सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला विस्मय व विषाद
डेव्हनपोर्ट
ता. ३-४-१९०२
परवा गुडफ्रायडेच्या दिवशी येथील निरनिराळ्या ख्रिस्तीधर्मपंथांच्या देवळांत निरनिराळ्या थाटाच्या उपासना सर्व दिवसभर झाल्या. अज्ञान, दुराग्रह, सवय किंवा दुस-या अनेक अज्ञेय आणि अनिर्वाच्य कारणांमुळे ह्या सुधारणेच्या शिखरास पोहोचलेल्या राष्ट्रातसुद्धा अद्यापि धर्मभोळेपणाचे जे अवशेष राहिले आहेत, त्यांचे दिग्दर्शन वरीलप्रसंगी बरेच झाले. त्यांपैकी काही अनुभवाचे मासले आपल्याकडे पाठविणार होतो, इतक्यात ता. ११ मार्च १९०२ च्या केसरीने कृष्णातटाकी नुकत्याच घडलेल्या सोमयागाची गोष्ट यथासांग सांगितली. ती ऐकून दुस-याचे घरी डोकावून पाहून तेथे काय चालले आहे त्यासंबंधी चर्चा करण्यापूर्वी आपल्याच पायाखाली काय जळते आहे, ह्याची पृच्छा करणे अधिक जरूर वाटले. केसरीने सांगितलेली गोष्ट ऐकून केसरीचे आभार व त्या गोष्टीबद्दल विस्मयपूर्वक विषाद एका दोघांसच नव्हे तर पुष्कळांस वाटण्याचा संभव आहे. आणि खरोखर तो संभव नसेल तर विषाद वाटण्याला सोमयागाहूनही हे एक दुसरे जबर कारण आहे असेच म्हणावे लागते.
एकाद्या आडरानात चारचौघा कोळ्यांनी एकाद्या शेंदूर माखलेल्या दगडाच्या म्हसोबापुढे जमून ‘जय म्हसोबा! भगतावर कृपा कर’ अशी मराठीत साधी प्रार्थना करून एकादे कोंबडे कापले आणि म्हसोबाचा प्रसाद म्हणून ते सर्वांनी मिळून गिळिले तर होणारा जो प्राकृत यज्ञ तो, आणि कृष्णातटाकी वीस विद्वान ब्राह्मणांनी तीन बक-यांस बुक्क्यांनी मारून शेवटी त्याचे तिळाएवढे मांस खाऊन जी संस्कृत कंदुरी केली ती, या दोहोंमध्ये वास्तविक फरक किती आहे! फरक जर असेल तर तो हाच की साध्या मराठी अनार्य यज्ञाचा साधारण समाजावर म्हणण्यासारखा परिणाम घडत नाही, आणि ह्या थाटाच्या खर्चाच्या सोवळ्या आर्यजत्रेचा परिणाम उच्चवर्गापासून तो खालपर्यंत समाजावर इतका जोरदार घडतो की बिचा-या उदार धर्मास दोन पावले आणि दोन दशके मागे हटावे लागतेच!!
सोमयागाचे एकंदर वर्णन वाचून त्यात तीन निरूपद्रवी बक-यांचा सदोषवध अगर निरर्थक खून याखेरीज दुसरे काहीही धडधडीत अनीतीचे अगर अन्यायाचे नाही ही गोष्ट प्रथम दर्शनीच धर्मवेडाच्या अगदी कट्ट्या शत्रूसही साफ कबूल करावी लागेल.
(तशी काही अनीती अगर अन्याय असला तर कायद्याने त्याचा सक्त बंदोबस्त कधीच झाला असता, हेही सांगावयास नको.) समाजात उत्तरोत्तर विकसित होणा-या न्याय, नीती आणि शिष्टाचार ह्या तीन गोष्टीं संभाळून कोणाही व्यक्तीस अथवा समूहास आपले जुने आचार मोठ्या थाटाने साजरे करून मनाची करमणूक अगर दुसरी कसलीही समजूत करून घेण्याची पूर्ण मुभा आहे.ते जुने आचार त्यांच्या कितीही पूर्वदशेतील असोत, त्यांची परंपरा आजघडीपर्यंत सारखी चालू असो, किंवा मध्यंतरी हजारो वर्षांची खळ पडली असून आजच त्यांची आठवण होऊन त्यांच्या जीर्णोद्धाराचा काळ आला असो, कोणत्याही बाजूने पाहिले तरी ते आमचे आचार आम्ही करण्याचा आमचा जो बाणेदार उपजत हक्क आहे, त्यास रतीमात्र बाध येत नाही, इतकेच नव्हे तर सार्वभौम सर्व सामर्थ्यवान, सरकारासही ह्या हक्काकडे वाकड्या नजरेने पाहण्याची छाती नाही. ह्या सर्व गोष्टीं समाधानकारक आहेत ह्यात शंका नाही.
