क्षात्रधर्म
‘हत्या क्षात्रधर्म नव्हे निष्काम ते कर्म ।’ --तुकाराम
श्री शिवाजी महाराजांचा जन्म आज फाल्गुन वद्य तृतीया रोजी मानून ब-याच ठिकाणी हा राष्ट्रीय उत्सव करण्यात येत आहे. हा जन्म आजच्या तिथीस झाला, हा एक मोठा वाद इतिहाससंशोधकांमध्ये हल्ली माजून राहिला आहे. ह्या वादाकडे माझे स्वतःचे लक्ष मुळीच नाही. तो महत्त्वाचा नाही असे माझे म्हणणे नाही. मात्र त्यात मी लक्ष घातले नाही व अद्याप घालू इच्छित नाही. पण श्री शिवाजी महाराजांचा जन्म ही मात्र मोठी मुहूर्तवेळ आहे. आणि त्यावेळेस क्षात्रधर्म ह्या आध्यात्मिक विषयावर प्रवचन करण्याची संधी पुणे येथील ट्रेनिंग कॉलेजच्या चालकांनी मला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी स्वतः माझेही अभिनंदन करीत आहे.
माझे आजचे प्रवचन हे ऐतिहासिक व्याख्यान अगर राजकारणी वक्तृत्व नसून एक आध्यात्मिक प्रवचन आहे हे उघड आहे. ज्या गंभीर क्षोभहीन आणि निर्विकार वृत्तीने मी ते करीत आहे, त्याच वृत्तीने आपण सर्व लहानथोर ऐकाल अशी आशा आहे. प्रस्तुत काळ क्षोभाचा आहे. दारूच्या सुरूंगाप्रमाणे वातावरण क्षोभाने भरले आहे. त्यावेळी मी कितीही निःक्षोभतेने बोललो तरी ऐकणारे किंवा टीका करणारे किंवा राजकीय शास्ते तितक्याच निर्विकार मनाने माझ्या प्रवचनाचा स्वीकार करतील अशी खात्री नाही. काही असो. आलेल्या कर्तव्याच्या प्रसंगाला मान देऊनच, जबाबदारी ओळखूनच मी माझे कर्तव्य करीत आहे.
हल्लीचा काळ दुसरीकडे कसाही असो, मात्र आमच्या देशात क्षात्रवृत्तीला अनुकूल नाही, अशी समजूत विद्यमान काळी असलेल्या ब्रिटिश शांततेच्या साम्राज्यात ब-याच लोकांची झाली होती. पण ती ब-याच अंशी चुकीची होती. कारण क्षात्रवृत्ती म्हणजे केवळ राजकारणाचा एक डाव नसून ती एक सनातन (फूट नोट – साप्ताहिक ‘हंटर’ कोल्हापूर संपादक-खंडेराव गोपाळराव बागल, अंक ४६, सन १९३०.) सार्वत्रिक धर्माची आज्ञा आहे, हे पुष्कळ शहाण्यासुरत्या स्वयंमान्य उपदेशकांनाही माहीत नसते. त्यामुळे क्षात्रवृत्तीवर एरव्ही जी आततायी प्रवचने होतात त्यामुळे एकपक्षी सामान्यजनांची दिशाभूल होऊन ते माथेफिरू बनून अत्याचार करू लागतात व दुस-यापक्षी काही मतलबी शांततावादी उपदेशकाच्या उपदेशामुळे वीर्यशाली विशेष कर्तृत्ववान लोकांचीही दिशाभूल होऊन ते उदासीन व निस्तेज असे अनाचारी बनतात. अशा कार्यात सापडल्यामुळे क्षात्रधर्मावर उपदेश करणा-याचीच तारांबळ होते. मग ऐकणाराचे काय होत असेल ते उघडच आहे.
