सह्याद्रीवरुन-२

सोमेश्वर-आगंबे घाट

ता. १३ एप्रिल १९२५ रोजी तिसरे प्रहरी आम्ही कारकळ सोडले. कारकळहून सह्याद्रीचे अगदी पायथ्याशी सोमेश्वर नावाचे एक अगदी क्षुद्र खेडे आहे. ते सुमारे ३५-४० मैल लांब आहे. रस्ता अगदी चढणीचा असल्याने मोटारला तीन तास लागतात. वेळ सायंकाळची. रस्ता घाटाजवळचा. मग भोवतालच्या सृष्टीसौंदर्याला काय उणीव असणार! दुतर्फा जाड, उंच, सरळ खोडांचे व गर्द पालवीचे गगनचुंबी जुनाट वृक्ष अगदी एकाला एक लागून जणून एक भिंतीचा तटच करून उभे असल्यामुळे मोटारीला कड्याखाली घसरण्याची भीती नव्हती. जेथे असा तट नव्हता तेथे एकाद्या नदीचे किंवा ओढ्याचे पात्र व वरील पूल लागून देखावा बदले, त्यामुळे दृष्टीला वाव मिळून दूरच्या पर्वतशिखरांचे किंवा त्यांवरील जीर्ण देवालयांचे किंवा पडलेल्या किल्ल्यांचेही दर्शन घडे. रात्री ७|| वाजता सोमेश्वरी पोचलो. येथे मोटर कंपनी बदलते. घाटाची अगदी माथ्यावर आगंबे म्हणून एक लहान गाव आहे. तेथपर्यंत बैलगाडीचा रस्ता फार तर ७-८ मैलांचा असावा. पण तो चढण्याला बैलांना ६-७ तास लागतात. दिवसा छातीवरील वाट पाहून बैलांची छाती फुटते. म्हणून हा प्रवास अगदी मध्यान्ह रात्रीचे काळोखातच करावयाचा असतो. रस्ता कठीण, डोंगरातील उंच वळणावळणाचा, किर्रर्र झाडीमधला तरी पण श्वापदांची किंवा चोरांची वगैरे येथे कसलीच दहशत नाही. मात्र बैल प्रत्येक फर्लांग दोन फर्लांगाला थकून उभे रहात, त्यावरून चढण जास्त व घाटावरील बैलांपेक्षा घाटाखालच्या बैलांत कस कमी, हे उघड दिसे. खरोखर उत्र कोकण काय किंवा केरल देश काय जनावरांची मोठी करूणास्पद आबाळ सबंध पश्चिम किना-यावर चाललेली दिसते. भातशेतीला औताची गुरे लागत नाहीत, तरी पण दुभत्याच्या गाई, म्हशी व गाडीचे बैलही इकडे देशावरून नेहमी आणावयाचे असतात. पण त्यांना खाण्याला घालण्याची कोणीच तरतूद करीत नसल्यामुळे दुभत्याची गुरे लवकर आटून व ओढीची गुरे छाती फुटून अकाली मरतात. इतकेच नव्हे तर लहान वासरेदेखील दात येण्यापूर्वीच प्राण सोडतात! ही जुनी परंपरा ह्या परशुराम क्षेत्रात अबाधित चालली आहे. तरी गोरक्षणाची दिखाऊ चळवळ कीह पांढरपेशा देशभक्तांनी चालवलेली पाहून मात्र ती सहन करणे हा घाट चढण्याहूनही कठीण पडते.

अर्ध्या घाटातच ब्रिटिशांची हद्द संपून म्हैसूर संस्थानची हद्द लागते. हद्दीवर चोरट्यांचा सुळसुळाट असावयाचा; पण तोही नाही, ह्यावरून गुराप्रमाणे माणसांचाही शारीरिक कस ह्या प्रांतात कमीच दिसतो. पोलिसांना दुसरे काही काम नसल्याने नाक्यावरील जकातदाराने गाडीवर लगेज म्हणून बांधलेल्या माझ्या सायकलवर चापून चार्ज आकारला. तरी ती गोष्ट मनावर घेण्याइतकी तरतरी पोलिसामध्येही दिसली नाही.

