कलाकुसरी कशी कोरली ह्याची काहीच कल्पना करता येत नाही. हे सर्व प्राचीन वैभव ता अस्तंगत झाले हे तर खरेच. पण कोंबड्याला उकिरड्यात आढळलेल्या हि-याप्रमाणे आम्हांला अशा प्राचीन जडजवाहिरांची नुसती जाणीवही नाही, ह्याला काय म्हणावे!
इकडील मराठे
ह्या प्रांतात महाराष्ट्रातून आलेली लष्करी पेशाची मराठे जातीची बरीच घराणी आढळली. पण त्यांची कंगाल व अडाणी स्थिती पाहून तर गहींवरच आला. ह्यांना अद्यापि मराठी अडखळत बोलता येते. ती बोली फार अशुद्ध असते. अज्ञान तर असे शंभर नंबरी की, त्यांना स्वत:ची आडनावे सांगता येत नाहीत. कारण ती त्यांना माहीत नाहीत! कित्येकांना तर आडनाव म्हणजे काय ह्याची कल्पना देखील आम्हांला करून देता आली नाही. महाराष्ट्राबाहेर आडनावाचा प्रचार विरळाच. मराठ्यांना व चित्पावनांनाच काय ती आडनावे पण तीही आमच्या जुन्या बखरीतून आतासारखी सर्रास पूर्ण आढळत नाहीत. सुमारे १००-१५० मराठ्यांचा ए स्वतंत्र मोहल्लाच ह्या गावी मी पाहिला. तम्मोजी जाधव नावाच्या एका पुढा-याने बांधलेले अंबाबाईचे देऊळ पहावयास गेलो. तो ते एका ब्राह्मण पुजा-याचे स्वाधीन होते, व तो कुलूप लावून आपल्या घरी गेला होता असे कळले, शेवटी थोडी तसदी सोसून ह्या तम्मोजीची गाठ घेतली. म्हाता-याचा वर्ण, सरळ अणकुचीदार नाक, पाणीदार व किंचित तिखट डोळे वगैरे मराठा छाप पाहून ताबडतोब ओळख पटली. पण स्वारीला आपले जाधव हे आडनाव स्मरण करण्याला बरेच डोके खाजवावे लागले. मग ही वसाहत महाराष्ट्रातून कोणत्या काळी कशी आली हे सांगणे, म्हणजे पूर्वजन्माचा वृत्तांत सांगण्याइतकेच अशक्य झाले ह्यात नवल ते काय?
कामत नावाच्या एका गौड सारस्वताच्या दुकानावर जाधवबांबांची व आमची भेट झाली. कारकळ गाव ह्या सारस्वत उर्फ कोकणी ब्राह्मणाच्या पूर्ण कह्यात गेला होता. भटजीही तेच व शेटजीही तेच. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरूषार्थ त्यांच्याच मुठीत वेळलेले! ते काही असो, जाधवांच्या घराण्याची अत्यंत अंधुक जी माहिती मिळणे शक्य होती ती ह्या कामत शेटजीकडूनच. त्याने चटकन सांगितले की, अंबाबाईचे देऊळ जाधवरावांनीच बांधले. कदाचित मजप्रमाणेच जाधवबाबांनाही ही माहिती नवीनच मिळाली असावी! फरक इतकाच की ती आमच्या स्मरणात अद्यापि आहे. पण जाधवबाबांकडे पुन्हा जाऊन त्यांच्या देवळाविषयी विचारले तर खाजवून खाजवून त्यांच्या डोक्याला टक्कल पडेल, पण देऊळ स्वत:चे हे काही त्यांना कामत शेटजीशिवाय आठवणार नाही. ही येथील मराठ्यांच्या अगदी पुढा-यांची दैना, मग इतरेजनांची काय स्थिती असेल ह्याची कल्पना “विजयी मराठ्यांच्या” वाचकांनीच करावी! तम्मोजी भेटण्यापूर्वी नेमोजी नावाचा दुसरा एक म्हातारा गृहस्थ भेटला. त्याला मागील इतिहासाचे एक दोन प्रश्न केल्याबरोबर आपल्यास पोलिसाचे धरणेच आले असे वाटून तो मुकाट्याने जो पसार झाला, तो मागे वळून पहातो कसचा? ही घराणी पूर्वी किल्ल्याच्या बंदोबस्ताकरिता होती. पण आता त्यांच्या तरवारी तर राहोच पण नांगराचा फाळही त्यांच्या वाट्यास उरला नाही. रोजची मजुरी करून किंवा आपल्या कर्जदाराच्या देवडीवर राखणदाराचे काम करून हे दिवस कंठीत आहेत! अशांना त्यांची गोत्रे कोमती, देवके कोणती, वगैरे प्रश्न विचारण्याचे माझ्या हातून होईना. तम्मोजी, नेमोजी वगैरे दुस-या अशाच नावावरून ह्याच्यावर जैन संस्कृतीचा बराच पगडा बसलेला दिसून आला. ते सर्व सांगण्यास येथे अवकाश नाही.