श्री शिवराय हे प्रसिद्ध क्षत्रिय होते. त्यांच्या जन्मदिवशी ह्या कठीण विषयावर प्रवचन करण्याचा अधिकार निदान माझ्यात तर मुळीच नाही. म्हणून चालकांना योग्य वेळी इशारा दिला होता. पण पक्षपातामुळे त्यांनी माझीच योजना केली. तेव्हा आपण सर्वांना दुधाची तहान ताकावर किंबहुना पाण्यावर भागवून घ्यावी लागेल ह्याचा बोल मजवर नाही. प्रवचनशास्त्राचा असा एक नियम आहे की, प्रवचनकाराने आपल्या पदरचे असे काही सांगू नये. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने आणि ख्रिस्ताने वगैरे उपदेश करण्यापूर्वी मागील ऋषींचा हवाला देण्याचा परिपाठ ठेविला होता. मग मजसारख्याता काय पाड ? मी माझ्या प्रवचनाला श्री तुकारामाच्या दिव्य वाणीचा आधार घेऊन त्याच्या बळावर व त्यांना स्मरून काय सांगावयाचे ते सांगीत आहे. अलीकडे श्री शिवराय आणि श्री रामदास ह्या विषयावर वावदुकांनी मोठे रण माजविले आहे. श्री शिवचरित्रात जे जे काही क्षोभकारी राजकारण होते त्याचा, श्री शिवछत्रपतींचा संबंध श्री समर्थाशी भिडवून देण्यासाठी इतिहासाची उलथापालथ चाललेली आहे. त्या वादात मी तूर्त पडत नाही. उलट ज्या भागवत धर्मात प्रत्यक्ष रामदासही फारसे उतरले नाहीत त्या भागवत धर्मावरती ही रामदासी मंडळी उलटून पडून त्यावर भागूबाईपणाचा आळ आणिते, तो ऐकून मला जरी आश्चर्य वाटत नाही तरी माझी करमणूक होते खरी ! श्री तुकाराम भागवतधर्म उर्फ ह्या कल्पित भागूबाईपणाचे मेरूमणी, त्यांच्या शिकवणुकीचाही श्री शिवरायांच्या बालचरित्रावर थोडा परिणाम झालेला आहे. तुकोबांना शिवाजीचा नाद नव्हता, तरी शिवाजीला तुकोबांचाच नव्हे तर त्यांच्या वंशजाचाही नाद सुटला नाही, ते इतिहासप्रसिद्ध आहे. खालील अभंगात तुकोबांनी आपल्या कुणबी भाषेत खरी भगवद्गीता (निदान तिचा कर्मयोग तरी) जितकी आणली आहे तितकी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीत तरी उतरली आहे की नाही हा एक प्रश्नच आहे. क्षात्रधर्म म्हणजे कर्मयोगाची परमावधी आहे. ही तुकारामाची शिकवण त्या वेळच्या मंबाजी गोसाव्याला असेल की चंद्रराव मो-याला असेल, आपल्या कीर्तनावर हल्ला करणा-या मुसलमानाला असेल की आपल्या मागे उभे राहिलेल्या टाळकुट्यांना असेल ? मला वाटते ती कदाचित श्री शिवरायालाच अनुलक्षून असेल.
कथा प्रावरण नव्हे भिक्षेचे ते अन्न ।
करी या परी स्वहित विचारुनी धर्मनीत ।।१।।
देऊळ नव्हे घरा प्रपंच परोपकार ।
विधिसेवन काम नव्हे शब्द रामराम ।।२।।
हत्या क्षात्रधर्म नव्हे निष्काम ते कर्म ।
तुका म्हणे संती करूनि ठेविली आईती ।।३।।
ह्या अभंगातील शिकवण किती खोल आहे, कित्येक लोक देवळाचा उपयोग आपल्या घराप्रमाणे करितात व आपल्या प्रपंचाचा अर्थ लोकांवर उपकार समजतात. त्याचा निषेध त्यात आहे. काही विधीसाठी केलेले सेवन म्हणजे काम नव्हे व ईश्वर म्हणजे केवळ भाषेचा संकेत नव्हे हेही त्यात सांगितले आहे. शेवटी प्रपंचाला कळस जो क्षात्रधर्म तो म्हणजे हत्या नव्हे तर निष्काम कर्म. मग तो मृदु असो अगर कठीण असो, ते न करता करणे हाच क्षात्रधर्म. त्यातील हत्या ही हिंसा नव्हे हेही स्पष्ट सांगितले आहे. हे सर्व गीतेपेक्षाही स्पष्ट आणि थोडक्यात सांगून पुनः तुकोबा आपली याती शूद्र म्हणतात हीच तुकारामाची मेख आहे.