मध्यान्ह रात्री १ वाजता घाटमाथ्यावरील आगंबे गावी आम्ही पोचलो. ह्या नावाचे मूळ रूप आग आंबे असे असावे अशी व्यत्पत्ती माझ्या बहिणीने विनोदाने केली. घाट चढताना ‘अग आई’ असा पुष्कळ वेला म्हणावयाचा प्रसंग येतो. तेवढ्यापुरती ही व्युत्पत्ती खरी आहे असे आम्हांला कबूल करावे लागले! ब्रिटिश आणि म्हैसूर ह्या दोन संस्थानांत ही घाटाची वाट विभागली आहे. जबाबदारीही विभागून नाहीशी झाली आहे. अतिवृष्टीमुळे नेहमी दुरूस्ती ठेवणे फार खर्चाचे आहे.

म्हैसूरचा दिवाळखोरी हिशोब आणि ब्रिटिशांना लढाईची सबब ह्यांपैकी कोणती सबब खरी असेल ती असो, ह्या दोन्हीही सुधारणेचा तोरा मिरविणा-या राज्यांनी हा घाट मोटारीने ओलांडण्याइतका दुरूस्त ठेवला नाही, हे उघड आहे! मंगळूराहून मुंबईकडे किंवा बंगलूरकडे जावयाचे झाल्यास आगगाडीचा मागे नाही. कालिकतला वळसा घालून जवळजवळ मद्रासला जाऊन आगगाडीने हा द्राविडी प्राणायाम करावयाचा असतो. पावसाळ्यात पाच महिने समुद्रावरील प्रवास बंद असतो, इतकेच नव्हे तर अतिवृष्टीने एकाद्या नदिकिना-यावरचा पूल नादुरूस्त झाल्यावर  आगगाडीच नव्हे तर टपालखातेही बंद पडते, ह्यावरून सोमेश्वर-आगंबे घाटाचे महत्त्व रहदारीच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे असूनही परकीय मुत्सद्दी आणि स्वकीय चळवळे ह्यांनी आजवर एकमताने ही हयगय कशी केली आहे हे पाहून दोघांचेही कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. असो.

ता. १४ रोजी प्रात:काली हत्तीवर टांगलेल्या घंटांचा मधुर आणि तालबद्ध आवाज दुरून कून आम्ही जागे झालो. आम्ही संस्थानी प्रजा म्हणून आम्हांला हा आवाज नेमका ओळखण्याला मुळीच अडचण पडली नाही, तरी अशा जंगलात दरबारी हत्ती कोठून येणार म्हणून आश्चर्याने आम्ही घाटाखाली पाहू लागलो. तो चार पाच म्हैसूर संस्थानचे टिंबर डिपार्टमेंटचे मजूर रात्रभर आपले मोठाल्या लाकडी तुळ्या ओढून एकत्र करण्याचे काम आटपून आपल्या ठाण्याकडे वर येताना दिसले! जवळ आल्यावर ज्यंच्या पायांना मोठमोठाले साखळदंड बांधलेले असे रस्त्यावरून फरफरा ओढीत चाललेले हे बिनपगारी-पण जास्त पगार आणि कमी काम मागणा-या मनुष्य मजुरापेक्षा अधिक प्रामाणिक – मजूर हत्ती पाहून व त्यांनी चालविलेल्या कामाची माहिती ऐकून फार आश्चर्य वाटले. म्हैसूर संस्थानात इमारती लाकडाचे एक स्वतंत्र मोठे खातेच आहे. त्यात चंदनापासून जळाऊ बाभळीच्या लाकडापर्यंत सर्व प्रकारच्या लाकडाची एक मोठी उत्पन्नची बाब आहे. मोठमोठाली खोडे तोडणे, एकत्र करणे आणि घाटावर ओढून आणणे ही शक्तीची कामे करण्याला घाटाखालची अगर वरची इतर जनावरे व माणसे ही सारखीच असमर्थ आहेत. म्हणून ह्या संस्थानाला देवाने ही जिवंत आणि चतुर व प्रामाणिक इंजिने दिली आहेत. हा नवीन देखावा पाहून माझ्या लहानग्या मुलाला फार अचंबा वाटला. तो पाहून मलाही माझ्या ह्या प्रवासात मजबरोबर निरीक्षण करण्याला माझा मुलगाही आहे, त्याबद्दल धन्यता वाटली.

