सार्वजनिक कर्मयोग नित्य व नैमित्तिक उपासनेच्या वेळी केलेले उपदेश
यस्त्विंद्रियाणि मनासा नियम्यारभ्यतेर्जुन|
कमेंद्रियै: कर्मयोगमसक्त: स विशिध्यसे||
-भगवदगीता अध्याय ३, श्लोक ७.
प्रेमसूत्र दोरी| नेतो तिकडे जातो हरी||
-तुकाराम
कर्माचे साम्राज्य सर्वत्र आहे, जेथे जेथे म्हणून जीवन आहे तेथे तेथे कर्म आढळतेच. सर्व जीवमात्राचे ते लक्षण आहे, इतकेच नव्हे तर त्यावाचून जीवनाची कल्पनाही होऊ शकत नाही. फार काय तर जड पदार्थात दृढता, स्थिरता इत्यादी जे गुण दिसतात आणि बाहेरच्या शक्तीशी त्या पदार्थाकडून जो विरोध घडतो त्यावरून निर्जीव वस्तूतही उघड नसले तरी, अंतस्थ कर्म चाललेलेच दिसेल. पण, इतक्या खोल न जाता आपण जर नुसते सजीव सृष्टीपासून पुढे निरखू लागलो, तर सर्वत्र कर्माचा अबाधित विस्तार दिसतो.
वनस्पतीसृष्टीत अगदी प्राथमिक कोटीच्या लव्हाळ्यापासून तो सुंदर विस्तारलेल्या मोठ्या वटवृक्षापर्यंत ज्या असंख्य घटना आहेत, त्या सर्वांचा आपल्या अल्पजीवन कालात आत्म मरणाचा व्यापार सतत चालू असतो. तसेच केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानेच दिसणा-या जीवाणूपासून तो वनात उद्दामपणे हिंडणा-या पशुपती सिंहापर्यंत प्राणिगणांचाही तोच उद्योग अहर्निश चालू असतो. स्वत:चा घट कायम राखणे, तो वाढविणे आणि पुढे पुढे त्याचा वंशविस्तार करणे हा निसर्गदत्त व्यवहार सर्वात बहुतेक सारखाच. तहानभुकेच्या रूपाने प्रकृतीचा बडगा पाठीवर बसला की पुढे हलावे, नाही तर तेथेच स्वस्थ बसावे, एवढाच त्यांचा अधिकार. माणसांपैकीही पुष्कळांची ह्यावर मजल गेलेली नाही. हे कर्म प्राकृत अथवा तामसिक समजावे. कारण ज्यांच्याकडून ते होत असते ते त्याच्या इच्छेवर थोडेच अवलंबून असते! प्रकृतीच आपला कडक अमल चालविण्यासाठी आपल्या योजनेस त्या बिचा-यांच्या इच्छेचे स्वरूप देऊन तितके कर्म बिनतक्रार करून घेत असते.