आज भारतीय युद्धाला सुरुवात होऊन पाच दिवस झाले. महात्मा गांधीनी तोंडाने अहिंसेचे स्तोत्र म्हणत म्हणत पुन्हा सहस्त्रावधी प्राण्यांचा संहार झाला तरी आपले धर्मयुद्ध इष्टसिद्धी होईपर्यंत थांबणार नाही, असे कठोर कंकण बांधिले आहे. हिलाच म्हणतात तुकारामाची मेख. श्री शिवरायाला हीच दीक्षा देण्यात आली नव्हती काय ? श्री शिवाजीची कामगिरी जर स्वार्थाची असती तर तो क्षत्रिय नसून खाटिक होता, ती जर निष्काम असली तर त्याने केलेली हिंसा ऐकून तिला विधीविण आणि निष्काम कर्मच म्हटले पाहिजे. ह्या गीताधर्मावर विश्वास ठेवण्यालाही एकाद्या सरकारची भीती किंवा एकाद्या पक्षाची भीड पडत असल्यास मग आम्ही शिवजन्माच्या भानगडीत का पडावे बरे ? बौद्ध आणि जैन धर्मात आत्यंतिक निवृत्ती आणि इस्लाम धर्मात आत्यंतिक प्रवृत्ती आहे असे कित्येक भाषापंडितांचे मत पडते. पण दोहोपक्षी ही समजूत सर्व धर्मांचे पुरेसे अवगाहन केल्यावर, खरी नाही हे कळून चुकते. “प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग निर्मियले चांग रसायन” अशी तुकारामाने दिलेली स्वानुभवाची ग्वाही श्री शिवरायाचे चरित्रातही मुबलक मिळते. म्हणूनच त्याला हिंदू आणि मुसलमान हे दोघे सारखेच दिसत होते. जो आततायी त्याला झोडावे व जो सात्विक आणि शक्तिमान त्याला जोडावे हा कर्मयोग तो जाणत होता. आजकाल मौलाना शौकत अल्लींना महात्मा गांधीनी जे सरळ उत्तर दिले आहे, त्यातही हाच कर्मयोग आहे. पण ज्यांना कर्मयोग सोयीचा दिसत नाही, ते हिंदू असोत किंवा मुसलमान असोत, ते नुसत्या हिंदूसंघटन किंवा तब्लीक ह्या शब्दप्रयोगाचाच मारा सुरू करितात. पण अशा पोकळ मंत्रांनी आततायी पिशाच्च एक पाऊलही मागे हटत नाही, ह्यात नवल काय ?
ज्याला तत्त्वज्ञानात ईश्वर म्हणतात तो म्हणजे आणखी काही नसून अखिल विश्वात नांदणारी एक शक्ती होय. आपल्या अहंकारामध्येही एक संकल्पशक्ती आहे. आपल्या संकल्पशक्तीला ईश्वरी शक्तीच्या प्रवादाचे एक अविरोधी साधन करणे म्हणजेच क्षात्रधर्म ! आपला संकल्प ईश्वरशक्तीला जो विरोध करतो तेच पाप आणि साहाय्य करतो तेच पुण्य. हे साहाय्य करीत असता हिंसा घडत असल्यास तिला हिंसा म्हणता येत नाही. उलट हिंसा होईल ह्या भीतीने हे साहाय्य करावयाचे नाकारले तर मात्र प्रसंगविशेषी उलटपक्षी जी हिंसा घडते तिचे पाप साहाय्य टाळणा-याच्या माथी पडते. हे पाप चुकविण्यासाठी हल्ली महात्मा गांधी सहस्त्रावधी प्राण्यांचा बळी देण्यास सिद्ध झाले आहेत. हीच पुण्यकारक हिंसा श्री शिवरायाने आजन्म केली. शिवरायाला विरोध करणारेच खरी हिंसा करीत होते आणि शिवरायही वरवर दिसणारे करीत होते. पण श्री शिवराय तेवढेच निर्भय क्षत्रिय व त्यांचे विरोधक तेवढे भ्याड, आततायी हेच खरे नव्हे काय ? ह्यावरून हिंसा म्हणजे बाह्यपरिणाम नसून आंतरहेतू हेच खरे ठरते.
