सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
इकडे शुद्ध व उदार धर्माच्या अनेक चळवळी चालू आहेत. त्यात स्त्रिया अलीकडे बहुतेक पुरूषांच्या बरोबरीने पुढाकार घेऊ लागल्या आहेत. युनिटेरिअन्स हे सुधारलेल्या देशातले सुधारक असल्याने त्यांच्यात तर हा प्रकार विशेष दिसून येतो आणि तो दिवसेंदिवस वाढतच आहे. उपासनामंदिरात नेहमी स्त्रियांची संख्या पुरूषांपेक्षा सर्वत्र दुप्पट असतेच, पण कार्यसभेतही ह्यांची संख्या निदान पुरूषांइतकी असते, इतकेच नव्हे, तर प्लॅटफॉर्मवरही ह्या आपले काम दक्षतेने बजावतात. मागच्या वर्षी लंडन येथे युनिटेरिअन वार्षिक सभेत दोघींची भाषणे झाली, तर ह्या वर्षी काही आठवड्यांपूर्वी जी मोठी परिषद भरली होती, तीत चौघींनी स्वानुभवानी जोरदार व मुद्देसूद भाषणे केली.
पण केवळ स्त्रियांनीच जे काम आपलेकडे घेतले आहे आणि जे त्या मोठ्या मार्मिकपणे व उमेदीने बजावीत आहेत ते पोस्टल मिशन हे होय. ते काम असे आहे.
प्रमुख युनिटेरिअन आचार्यांचे साधे आणि मनोवेधक उपदेश पुस्तकरूपाने युनिटेरिअन मंडळी प्रसिद्ध करते. त्यांपैकी काहींची प्रथम निवड करून, ह्या बाया कोणाही वाचकांस फुकट आपल्या खर्चाने पाठविण्यासंबंधीच्या जाहिराती, इकडील प्रसिद्ध पत्रांतून आपल्याच खर्चाने देतात. ह्या पत्रांचा युनिटेरिअन मताशी कसलाही संबंध बहुतेक नसतो. संशयाने गांजलेल्या लोकांकडून अगर केवळ काय आहे हे पाहण्याच्या इच्छेने इतरांकडून ह्या पुस्तकांस सहजच मागणी येते. पुस्तक पाठविताना अशी एक लहानशी सूचना करण्यात येते की वाचून काही शंका आल्यास त्यांच्या निरसनार्थही यत्न होईल. शंका कळविल्यास त्याचे समाधान ज्यात मिळेल, अगर समाधान कळविल्यास त्याचे दृढीकरण जेणेकरून होईल अशी दुसरी पुस्तके पाठवितात. त्याबरोबर लहानसे पण सहानुभूतीचे पत्रही जाते. अशा रीतीने सहजच पत्रव्यवहार वाढून, शेवटी आपम युनिटेरिअन आहो असे प्रत्येकास कळून येते. पुस्तके पाठविण्यात विनाकारण घाई अगर मिशनरी लोकांत काही ठिकाणी दिसून येणारा अधाशीपणा न होऊ देण्याची खबरदारी घेतली जाते. पत्रव्यवहारही जिज्ञासूंच्या अनुसंधानानेच चालतो. अशा रीतीने युनिटेरिअन म्हणजे धर्मलंड अगर धर्माभिमानशून्य वगैरे ज्या भ्रामक कल्पना झाल्या असतात, त्यांचा निरास होऊन वाचक युनिटेरिअन मंदिरात उपासनेस जाण्यास राजी झाले, असे दिसल्यावर त्यास त्यांच्या गावांतील युनिटेरिअन मंदिराची वाट दाखविण्यात येते, अगर आचार्यांची ओळख करून देण्यात येते. आतापर्यंत जी मदत पत्र मार्गाने होते ती ह्यापुढे प्रत्यक्ष होऊ लागून लवकरच वाचक झालेल्या उपकाराबद्दल उतराई होण्यास उत्साहपूर्ण युनिटेरिअन होतो.