असे हे गाडे चालले असता उत्क्रांतीची दुसरी मजल येते. प्रकृतीने जवर अत्यंत कष्टाने घडवून ठेविलेल्या काही उत्कृष्ट घटात (आतापर्यत गूढ असलेल्या) आत्मतत्त्वास ह्यानंतर जागृती येते. पण जरी ही जागृती आली तरी प्राकृत कर्मास काही विराम पडत नाही. अनादी कालापासून घटाला जे कर्माचे वळण लागले असते त्यातच आत्माही भ्रमण पावू लागतो. कुंभाराने आपल्या काठीने काही वेळ चाक फिरवून काठी काढून घेतल्यावरही ते चाक जसे पुष्कळ वेळ फिरून कुंभाराचे इष्ट कार्य करते, किंवा एकाद्या गिरणीतल्या इंजिनाची शक्ती जवळच्या जड फ्लाय व्हीलमध्ये जाऊन इंजिनच्या शक्तीस जशी फ्लाय व्हीलच्या गतीची भर पडते, त्याप्रमाणेच हा नुकताच जागा झालेला आत्मा प्राकृत कर्मातच आपल्या भ्रांतकर्माची भर टाकीत असतो, ह्यामुळे ‘मी हे आज मिळविले, हेही पुढे मिळवीन- हे तर माझे आहेच, उद्या तेही दुसरे धन माझेच होईल, हा पहा वैरी मी मारिला, इतरांनाही चित करीन, मी राजा आहे, मी भोगी, मी सिद्ध, बलवान, सुखी, मी मोठा कुलीन,-कोण मजसारखा आहे,-मी स्वत: भोगतो, दुस-याला पण देतो,- ह्या प्रकारचा गीतेत (अ. १६ श्लोक १३-१५) सांगितलेला “अज्ञानविमोहित” प्रकार होतो. फ्लाय व्हीलने गिरणीत जसे अधिक कार्य होते तसे भ्रांत आत्म्याच्या कर्माने प्रकृतीतही अधिकच घडामोड होते. हे राजसी कर्म होय. आत्म्याच्या विकासात ह्याची जरूरीच आहे.
म्हणून शहाण्यांनी ह्याची विनाकारण अवहेलना करू नये. सात्विक कर्माकडची वाट आत्म्याला ह्यातूनच आहे...” ‘कर्माचा आरंभ केल्याविना नैष्कर्म्य प्राप्त होणे नाही’ (गीता अ. ३ श्लोक ४) म्हणून ह्यात गुंतलेला ‘पुरूष’ आपल्या इष्ट वाटेवरच आहे असे समजावे.
पण, ह्या राजसी कर्माचे सर्व चलन प्रकृतीकडून मिळाले असल्यामुळे ह्याचे पर्यवसान दोन रीतीने होण्याचा संभव आहे. स्वत:ची शक्ती नसल्यामुळे कुंभाराचे चाक जसे काही वेळाने बंद पडते तसेच राजसी पुरूषाला प्रकृतीकडून जे चलन मिळाले असते ते बंद पडते आणि वृद्धावस्थेत त्याला शीण व औदासिन्य ही शिल्लक उरतात. आणि त्याच्या शरीराचे अवसान होण्यापूर्वी त्यास शोचनीय नैष्कर्म्य प्राप्त होते. हा एक प्रकार. दुसरा असा की, राजसी मनुष्यास काही अंशी स्वप्रयत्नाने व काही अंशी ईशप्रसादाने वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे, आपण करतो ती सर्व कृत्ये किती बालिश आहेत व आपल्या प्रवृत्ती वस्तुत: किती व्यर्थ आणि विवश आहेत, ह्याची खात्री होऊन तो तटस्थ आणि निष्कर्म होतो. गीतेतील दुस-या अध्यायातला ईश्वरी उपदेश ऐकून अर्जुनाची हीच स्थिती झाली. किंवा आपल्या विवेक सामर्थ्याने विश्वव्यापाराचे विज्ञान झाल्यावर वेदांत्यास अगर ब्रह्मज्ञान्यास जी विरक्ती आणि विवृत्तदशा येते तीही ह्याच प्रकारची.
ही वर सांगितलेली दुस-या प्रकारची निष्कर्म दशा प्राप्त झाली म्हणजे आपल्या वरचा प्रकृतीचा जुलूम अगदी नाहीसा होतो. आत्मा पूर्ण जागृत व स्वतंत्र होतो. ह्या उज्ज्वल जागृतीस कोणी आत्म्याचे पुनर्जन्म म्हणतात. म्हणून आम्हास द्विज ही संज्ञा येते.