परवा मी गुजराथेत संचार करीत असता गांधीजींना साबरमती आश्रमात भेटण्याचा सुयोग आला, तेव्हा त्यांच्याशी माझा एक अलीकडे तात्विक मतभेद होऊ लागलेला आहे, त्याविषयी मी खुलासा करून घेतला. तो असा, अस्पृश्यांचा सत्याग्रह चालू आहे. जुन्या मतवाल्यांनी जर विरोध केला तर अस्पृश्यांनी दारे मोडून व भिंती पाडून आत शिरावे तरच सत्याग्रह पूर्ण होईल, एरव्ही नाही. मात्र असे करताना जुन्या मतवाल्यांनी त्यांचे डोके फोडले तर फोडून घ्यावे, सार्वजनिक शांतीचा भंग झाला तर तिची काडीइतकीही पर्वा करू नये. पण तसेच जुन्या मतवाल्यांविषयी अंतःकरणात लवमात्रही द्वेष बाळगू नये, हा शक्तिवाद होय, अत्याचार नव्हे. माझे हे मत गांधीजींना पटले, इतकेच नव्हे तर ते म्हणाले, “मी तुमच्याही पुढे जाऊन ते सबंध (देऊळच) समूळ उध्वस्त करीन. कारण त्यात मुळी देवच नाही”. मी लगेच म्हणालो, “गांधीजी, तुम्ही असे कधी करणार ?” ते म्हणाले, “ती वेळ अद्यापि आली नाही”. मी म्हटले, “महात्माजी, स्वातंत्र्याचा पुकारा करण्यापूर्वीच तुम्ही हे करावयाला पाहिजे होते. ती संधी दवडल्यामुळे पुढे ही तुमची वेळ कधीच येणार नाही” असो. अत्याचारासंबंधी हा खुलासा झाला. आता अहिंसेचा एक काल्पनिक अडथळा महात्माजी क्षत्रियधर्मात केव्हा केव्हा आणीत असतात. तो हा. माझे तत्त्व असे आहे ते चुकले आहे की खरे आहे परमेश्वर जाणे. क्षात्रधर्म हा एक प्रसंगविशेषाचा अधिकार आहे. तो उठल्यासुटल्यांना चालविता येत नाही. व्यक्तिशः स्वसंरक्षणार्थच केवळ मी स्वतःही आचरावा असे मला वाटत नाही. पण इतरांच्या संरक्षणासाठी मी आचरावा. असा प्रसंगच आला त्यावेळी तो प्रासंगिक अधिकार आणि कर्तव्य मजकडे येईल तर ते टाळणे म्हणजे शुद्ध माझे पापच अशी माझी खात्री आहे. हे आठवूनच म. गांधीजींना म्हटले, “गांधीजी, तुम्ही आपल्या अनत्याचारी मतामुळे हल्ली एक प्रकारचा अडथळा करीत आहात.” ते लगेच सुंदर असे हसत म्हणाले, “माझा अडथळा संरक्षकच आहे.”
ह्या सर्व संवादाचे तात्पर्य हे की, अहिंसा हा जो गांधींचा धर्म होऊन बसला तो क्षत्रियाचे एक धोरण असते. क्षत्रिय आततायी कधीच नसतो. आततायीपणा करणारे हे हिंसाधर्मी अत्याचारी आणि विश्वशक्तीला विरोधक असतात. क्षत्रियही होता होईल तोवर हिंसा टाळतात. पण विश्वशक्तीला साहाय्य करावे की विरोध कारवा हा त्यांच्यापुढे प्रश्न येतो तेव्हा ते झटकून हिंसकाची हिंसा करून परिणामी अहिंसाव्रतच पाळतात. त्यामुळे अहिंसा हे त्यांचे धोरण काही बाह्यचारी अथवा अनाचारी शाब्दिक अहिंसावाद्यांच्या धर्मापेक्षा खरा धर्म ह्या नावाला अधिक शोभणारे असते.
तोंडाने अहिंसामंत्र पाठ करणारे गांधीजीही आजकाल शिवाजीच्या क्षात्रधर्माच्या दिशेने निघाले आहेत. व्यवहारधर्म, मोक्ष असा भेद धर्मात केव्हा केव्हा कोणी करितात. पण हा भेद परमार्थाने खरा नाही, मी त्याच्या नित्याच्या व्यवहारापुरता हा भेद खरा मानून चाललो असता, अहिंसावाद हा जरी धर्म नसला तरी तेच धोरण नेहमी राखण्याची खबरदारी इतराने तर काय पण अस्सल अधिकारी क्षत्रियानेही राखणे भाग आहे. म्हणूनच क्षमा हा गुण शूर क्षत्रियांमध्ये सर्वांत मोठा गणलेला आहे. इतकेच नव्हे तर बौद्धधर्माचे सार सर्व स्वजोब्रह्मविहार म्हणजे करुणा, मुदिता, मैत्री आणि उत्पेक्षा ह्या चारी दैवी वृत्तीत अहिंसाच उत्कृष्ट विराजमान पावत आहे. ह्या क्षमेचा आणि जितेंद्रियांचा काटेरी मुकूट शिरी धारण केल्याशिवाय क्षात्रधर्माची दीक्षा घेण्याला कोणीही मुळीच पात्र होत नाही. श्री शिवाजी हा एक दीक्षित क्षत्रिय कुलावंतस् होता नव्हे काय ?