येथे आम्ही तीनच दिवस होतो. ब्राह्मसमाजाचे प्रसारार्थ आम्ही एक कीर्तन केले. काँग्रेस कमिटीमार्फत थोडीबहुत अस्पृश्यनिवारणार्थ चळवळ झाली होती. तिचे रडगाणे ऐकले. आमचे यजमान (ज्यांचे पाहुणे आम्ही) श्रीयुत के. पद्मनाभ कामत, एम. ए., बी. एल., येथील मुख्य पुढारी हे स्वत:च ईस्टरचे सुट्टीत सार्वजनिक कामाकरिता परगावी गेले होते. म्हणून येथे विशेष काही न करिता आम्हांला सह्याद्रीची वाट धरावी लागली. पण घुमटाराजाकडे पुन: पुन: वळून पाहिल्याशिवाय कारकळहून आमचे पाऊल काही केल्या उचलवेना. आज जवळजवळ ६०० वर्षे उन्हात, वा-यात कोकिळ-कूजित आणि विजेचा कडकडाट पायाखालील जगतातील पाप, पुण्ये, भौतिक व नैतिक द्वंद्वे इत्यादी अनेक प्रकार मैत्रिभावनेच्या समदृष्टीने पहात, तटस्थ पण उदासीन नव्हे, अशा उभ्या राहिलेल्या गोमटेश्वरा, तुला आम्ही कसे विसरावे! प्रतिभाशाली चित्रकाराने निर्माण केलेली, अनेक आधुनिक व प्राचीन विभूतींची चित्रे व मूर्ती मी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व इटाली वगैरे पाश्चात्य पुढारलेल्या देशांत पाहिल्या. नेल्सन, नेपोलियन, शेक्सपिअर, सीझर, मिल्टन, डांटे इ. ऐहिकच नव्हे तर सेंट पॉल व मोझेस इ. पारलौकिक मार्गदर्शकांच्या उठावदार मूर्ती मी अनेक वेळा निरखून पाहिल्या. पण त्या कोणीही घेरले नाही असे ह्या घुमटाराजाने मला का घेरले, ह्याचा मी विचार करू लागलो. दूरच्या गोष्टी सोडू, कलकत्त्यात जनरल औटरॅमचा अश्वारूढ पुतळा चौरंगीच्या मैदानावर उभा आहे. ५७ सालच्या बंडात बंडखोरांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी, चवताळून झेप घालणा-या वाघाप्रमाणे आपल्या घोड्यावरून मागे वळून तलवारीचा वार करीत आहे असा आव ह्या पंचरशी पुतळ्याने दाखविला आहे. तो पाहून क्षणभर अंगावर शहारे उभारतात. पण ते क्षणभरच. लगेच ह्या पाशवी शक्तीचे असले उर्मट प्रदर्शन पाहून तिरस्काराच्या लाटा उसळू लागतात. त्या दाबणे जवळजवळ अशक्य होऊन जाते. पण घुमटाराय! तुझ्या कपाळावरील गांभीर्याच्या व हनुवटीवरील माधुर्याच्या रेखा माझ्या काळजात अद्यापि खोल खोलच रूतत आहेत, ह्याचे रहस्य काय असेल बरे?
किप्लिंगने म्हटल्याप्रमाणे:
East is East and West is West
Never the twain shall meet!
हेच असेल काय ह्याचे रहस्य? काव्याचे व कलेचे हृदय म्हणजे पावित्र्य उर्फ धर्म हेच होय. हे हृदयच आपल्या अंगाबाहेर टाकून कवीने अथवा शिल्पकाराने आपली कितीही ओढाताण करून अजब सृष्टी निर्माण केली तर ती नुसती आश्चर्यकारक होईल, पण जड जीवाला उद्धारक होणार नाही. आमचे प्राचीन शिल्पकार पुष्कळदा धर्माने झपाटलेले असत. म्हणून त्यांच्या हातून अशा सृष्टी निर्माण झाल्या. पाश्चात्य शिल्पकार पुष्कळदा भक्तीपेक्षा चातुर्यावर भिस्त ठेवून कामाला लागतात म्हणून त्यांच्या कृतीला तादृश किंमत येत नाही. असो.
तजो मन लोभ चतुरायी|
भजो हरीचरण सुखदायी||१||
हेच खरे, दुसरे कलेचे रहस्य काय असावयाचे?