तीर्थहळळी

म्हैसूर संस्थानाचा हा तालुक्याचा गाव आगंबेहून सुमारे १५ मैलांवर आहे. तेथे आम्ही ८-८|| वाजता पोचलो. तेथे तुंगा नदी लागते. नदीत एक शिवालय आहे व तेथे स्नान करण्यासाठी एक क्षेत्र आहे, असे ऐकले होते. ह्या गावी काँग्रेसची एक डिस्ट्रिक्ट कमिटीही आहे, तिचे मुख्य अध्यक्ष भेटले, पण राज्य एतद्देशीय संस्थानचे असल्याने काँग्रेसच्या कामात ओघानेच तपशीलाच्या भरीवपणापेक्षा तत्त्वांचा पोकळपणाच जास्त आहे हे नजरेस आले. ब्राह्मसमाजाची गोष्टच काढावयाला नको, पण खादीच्या प्रसाराचा किंवा अस्पृश्यता निवारण्याच्या शिळोप्याच्या गोष्टींचादेखील इकडील विधायक कामगिरीत समावेश होत नसल्याने अध्यक्षांच्या खादीच्या टोपीशिवाय येथे काही प्रेक्षणीय व श्रवणीय नाही, हे शब्दश: खरे ठरले! सुशिक्षितांचे राजकारण व घरबसल्यांची चळवळ ही अशी टोपी घालण्यापुरतीच असणार, हे पहाण्यास संस्थानातील ह्या जंगली कोप-यात जाण्याची जरूरी नाही. ती कलकत्त्याच्या कॉलेज स्वेअरमध्येही मुबलक पहावयास मिळते. तेथेही पण केव्हा केव्हा खादीचा पोषाख करणारा एकादा बाबू शोधून काढावयास तासानुतास हिंडावे लागते. तीर्थहळळीस एक दिवस रहाण्याचा आमचा कार्यक्रम एक तासभर केलेल्या चौकशीत आटोपता घेतला आणि आम्ही मुकाट्यने पुढील मार्गास लागलो, येथून सुमारे ४० मैलांवर

शिमोगा (शिवमुख?)

हे म्हैसूर संस्थानातील एक जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. ही सर्व वाट सारखी उताराची लागली. शिमोग्यास आम्ही भर दोन प्रहरी पोचलो. एवढा मोठा गाव असून येथे कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. राजधानीचे ठिकाण म्हैसूर अथवा बंगळूर ही दोन्ही पुरेशी दूर असल्याने येथे दरबा-यांचा सुळसुळाट नाही आणि काँग्रेस कमिटी नसल्याने खालसा इलाख्यातील चळवळेही येथवर लांब येण्याची तसदी घेत नाहीत. संस्थान ब्राह्मणी वर्चस्वाखाली चिरडल्याने व श्रृंगेरी मठ जवळच असल्याने सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्याचे वारे येथे पोचावयाला अद्यापि पुष्कळ अवकाश आहे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद येथे नाही. आणि हरिहराचे देऊळ फार दूर नसल्यामुळे म्हैसूरातील अय्यर-अय्यंगार उर्फ शैव-वैष्णवांचाही तंटा येथे दिसला नाही. येथे मुसलमानांचा फार मोठा भरणा दिसला. पण जे मुसलमानांचे मासले दिसले, त्यांना आपण शिया आहो की सुन्नी आहो हे देखील सांगता आले नाही. मग खिलापत कमिटीची गोष्ट दूरच राहिली. अर्थात हिंदू संघटनांची किंवा अस्पृश्यता निवारणाची किंबहुना पुराणवस्तुसंशोधनासारख्या एकाद्या वाड्मयीन विषयाचीही कोणाजवळ चर्चा करण्याचे मला धैर्यच झाले नाही. एकंदरीत हा प्रांत नैसर्गिक अथवा सामाजिक कोणत्याच भानगडीपासून अलिप्त दिसल्यामुळे आम्ही येते पूर्ण विश्रांतीसुख घेण्यासाठीच मुद्दाम तीन दिव राहिलो.