पण अशा रीतीने आत्म्यास पूर्ण ज्ञान व स्वातंत्र्य प्राप्त झाले म्हणजे तो कृतकृत्य झाला असे नव्हे तर उलट आतापासूनच त्याच्या कर्तव्यास आरंभ होतो. आतापर्यंत जी त्याने कर्मे केली ती यंत्राप्रमाणे केली. ह्यावर त्याला एकाद्या हुशार आणि विश्वासू नोकराप्रमाणे कामगिरी बजावयाची असते. पण तो पूर्ण स्वतंत्र असल्यामुळे ही नोकरी पत्करणे न पत्करणे त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. वेदांती असतो तो अवश्य तितकी प्राकृत कर्मे केवळ निरूपायाने व उदासीनपणे करतो. पण जो भक्त असतो तो-
मने सहित वाचा काया| अवधी दिली देवराया||
हा तुकारामाचा मार्ग पत्करतो; केवल ज्ञानापलीकडे वेदांत्यापासून इतरांस काहीच फायदा होत नाही. पण भक्त आहे तो ईश्वरी नोकरी म्हणून परार्थास आपल्यास वाहून घेतो. ही नोककरी म्हणजे अगदी खुशीचा सवदा आहे. येथे कसली जबरदस्ती नाही. वाटल्यास करावी, वाटेल तितकी करावी! पण ब्रह्मज्ञान्यांनीही हे लक्षात ठेवावे की, स्वातंत्र्याचे जोरावर जरी त्यांनी देवाची कामगिरी सोडली तरी प्रकृतीची गुलामगिरी त्यास करावी लागणारच. एकपक्षी खुशीची नोकरी, उलट घनघोर गुलामगिरी ह्यांत शहाण्यांनीच निवडावे. बरे, नोकरी जी आहे तीही नुसती खुशीची आहे, इतकेच नव्हे तर तिचे पर्यवसान अखेर मैत्रीत होणारे आहे. नोकर आणि प्रभू ह्यांमध्ये जे सूत्र आहे ते प्रेमसूत्र आहे. नोकरी करता करता आपल्यास इतकी बढती मिळणार आहे की, आपण ईश्वराचे अगदी सके बनू. ज्ञानयोग साधून संसारातून उठावे आणि प्रकृतीचे दास्य करावे की कर्मयोग साधून ईश्वराचे मित्र होऊन पृथ्वीवर स्वर्ग आणावा ह्याचा निकाल स्वतंत्र माणसांनी करावा.
हा कर्मयोग साधणे आमच्या समाजाचा धर्म आहे. संसारात आनंदाने राहणे आणि तदंगभूत कौटुंबिक, सामाजिक, राजकीय इ. जी अनेक कर्मे असतील ती केवळ जडहित साधण्याच्या हेतूनेच नव्हे, तर ईश्वरी योजना असे समजून त्याची सेवा जाणूनबुजून करण्याचे हेतूने करणे म्हणजे वरील कर्मयोग होय. विश्वात ही जी अवाढव्य योजना आहे, ती आपल्या इच्छेवर अवलंबून नाही किंवा ती पार पाडण्याची आपल्यात शक्ती नाही, तरी ह्या योजनेस अंशत: साधनीभूत होणे किंवा तटस्थ राहणे हे आपल्या इच्छेवर आहे.
सत्कर्म कोणते व दुष्कर्म कोणते ह्यांविषयीची प्रेरणा आणि ते करण्याची स्फूर्ती ह्या प्रत्येक मानवी अंत:करणात होण्यासारख्या आहेत व त्या तशा नित्य होतातही. धर्माधिकारी व उपदेशक ह्यांचे जर काही काम असेल तर ते इतकेच की मानवी अंत:करण व ह्या प्रेरणांचा उगम जो ईश्वर ह्यांमध्ये ज्या काही उपाधी असतील त्या दूर करून आत्म्याचा ईश्वराकडचा मार्ग सुगम व जवळचा करावा. ह्या उपाधींपैकी स्वत: आपणच एक उपाधी होऊन राहू नये.
ज्ञानाचे भक्तीत आणि भक्तीचे ह्या कर्मयोगात नेहमी पर्यवसान होत आले आहे हे धर्माच्या एकंदर इतिहासावरून स्पष्ट दिसून येते.