पण येथे हक्काचा किंबहुना आवडीचाही विचार कर्तव्य नाही. ह्या घडलेल्या प्रकरणात धर्म कितपत आहे किंवा तो मुळी आहे की नाही, किंबहुना बक-यांच्या रूपाने धर्माचाच येते खून घडला आहे की काय, ही गोष्ट दिसल्यास पाहणे आहे, आणि डोळे उघडे असल्यास ती दिसण्यास मुळीच कठीण पडणार नाही, ह्याची खात्री आहे. घडलेला प्रकार जर गमपत्युत्सवाप्रणाणे केवळ राष्ट्रीय उत्साह वाढविण्याप्रीत्यर्थ घडला असता तर त्यात विशेष मन घालण्याची जरूरी नसती. पण ज्याअर्थी तो अस्सल धर्माच्या नावावर घडला आहे, त्याअर्थी त्याजकडे सर्व मुमुक्षू जनांचे लक्ष पोहोचले पाहिजे. आणि विशेषेकरून धर्मसुधारकांचे ह्या बाबतीत ओदासीन्य तर अगदी अक्षम्य होईल.
आत-बाहेर सर्वत्र नांदणारा जो परमात्मा आणि व्क्तिविशिष्ट जो जीवात्मा ह्यांचा परस्पर संबंध आणि निरंतर समागम ह्यांस, धर्म म्हणतात. अंतर्याम, उच्च मनोविकार, नैतिक शक्ती इत्यादिकांच्या द्वारे, बाह्यसृष्टी, अंत:सृष्टी आणि जगाचा विकासमय इतिहास ह्या तीन प्रदेशांत जिवंत जागृत परमेश्वराचे प्रतिक्षणी काय काय व्यापार घडतात ते ओळखणे, कृतज्ञतापूर्वक त्याचे सान्निध्य साधणे आणि संसारातील लहान मोठी कामे त्याच्या सान्निध्यास शोभतील अशा रीतीने करणे ही आमची धार्मिक कर्तव्ये. तीन साडेतीन हजार वर्षांपूर्वी आमच्या आर्यपूर्वजांनी जेव्हा हिंदुस्थानाच्या काठावर प्रथम बि-हाड ठेविले असेल तेव्हा परमेश्वराचे बाह्यसृष्टीतील विलास पाहून ते किती मोहित झाले असावेत ह्याचे साद्यंत दाखले वेदात आढळतात. आपल्या साध्या सरळ आणि जिवंत भाषेत त्यांनी देवावरची गाणी गाइली. फूल नाही फुलाची पाकळी, जे काही ज्यांच्याजवळ होते त्याचा थोडा भाग, नवीन भेटलेल्या देवास आपली कृतज्ञता दर्शविण्यासाठी त्यांनी सांज-सकाळ अर्पण केला, हे त्यास कितीतरी शोभले! पण कालांतराने जेव्हा ह्या परकीयांच्या वसाहती उत्तर-हिंदुस्थानात ब-याच पसरल्या आणि ह्यांचे सांपत्तिक व सामाजिक वैभव पुष्कळ वाढले, तेव्हा अर्थात वरील आराधनेचा स्वाभाविकपणा नाहीसा होऊन तिच्यात कृत्रिमपणा शिरला. पूर्वी जे अंत:करणाच्य देठापासून निघत होते, तेच आता जिभेच्या व ओठाच्या शेवटापासून निघू लागले. पूर्वी प्रत्येक घरधनी आपला आपणच योद्धा, कुणबी व उपाध्याय होता, पण आता त्या तीन कामक-यांच्या तीन जाती बनल्या, आणि धर्माच्या नावावर कर्मठपणा वाढू लागला, पण अद्यापि ब्राह्मण तेज लयास गेले नव्हते. खरे जे ब्रह्मवीर होते. त्यांनी अरण्यातच राहून उपनिषदांतून ह्या कर्मठपणाचा जोराने निषेध केला आणि धर्माची इमारत बाह्यसृष्टीतल्या साक्षात्कारावरून उठवून ती अंत:सृष्टीच्या अधिक खोल व खंबीर पायावर उभारली. आमच्या धार्मिक इतिहासातील हा पहिला निषेध (Protestantism) होय. पण ह्या रानातील मानसिक चळवळीमुळे गावांतील बहुजनसमाजातील कर्मठपणा कमी होणे शक्य नव्हते. म्हणून त्यास वैतागून गौतमबुद्धाने दुसरी धर्मसुधारणा केली (ख्रि. श. पूर्वी ४६८) सुमारे १०००-१२०० वर्षांनी बुद्धाच्या सुधारणेचाही जोर संपला आणि कर्मठपणाच्या लाटा तर पूर्वीपेक्षाही जास्त उंच उसळू लागल्या! नंतर १२ व्या शतकापासून तो १६ व्या शतकाअखेर सर्व हिंदुस्थानभर नानक, चैतन्य, तुकाराम वगैरे साधुसंतांनी तिसरी सुधारणा केली. आता २० व्या शतकातला प्रकार आमच्या डोळ्यांपुढेच आहे.