ही कल्पना मूळ अमेरिकन युनिटेरिअन स्त्रियांत निघाली. ती लंडन येथील स्त्रियांनी उचलली. जाहिराती व टपाल खर्चासाठी लहानशी वर्गणी स्थापून युनिटेरिअन स्त्रियांनी आपल्यातच एक अशी मंडळी बनविली. १८८७ साली एकच मंडळी होती. १८८९ साली ह्या देशातील निरनिराळ्या शहरांत अशा १३ मंडळ्या निघाल्या. हल्ली २३ मंडळ्या असून त्यांचे सभासद वाढतच आहेत. ह्या सर्वांचे एक साधारण संमेलन लंडन येथे आहे. गेल्या तीन वर्षांत ५००० लोकांकडून मागण्या आल्या व त्यास १५००० वर पुस्तके पाठविण्यात आली. अशी पुस्तके वाचून युनिटेरिअन झालेल्यांपैकी काही थोडे आचार्य बनले, बरेच साधारण उपदेशक बनले, कित्येक आदित्यवारच्या शाळेत शिकवू लागले.
त्रैवार्षिक, वार्षिक आणि प्रांतानिहाय युनिटेरिअन समाजाच्या इतर ज्या सभा भरतात त्यांत ह्या मंडळ्याही जमतात. तेव्हा त्या आपल्या कामाचा ऊहापोह करून आपली हकीकत प्रसिद्ध करितात. अशा वेळी जी भाषणे व्हावयाची असतात, ती ते लोक ह्या मिशनच्याद्वारे युनिटेरिअन बनलेले असतात, त्यांच्याकडूनच होतील अशी योजना असते. काही पत्रांचे उतारे वाचतात त्यांचे मासले येणेप्रमाणे:
जुन्या मताचा उपदेशक- ‘मि. बोबीसाहेबांचा उपदेश ऐकल्यापासून मी स्वत:शी युनिटेरिअन आहे की काय असा विचार करीत आहे. तो उपदेश प्रत्येक पीठातून व्हावा असे वाटते..............’
खाणीतील मेथॉडिस्ट मजूर- ‘मार्टिनोसाहेबांचा (..............) हा ग्रंथ वाचण्याची आमची इच्छा आहे. पण विकत घेण्याची शक्ती नाही. आमच्या समाजातील काही जणांची मते तुमच्यासारखीच आहेत. तुमचा समाज तुम्हांला वाटतो त्यापेक्षा मोठा आहे........’
अज्ञेयवादी- ‘तुम्ही मला पाठविलेली पुस्तके वाचून सुमारे १२ जण युनिटेरिअन झाले आहेत......माझे कोडे उकलले......तुम्ही दाखविलेले देवाचे स्वरूप इतके सहज आहे की, त्याचे प्रेम मला अपरिहार्य झाले आहे.’ ह्याप्रमाणे असे हे काम केवळ बायकांनीच मिळून नीटनीटके बिनबोभाट व बिनतक्रार चालविले आहे. पुरूष हकीकत ऐकण्यास मात्र सभेस येतात. लहानमोठ्या पुस्तकांचा साठा मात्र युनिटेरिअन असोसिएशनकडून लागेल तितका खुषीने मिळतो, त्यात काय नवल!
वर मी जी हकीकत दिली आहे, ती केवळ वाचून हर्ष आणि आश्चर्य मानण्याकरिता एक विलायती चुटका पाठविला आहे असे नव्हे. तर हे काम तुम्हांकडूनही होण्यासारखे आहे व होणे जरूर आहे.
मी गेल्या वर्षी एकदा लंडनमध्ये असता ह्या मंडळीच्या मुख्य अध्यक्षबाईस ह्या कामाची माहिती विचारली. प्रत्यक्ष ओळख नसता ह्या बाईने मला आणि मुख्य सेक्रेटरीबाईला आपले घरी भेटविले आणि दोघांनी मोठ्या आनंदाने व अगत्याने मला सर्व माहिती करून दिली. लगेच आमचे बंधू रा. सुखटणकर ह्यांनी हे काम आपल्या अंगावर घेतले व आतापर्यंत अनेक अडचणी सोसून तिकडे हे काम चालविले आहे पण आता त्यांना इकडे येणे आहे.
