सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक

[“सुधारकच हिंदू धर्माचे खरे रक्षक” ह्या सक्षक” ह्या सदराखाली लिहिलेल्या व ‘विजयी मराठा’ पत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात रा. रा. वि. रा. शिंदे ह्यांनी ब्राह्मसमाजाविषयी वरील विचार प्रदर्शित केले आहेत......संपादक].

हिंदू धर्माला अत्यंत विशुद्ध आणि जिवंत स्वरूप दिले, इतकेच नव्हे तर अखिल भारताला आधुनिक राष्ट्रांच्या कोटीत ज्या महात्म्याने आणून बसविले, त्या जगप्रसिद्ध राजा राममोहन रॉय ह्यांनी इ. स. १८२८ सालीच्या ऑगस्ट महिन्यात ब्राह्मसमाजाची संस्थापना कलकत्ता येथे केली. इ. स. १९२८ सालात ब्राह्मसमाजाची पहिली १०० वर्षे पूर्ण होतील म्हणून सर्व हिंदुस्थानभर ठिकठिकाणच्या ब्राह्मसमाजांकडून हा शतसांवत्सरिक उत्सव मोठ्या थाटाने करण्यात येणार आहे. त्यावेळी कलकत्त्यास ह्या समाजाचे अखिल भारतवर्षीय प्रचारक एकत्र जमून पुढील प्रचार कार्याची नवीन योजना करणार आहेत. ब्राह्मसमाजात सर्वमान्य झालेले जे ग्रंथ, देवेंद्रनाथ ठाकूर ह्यांचे ब्राह्मधर्म व्याख्यान, सर डॉ. भांडारकर आणि आंध्र देशातील प्रसिद्ध पुढारी सर व्यंकटरत्न नायडू ह्यांचे उपदेश व व्याख्याने इ. ह्यांच्या देशी आणि इंग्रजी भाषेतून नवीन आवृत्त्या प्रसिद्ध करण्याची योजना हल्ली कलकत्त्यात चालू आहे. सदर उत्सवाचे प्रसंगी अमेरिका, जपान, इराण आणि युरोपातील मुख्य मुख्य देशांतील ख्रिस्ती, बौद्ध आणि मुसलमानी धर्मातील उदार मतवादी चळवळीच्या पुरस्कर्त्यांनाही मुद्दाम आमंत्रण करून आणविण्यात येणार आहे. अशी ही आंतरराष्ट्रीय उदार धर्माची परिषद भरविण्याची तयारी इ.स. १९१४ सालीच बहुतेक झाली होती. पण तेव्हा अकस्मात युरोपियन महायुद्धाची वावटळ उठल्याने हा शांतिहोम जागच्या जागी जिरला. इ. स. १९२८ साली तो ब्राह्मसमाजाच्या विद्यमाने पुन्हा घडविण्यात येणार आहे. हे काम केवळ एका राष्ट्राचे नसून अखिल जगाच्या एकीचे व शांतीचे आहे. आणि त्याची जरूरी सर्वाहून आमच्या कलहाग्नीने होरपळून गेलेल्या राष्ट्राला अधिक भासत आहे. त्यात ब्राह्मसमाज यशस्वी होवो!