शिमोगा हे ठिकाण फार जुने नाही असे वाटते. “शिवमुख” असे ह्या नावाचे पूर्वरूप असावे अशी एकाने व्युत्पत्ती सांगितली. येथे महत्त्वाचे असे एकच वैष्णव देऊळ आहे. पण तेथेही सांप्रदायिक कडवेपणा किंवा सोवळे नाही. इतकेच नव्हे तर त्याच देवळात शिवाची पिंडी आहे. हा एक अपूर्वच प्रकार मी पाहिला. सर्वांत जुने देऊळ मारूतीचेच आहे, आणि तेही पूर्वी एकादे शिवालय असेल अशी शंका येते; घाट ओलांडल्याबरोबर जैन धर्माची चिन्हे अजीबात मावळल्याप्रमाणेच होतात. एक रोमन कॅथॉलिक ख्रिस्ती जुने देऊळ आहे. मशिदीही फारशा जुन्या नाहीत. सर्वांत जुनी वस्तू येथे तुंगा नदीच आहे! आणि तिने मात्र हे स्थान अगदी रम्य केले आहे. गाव तर अगदी तिच्या काठाकाठानेच वसला आहे. एक दोन वर्षांपूर्वी महापूर येऊन जवळजवळ अर्धा गाव वाहून गेल्यामुळे ज्या घरांनी जमीन धरली आहे ती अद्यापि उठली नाहीत. एका निपुत्रिक ख्रिस्ती श्रीमंताच्या देणगीने एक भली मोठी सुंदर धर्मशाळा, घाट व सभामंडप ह्या इमारती तुंगेच्या काठी गावाबाहेर बांधल्या आहेत. त्यांचा ताबा लोकल बोर्डाकडे असल्यामुळे भोगवटा हिंदूच्याच वाट्याला आला आहे. जसा देखावा शांत तशीच हवा व तसेच पाणीही शुद्ध व आरोग्यकारक आहे. “कृष्णास्नान व तुंगापान” ही म्हण मला आठवली. उन्हाळ्यामुळे नदीचे पाणी डोहातही कमी झाले होते व म्युनिसिपालिटीला नदीचे महत्त्व न कळल्यामुळे तिने वरील म्हणीला बाध आणिला होता, तरी तुंगेचे स्वच्छ व विस्तीर्ण पात्र, मुबलक पाणी, दोहों तीरांवरील खडकाळ व रेताळ प्रदेश वगैरे वगैरे नैसर्गिक सोहाळे धर्मशाळेच्या दुस-या मजल्यावरील गवाक्षातून सांजसकाळ पूर्ण उपभोगता येण्यासारखे आहेत, ह्यात शंका नाही. रसिकांना दोन दिवस रहावेसे वाटते.

शिमोगा येथे म्हैसूर संस्थानी आगगाडी आहे. ती बिरूर येथे एस्. एम्. आर. Southern Maratha Railway ला मिळून पुढे पुन: वेगळी होऊन म्हैसूरापर्यंत जाते. ह्या लाईनीचे शिमोगा हे शेवटचे ठाणे आहे. येथून पश्चिम किना-यावरील भटकळ बंदर लोहमार्गाने जोडण्याची सर विश्वेश्वरय्या ह्यांची महत्त्वाकांक्षा होती. तिचादेखील स्वाहा म्हैसूरसारख्या भरभराटलेल्या संस्थानाने गेल्या युद्धाच्या होमकुंडात कसा केला हे कळत नाही, तरी ह्या लोहमार्गासाठी तुंगेच्या विशाल पात्रावरून पूल बांधण्यासाठी ज्या भक्कम खांबांची उभारणी वाहत्या पात्रात आधीच होऊन राहिली आहे त्यावरून “उत्पद्यन्ते विलीयन्ते दुर्बलानां मनोरथा” हे कसे ते तेथे उघड दिसते. “दरिद्राणां” चे ऐवजी “दुर्बलानां” हा पाठभेद माझा स्वत:चा आहे. त्याबद्दल चतुर वाचकांची मी माफी मागावीच असे काही नाही.

हरिहर

ही आमच्या प्रस्तुत प्रवासाची पराकाष्ठा होती. ती जरी ईशान्येकडे होती तरी आग्नेयीकडे असणा-या विरूर नावाचे एम. एस. एम. आर. चे स्टेशन (Madras Southern Maratha Railway) गाठण्याकरिता उलट्या दिशेने आम्ही ता. १६ रोजी रात्री ७-४५ वाजता निघालो आणि विरूर येथे ११ वाजता पोचलो. वाटेत बेंकीपूर उर्फ भद्रावती ह्या स्टेशनावर म्हैसूर संस्थानाचा भला मोठा लोखंडाचा व पोलादाचा कारखाना दिसला. विजेच्या लखलखाटामुळे तो देखावा बंगाल-नागपूर रेल्वेवरून रात्रीच्या काळोखात जसा टाटा कंपनीच्या जमशेटपूरचा दिसतो, तसाच येथलाही दिसतो. विरूर स्टेशनवर कुली (हमाल) मुळीच नाहीत. उलट चोरट्यांचा सुळसुळाट आहे. कारण दोन संस्थानांच्या हद्दीवरील हे ठाणे, हेच उघड आहे. तेथे मजुरीपेक्षा उचलेपणाला तेजी असावी हे नीतिशास्त्राला नसले तरी हल्लीच्या अर्थशास्त्राला धरूनच आहे! गाड्यांची आवक-जावक येथे अपरात्री असल्यामुळे जवळ जड सामान असल्यास उतारूचे फार हाल होतात. अधिकारी व श्रीमंतांचे कोठेच नडत नाही आणि बाकीच्यासाठी रेल्वे कंपन्या नसून उलट रेल्वे कंपन्यांसाठीच हिंदुस्थानातील तिस-या वर्गाचा उतारू वर्ग आहे हे ज्यांना अनुभवावयाचे असेल त्यांनी विरूरची तीर्थयात्रा करावी. विशेषत: अमावस्येची रात्र असल्यास साक्षात्कार पूर्ण घडेल!