हे काम खरोखर स्त्रियांनाच योग्य आहे, आणि स्त्रियांना खरोखरी तूर्त हेच काम आहे, हे इकडच्या अनुभवावरून निर्विवाद आहे. आर्य महिला-समाजात तुमच्यापैकी कित्येकींनी निबंध वाचलेले ऐकिवात आहे. असे निबंध वाचण्यापेक्षा वरील पोस्टल मिशनची दोन चार ओळींची पत्रे लिहिणे विशेष अवघड आहेसे वाटत नाही. उलट फायदा मात्र पुष्कळ होईल. ह्यावरून आर्य महिला-समाज बंद करा असे माझे म्हणणे नाही, तर त्यात एक तुमचेच पोस्टल मिशन वरील धोरणावर काढा अशी विनंती आहे. रा. सुखटणकर तेथे आहेत तोपर्यंत आपल्या अनुभवाचा फायदा तुम्हांला अगदी आनंदाने देतील. ह्या कामाला मोठी एक परिषद भरविली पाहिजे असे नाही. हे काम बोभाट्याचे अगर भपक्याचे मुळीच नव्हे तर तुम्हांला शोभेल अशा मर्यादेचे आहे. दिवाणखान्यात पडद्याआड बसून मुलांस खेळवीत खेळवीतही तुम्ही हे काम उरकू शकाल. प्रत्येक पोस्ट-मास्तर व पोस्टाचा शिपाई तुम्हांस बेमालूम मदत करील-करणे भाग आहे.
जिज्ञासूंची उणीव आहे म्हणावे, तर तसेही नाही. आज हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांतून कित्येक तरूण विद्यार्थ्यांची पत्रे लंडन येथील सेक्रेटरीबाईकडे येत आहेत. ती बाई ती पत्रे मजकड पाहण्यास पाठविते. घरच्याघरी तेथे तुम्ही हे काम पत्करल्यास किती सोय होईल!
युनिटेरिअनांचा, आमचा व इतर सर्वांचा देव एकच आहे. सर्वांच्या अंत:करणातल्या ख-या गरजा व वेदना एकच आहेत. म्हणून ह्याबाबतीत तुम्हांला इंग्रजीत जितक्या म्हणून वाड्मयाची गरज पडेल तितके सर्व इकडील तुमच्या बहिणींकडून मोठ्या आनंदाने पुरविण्यात येईल. येशू ख्रिस्त किती जरी चांगला मनुष्य होता अशी इकडे ह्यांची समजूत आहे, तरी आमच्या लोकांनी त्यांचेच गोडवे गावे अशी ह्यांची कोती इच्छा नाही. आधुनिक विचारपद्धतीस पूर्ण पटतील अशीच केवळ ईश्वरविषयक पुस्तके लागतील तितकी पाठवतील. इतकेच नव्हे तर आफ्रिकेतून काही मुसलमान लोकांकडून पत्रे आली आहेत, त्यांच्यासाठी राजा राममोहनराय ह्यांनी मागे मुसलमानांसाठी कुराणासंबंधी काही लेख लिहिलेले उपलब्ध आहेत काय म्हणून अध्यक्षबाई मिस् टॅगर्ट हिने मला परवा लंडन येथे विचारले. ते लेख मिळतील तर इकडे छापून निघण्यास अडचण पडणार नाही. ह्याचप्रमाणे आमचे पुढारी केशवचंद्र व प्रतापचंद्र इत्यादिकांचेही लहानलहान लेख रा. सुखटणकरांनी तिकडे छापून ह्याच कामासाठी काढिले आहेत. सवडीप्रमाणे व मदतीप्रमाणे मराठी पुस्तकांचीही ह्यात भर पडत जाईल.
म्हणून आमच्या समाजातील तुम्हा सर्व बहिणींस-खुशी असल्यास बाहेरच्यासही-अशी अगत्याची विनंती आहे की रा. सुखटणकर हे हिंदुस्थान सोडण्यापूर्वी तुम्ही आपल्यात एक पोस्टल मिशन स्थापावे. प्रथम प्रथम जड गेल्यास एका-दोघांकडून मदत घ्यावी. पुष्कळ जी जमण्याची जरूरी नाही. एक अध्यक्ष, एक खजिनदारीण आणि खरोखर झटून काम करणारी एक सेक्रेटरी मिळाल्यास पुरे. सर्व काही ह्या एकीवरच अवलंबून आहे. टपालखर्च भागविण्यास इतर वर्गणीदार स्त्रिया मिळतील तितक्या थोड्याच.
इतर पाल्हाळ लिहिण्याची गरज नाही. सार्वजनिक कामे करण्याचा स्त्रियांना हक्क आहे व त्यांच्यात शक्तीही आहे अशा अर्थाचे बरेच लेख सुधारकांनी लिहिले आहेत व तुम्हांस ते पटले आहेत. हे एक लहानसे काम घरी बसूनच होणारे आहे. त्याचा विचार व्हावा.