धर्माचे जे लक्षण वर सांगितले आहे आणि त्या लक्षणाचा जो धर्म उपनिषदे, भगवद्गीता, गौतमबुद्ध आणि आधुनिक साधू यांनी प्रचारिला, त्या सनातन धर्माचा कोणता भाग किती अंशाने वरील सोमयागात आहे आणि ज्यांस प.वा. आगरकरांनी आपल्या एका निबंधात ‘हे भीषण, बीभत्स हिंदुधर्मा........तू आपले तोंड लवकर काळे कर,’ अशी सक्त नोटीस दिली आहे, त्या धर्माचा किती अंश ह्या सोमयागात आहे, ह्यांचा विचार धर्माची ज्यांना म्हणून किंचित तरी पर्वा आहे, त्या प्रत्येकाने आपल्या स्वत:शी केला पाहिजे. बाकी ज्यांना धर्माच्या नावाने नुसती करमणूकच करावयाची असेल अगर दुसरा कसला तरी अर्थ साधावयाचा असेल, त्यास हाच काय पण दुसरा कोणताही प्रकार चालेल आणि शोभेल. कृष्णातटाकी जमलेल्या वीस विद्वानांच्या विद्वत्तेसंबंधाने कोणासही शंका घेण्याचे कारण नाही. पाच दिवस एकसारखे तिन्ही वेदांचे पाठ ह्यांनी बिनचूक आणि बिनविलंब म्हटले तर श्रौतवाड़मयात ह्यांची नंबर एकची गती असली पाहिजे. पण ह्यांच्या ह्या अमूल्य संपादणुकीचे चीज अशा योगाने होईल काय? इकडे पाश्चात्य पंडित, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश भाषांतून वैदिक वाड़मयाचा प्रत्येक शब्द उतरवीत आहेत, तर ह्या ब्राह्मण विद्वानांनी त्या वाड़मयाचे निदान काही वेचे तरी देशी भाषेत उतरविल्यास त्यांची योग्य संभावना होणार नाही काय? जुन्याचा खरा उद्धार अशा रीतीने होईल की तीन हजार वर्षांपूर्वी ज्या गोष्टी जशा घडल्या त्या आता तशाच उठविल्याने होईल?
शेवटी धर्माच्या बाबतीत उदासीन राहणा-या नास्तिक व अज्ञेयवादी सुधारकांनीही हे लक्षात ठेविले पाहिजे की धर्माच्या नावाने जी ही थोतांडे वेळोवेळी उपस्थित होतात व वाढत जातात ती त्यांची केवळ थट्टा किंवा निंदा केल्याने नाहीशी होत नाहीत. उलट लोकमतांचे ह्या थोतांडास पूर्ण पाठबळ असल्याने ह्या रिकामटेकड्या सुधारक थट्टेखोरांचीच थट्टा होते. शिवाय ही सर्व थोतांडे नाहीशी झाली तरी म्हणजे मोठासा कार्यभाग झाला असे नाही. शुद्ध धर्माची ज्योत राष्ट्रात सतत जळती राखल्यासच राष्ट्राच्या अनेक चळवळीस जोम येईल आणि ह्यास्तव प्रत्येक देशभक्ताने धर्मसुधारणेचे काम हस्ते परहस्ते करणे जरूर आहे.