हरिहर येथे ता. १७ रोजी मोठ्या पहाटेस पोचलो. काही ओळखीमुळे हरिहरेश्वराच्या देवळातील आवारामध्ये एक खोली आम्हांला रहावयास मिळाली. हरिहर गाव पाहून आमची निराशा झाली. हा गाव तुंगभद्रेच्या सुंदर आणि विस्तीर्ण पात्रावर उभा आहे. हा फार प्राचीन आहे. हे क्षेत्राचे स्थान अशी प्रसिद्धी आम्ही फार ऐकिली होती. पण गाव पाहूनच नव्हे तर देऊळ पाहूनही सकृतदर्शनी आमची मोठी निराशा झाली. देवळाच्या पश्चिम बाजूला तुंगभद्रेचे विशाल पात्र अगदी जवळ येऊन भिडले आहे तरी पण मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडून आहे. तेथे भोवताली गावातील घरांची अशी दाटी झाली आहे की आपण एका प्रसिद्ध देवळापुढे आलो आहोत, असे वाटतच नाही. आत गेल्यावरही देऊळ किंचित ठेंगणे, जमिनीत बसल्यासारखे आणि ओसाड असे दिसते. आम्ही सामान उतरून किंचित विश्रांती घेऊन सावकाशपणे देऊळ पहाण्यास गेलो, आणि निरखून पाहू लागलो तो देवळातील खरी कारागिरी आणि त्याचे जुने पुराणे महात्म्य मनात भरू लागले.

शिव आणि विष्णू ह्या हिंदूंच्या दोन मुख्य उपास्य देवता. ह्यांच्यातील सख्य आणि विरोध म्हणजे हिंदू धर्माचे मोठेच रहस्य. दक्षिणेत तर ह्या विरोधावर बरीच रणे माजली आहेत. ह्या दोन्ही देवांचा ह्या ठिकाणी झालेला अभेद्य मिलाफ पहाण्याची माझी फार दिवसांची इच्छा होती. जमल्यास हा महत्त्वाचा मिलाफ होण्याला ऐतिहासिक कारणे काय झाली असावीत आणि तो मिलाफ ह्याच ठिकाणी का व कसा झाला हेही दिसल्यास पहाण्याचा माझा विचार होता.

इसवी सनाच्या ६ व्या शतकापर्यंत हिंदुस्थानात विशेषत: दक्षिण आणि पश्चिम हिंदुस्थानात बौद्ध आणि जैन धर्माचेच अगदी निर्भेळ प्राबल्य होते. ह्या दोन्ही धर्मांतही आपसात सख्य होते. दक्षिणेतील व द्राविड राजवटीतून जैनांचाच विशेष वरचष्मा होता. त्यामुळे बुद्धांचा धर्म अगोदरच निस्तेज होत आला होता. पुढे हळूहळू शैवांचा उदय होऊन दक्षिणेत चालुक्यांचा व तामिळ देशात चोळ आणि पांड्य राजांच्या आश्रयाने शैव आचार्यांनी प्रथम जैनाला हुसकून लावले. नंतर वैष्णवांनी शैवांवर कुरघोडी केली. तामिळ प्रांतात व काही अंशी कर्नाटकात वैष्णवांची आणि शैवांची अद्यापि चुरस कायम आहे, तरी इतर ठिकाणी ह्या दोन्ही संप्रदायांचा सल्ला झालेला दिसत आहे. काही काही ठिकाणी ह्या समेटाचा जाणूनबुजून प्रयत्न झाला असावा असे वाटते. ह्या वर्षारंभी मी ओरिसातील कटकपासून तो थेट मद्रासेपर्यंत किना-यावरील प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य मुख्य शैव आणि वैष्णव देवळे बारकाईने तपासून पाहिली.

“शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे|
शिवस्य-हृदये विष्णु विष्णो-हृदये शिव: ||”

ह्या मंत्रातील भाग ह्या बहुतेक देवळांतून उघड दिसून आला . विशेषत: शिवाने विष्णूपुढे बरीच हार खाल्ली आहे. बहुतेक मोठाल्या शिवालयांतून विष्णूची आणि लक्ष्मीचीही स्वतंत्र स्थापना दिसली. इतकेच नव्हे तर विष्णूमंदिरातही कित्येक ठिकाणी शिवाच्या पिंड्या दिसल्या. बंगाल्यात देवपारा ह्या गावी प्रद्युम्नईश्वर (हरिहर) ह्या जोड नावाखाली एकाच दैवताची उपासना (इ.स. ११०० पासून) होत आली आहे. पण सर्व हिंदुस्थानात हरिहराचे अभेद्य स्वरूप येथील हरिहरेश्वराच्या मंदिरातल्या इतके दुसरीकडे कोठेही आढळले नाही.

ह्या देवळात जुन्या शिलालेखांची अगदी लयलूट झाली आहे. १० फूट उंच व ५-६ फूट रूंद अशा गुळगुळीत दगडावर स्वच्छ आणि सुंदर कोरलेले जुन्या कानडीतील शिलालेख देवळाच्या आवारात जागोजाग उभे केले आहेत. बाजूस खांबावर, खाली पाय-यावर, वरती छतावरही लहान मोठे शिलालेख कोरलेले आहेतच. एकंदरीत हे देऊळ म्हणजे दगडी फळ्यांची आणि ताम्रपटांची एक मोठी लायब्ररीच आहे म्हणावयाचे. म्हैसूर सरकारनी ल्यूइस् राईस् ह्यांजकडून ‘एफिग्राफिका कर्नाटका’ नावाची जी महत्त्वाची ग्रंथमालिका प्रसिद्ध करविली आहे, तिच्या ११ व्या ग्रंथात चित्तलदुर्ग जिल्हा, दावणगिरी तालुका ह्या भागात हरिहर ह्या देवळातील व गावातील एकंदर ३८ लहान मोठे शिलालेख आणि ८-१० ताम्रपटातील लेख इंग्रजी भाषांतरासह उतरलेले आहेत. त्यांवर लेखांचा काळही दाखविलेला आहे. लेखांची भाषा संस्कृतमिश्रित जुनी कानडी आहे. काही काही लेख ५-६ पानांवर पसरलेले काव्यमय भाषेत आहेत. काही तीन चार ओळीत आटपले आहेत. बनवासीचे कदंब, हलेबीड, म्हैसूरचे होयसल, मदुरेचे पांड्य, तंजावरचे चोल, चालुक्य वगैरे अनेक राजांनी व त्यांच्या दिवाणांनी व इतर शेट सावकारांनी दिलेल्या नानात-हेच्या देणग्यांचा व शासनांचा ह्या लेखांतून उल्लेख आहे. त्यांचा काळ सुमारे इ. स. १००० पासून १५०० पर्यंतचा आहे.

सगळ्यात जुना ताम्रपट इ. स. ६९४ सालचा हरिहर येथील शानभोग सीतारामय्याजवळ आहे. त्यावेळी चालुक्य राजा विनयादित्य सत्याश्रय ह्याची छावणी हरिहराजवळील करंजप खेड्यात होती. तेव्हा त्याने एका विद्वान ब्राह्मणाला एक गाव दिल्याचे हे शासनपत्र आहे. त्यावेळी हरिहर ह्या गावाला हरिशपूर हे नाव होते. पण देवळाचा किंवा देवाचा काही उल्लेख नाही. त्यानंतर इ. स. ११०० साली केटय्या नायक ह्यांनी काही दान दिल्याचा एक लहानसा शिलालेख आहे. त्यात हरिहर देवाचा प्रथम उल्लेख आहे. पण त्यावेळीही हल्लीचे देऊळ नसावे. पुढे इ. स. १२२४ सालचा एक सुंदर आणि विस्तृत शिलालेख पोलाळ दंडाधिपाने कोरविलेला फार महत्त्वाचा आहे. त्यातील मुख्य भाग खालील शब्दात आहे:

‘स्वास्तिश्री जयाभ्युवयश्च शके वर्ष ११४५ नेव स्वभानु संवत्सर माग शुद्ध ११ वृहवारद अंदु चोळ प्रतिष्टाचार्य श्री वीरनरसिंह देवर महाप्रधानं पोळाळव दंडनार्थ ११५ होन्नकलशदिं मरव अंत आगि हरिहर देवरग्ग देवतातयं माडिसिदन् आ देवता-भवन-वासद विलासमं पेळवोदे|’

म्हैसूरच्या होयसल घराण्यातला दुस-या नरसिंह राजाचा प्रधान आणि सेनापती पोलाळ ह्याने हल्लीचे हे देऊळ इ. स. १२२३-२४ ह्या साली अगणित द्रव्य खर्चून बांधले असा ह्या लेखाचा इत्यर्थ आहे. त्यात ह्या प्रदेशाला गुह्यारण्य आणि गावाला कुडलूर अशीही नावे असलेली दिसतात. लेखाचे आरंभी म्हटलेले आहे की, काही म्हणतात की हरिशिवाय देव नाही. काही म्हणतात की हराशिवाय देव नाही. लोकांचा हा संशय दूर व्हावा, म्हणून हरिहराचे हे संयुक्त स्वरूप परमेश्वराचे. विष्णूने शिवाचे रूप घेतले आणि शिवाने विष्णूचे रूप घेतले हे वेदवाक्य खरे करण्यासाठी कुडळ येथे धारण केले! हरिहर क्षेत्राचा महिमा सेतु, वारणशी, कुरूक्षेत्र इ. क्षेत्रांहूनही जास्त आहे, असेही ह्या लेखाचे शेवटी म्हटले आहे. हे मंदिर जरी सन १२२४ साली झाले तरी ह्या देवस्थानाला देणग्या आलेल्यासंबंधी कित्येक शिलालेख इ. स. १०० पासून बरेच आहेत.

विस्ताराने हे देऊळ साधारण मध्यम प्रतीचे आहे. पण ह्यातील कोरीव काम मात्र अगदी वरिष्ठ दर्जाचे आहे. देवळाची जी सभोवार सज्जाची भिंत आहे, तिच्यावर अनेक प्राण्यांची हुबेहूब सुंदर चिमुकली चित्रे काढून नक्षी केलेली आहे. ती पाहून मन थक्क होते. खांब, भिंती आणि वर छत ही सारी अत्यंत कुसरीच्या जणू कशिद्याने भरगच्च भरून काढली आहेत. देवळाचा घाट उठावदार नसून ते ठेंगणे हेमाडपंथी थाटाचे आहे. त्याला चौथरा मुळीच नसल्याने ते जमिनीत रूतल्याप्रमाणे दिसते. निळसर रंगाच्या स्लेटीच्या मऊ दगडात एकंदर काम झाले असल्यामुळे, खांब आणि भिंती जणू शिशाच्या ओतून काढल्याप्रमाणे अगदी गुळगुळीत आणि मोहक दिसतात. भर उन्हाळ्यातही त्यांचा स्पर्श शीतळ आणि सुखदायी भासतो. माणसांची चाहूल फारच कमी असल्यामुळे आणि पश्चिमेकडील तुंगभद्रेवरचे वारे येण्याला कोठेच अडथळा नसल्यामुळे देवळात कोठेही विश्रांती घेण्यास बसले की मटकन डोळेच मिटतात, आणि “ब्रह्मानंदी लागली टाळी| कोण देहाते साभाळी||” असा प्रकार काही वेळ तरी सहजच घडतो. मुख्य देवळाभोवती रथयात्रेसाठी चारी बाजूंनी ऐसपैस जागा आहे. तिच्याभोवती काळभैरव व लक्ष्मी इत्यादी देवतांची उपमंदिरे आहेत. पण देवळाच्या ओव-यांतून कायमच्या
बि-हाडक-यांना जागा दिल्या आहेत, इतकेच नव्हे तर देवळाचा काही भाग देवळाशी संबंध नसलेल्यांनी आपल्या कायमच्या मालकीचा करून घेतला आहे, बाहेर रस्ता अगदी अरूंद, त्याच्या पलीकडे घरांची खेचाखेची व गटारातून युगानुयुगे साचलेली घाण, अशी एकंदर हयगय चाललेली पाहून फार वाईट वाटते. मात्र मलबारातल्या देवळाप्रमाणे येथे फाजील सोवळे नसल्याने अगदी देवळाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्यास मुभा आहे.

गाभा-यात हरिहराची एकच मूर्ती आहे. ती देवळाच्या मानाने पहाता मुळीच सुंदर नाही. भर दोन प्रहरी देवळाचे अंगणात एक मोठा आरसा ठेवून त्याची किरणे सभामंडपातून मध्यदालनातून गाभा-यातील मूर्तीवर नेमकी पाडून ती स्पष्ट बाहेर उभी राहून दाखविण्याची सोय करण्यात येते. मूर्तीचा उजवीकडचा भाग शिवाचा आणि डावीकडचा भाग विष्णूचा आहे. डावीकडच्या दोन हातात शंख आणि चक्र आणि उजवीकडच्या एका हातात त्रिशूल आणि दुसरा अभयदानासाठी नुसता पसरून उभा धरलेला आहे. डोक्यावर उजवीकडे जटा असून तिच्यात चंद्र आहे, आणि डावीकडे किरीट आहे. पण एकंदर मूर्तीला आणि आसनाला मधून मधून चिरा पडलेल्या स्पष्ट दिसतात. टिपू सुलतानाचे वेळी ह्या देवळावर वरचेवर हल्ले होऊन त्याची मराठ्यांनी अगदी आणीबाणीच्या वेळी सुटका केली आहे. ह्या धामधुमीत मूर्ती ठिकठिकाणी भंगलेली असणे साहजिक आहे. अफझलखानाच्या हल्लाचे वेळी तुळजापूरच्या भोप्यांनी जशी देवी लपविली तसाही प्रकार येथे झाला असावा. मूर्तीचे दोन वरले हात दोन खांबांवर ठेवलेले मूर्तीपासून अलग असल्यासारखे दिसतात. पायही गुडघ्यापासून खाली, आसनाच्या मागे झाकलेले आहेत. आसनावर जो पायांचा भाग दिसतो, तोही धोतराने झाकला असल्याने मूर्तीला अवास्तव ठेंगूपणा आला आहे. असा हा एकंदरीत ठाकठेकीचा आणि लपवालपवीचा साज पाहून थोडी करमणूक होते. तोंडावळा पंढरपूरच्या विठोबासारखाच असून जणू काय एकाच शिल्पकाराने ह्या दोन्ही मूर्ती एकाच वेळी घडविल्या असाव्या असा भास होतो. ह्या दोन्ही देवळांच्या कालामध्ये फारसे अंतर नसल्यामुळे आणि मध्वाचार्याच्या मुत्सद्देगिरीचा आणि मतप्रसाराचा हा काळ असल्यामुळे वरील संबंध असणे अगदीच अशक्य असावे असे वाटत नाही.

ह्या देवळात ज्या कदंब, होयसल, चोळ, चालुक्य इ. राजांनी देणग्या दिल्याचे शिलालेख आहेत, त्यांच्यामध्ये आपसांत नेहमी कटकटी होत असत. ह्या लेखांतून परस्परांवर मिळविलेल्या विजयांची जी आत्मप्रोढीची आणि परनिंदेची वर्णने खुलवून लिहिली आहेत, ती येथे एकत्र वाचून ईश्वरी महात्म्यापेक्षा मानवी लाघवाकडे जास्त लय लागून मन खट्टू होते. तरी पण अशा वर्दळीच्या प्रदेशातील केंद्रस्थानी हे क्षेत्र असल्यामुळे हरिहराला दामटून एक करण्याला ही जागा फारच योग्य आहे ह्यात शंका नाही. एकूण ईश्वरी अवताराची सूत्रे माणसांच्याच हाती आहेत हे काही खोटे नाही. त्यातल्या त्यात ह्या ठिकाणच्या क्षेत्र चालकांनी जो धूर्तपणा व दूरदर्शित्व दाखविले आहे, तो धूर्तपणा हल्लीच्या लीग ऑफ नेशन्सलाही साधला नाही असे म्हणावे लागते! द्राविड, कानडी व मराठी ह्या भाषा मद्रास आणि मुंबई हे इलाखे, म्हैसूर आणि निजाम ही संस्थाने, वगैरे अनेक प्रवाह आजही तुंगभद्रेच्या काठी उभा राहून एक करणारा जो हरिहर देव तो हल्ली आमच्या हिंदुस्थानाला अत्यंत अवश्य असलेली एकी लवकर घडवून आणो, अशी प्रार्थना करून आम्ही ता. १७ एप्रिल १९२५ रोजी हरिहर सोडले आणि ता. १८ रोजी रात्री आमच्या पुण्यास येऊन पोहोचलो.