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ते आणि इत्यादी जे अनेक इतर वर्ण अथवा वृत्ती आहेत त्या जन्मावर अवलंबून नाहीत. वर निर्दिष्ट केलेल्या दीक्षेवर मुख्यतः अवलंबून आहेत. प्रसंगविशेषी पांडवांनी क्षत्रियवृत्ती टाकून किंवा झाकून शूद्र वृत्तीची दीक्षा ते अज्ञातवासात असताना घेतली. कोणावर कसा प्रसंग येईल त्यावेळी कोणती दीक्षा घ्यावी ही गोष्ट एकाने दुस-यास सांगण्याची व ऐकण्याची नाही. ही घडामोड मुळी बाहेरची नसून, अंतरीची आहे. छायाचित्राची मुख्य क्रिया सूर्याच्या प्रकाशात न घडता कॅमे-याच्या गाढ अंधारात घडते. त्याचप्रमाणे क्षात्र किंवा इतर धर्माची, दीक्षाविधीची मुख्य क्रिया म्हणजे दैवी स्फूर्तीची प्रेरणा एकाएकी ह्या बाह्य बहुमतवादी महासभेत घडत नसून, मानवी गुहेत उर्फ अंतःकरणाच्या खोल भागातच होते. त्या दृष्टीने पाहताच दिसण्यात हलका दिसणा-या शूद्र उर्फ शुश्रुषाधर्माची दीक्षा देखील ह्यावरील दैवी प्रेरणेवरच अवलंबून आहे. असो. तूर्त क्षात्रधर्माचे प्रवचन चालले आहे म्हणून त्याचाच विचार करू. क्षत्रियांनाही केव्हा केव्हा आपल्या धर्माचा विषाद वाटून ते आपल्या दिशा टाकून देण्याइतके भ्याड बनतात. हा विषादाचा प्रसंग अर्जुनाप्रमाणे शिवरायाच्या चरित्रातही एकदोनदा घडला असे बखरीत म्हटले आहे. श्री शैलपर्वतावरील देखावा पाहून शिवराय कर्मसंन्यास करू पाहत होते. पण त्यांचे अवतारकृत्य अद्यापि न आटपल्याने त्या धर्मच्युतीतून त्यांचा बचाव झाला. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, अस्सल क्षत्रियांची जर प्रसंगविशेषी दिशाभूल होते तर इतरांनाही दीक्षा केवळ, एकादे शाळेतील व्याख्यान ऐकून मिळेल असे समजणे व्यर्थ आहे. आणि असल्या व्याख्यानामुळे आततायींना आळाही बसत नसतो.
क्षत्रिय ह्या शब्दाचे निरुक्तही शोधून पाहण्यासारखे आहे. ह्या नावात मुळात लढवय्या असा अर्थ नसावा असे मला वाटते. “क्षतात् त्रायात इति क्षत्रिय” हा मागाहून सुचलेला विचार दिसतो. निरुक्ताच्या दृष्टीने ही उत्पत्ती ह्या शब्दांची बरोबर नाही. क्षेत्र म्हणजे नुसता जमीनदार किंवा शेतकरी एवढाच असावा. शेतावर जेव्हा चालून आलेल्या आततायी लुटारूंना हटविणा-यांना म्हणजे रक्षण करणा-यांना हे नाव पडलेले दिसते. ह्या निरुक्तांचा मुद्दा येथे काढण्याचे कारण हेच की, क्षात्रधर्म हा सनातन धर्म नसून प्रासंगिक धर्म आहे. जेथे अर्थच नाही अशा अन्य स्थिती अर्थाचे रक्षण करण्याचा क्षात्रधर्म तरी कसा उरणार ? पण जे राष्ट्र प्रसंग पडेल तेव्हा क्षात्रधर्म टाकून नुसते स्वतःचेच रक्षण करण्यालाही तयार नाही. त्या राष्ट्रावर दुस-याने येऊन परत बसावे, हे योग्य नसले तरी साहजिकच आहे. अशा नादान राष्ट्राने उलट अहिंसेचे पुराण सांगावे व ऐकावे हे तर कोडगेपणाचे आहे. असो. श्री शिवराय गेले. त्यांचे पोवाडे तेवढे उरले. तीनशे वर्षांचे आम्ही आज गांधीजींचे उपदेश ऐकत आहो. अहिंसा हा त्यांचा धर्म असो किंवा धोरण असो ते देखील मरणाला भीत नाहीत. मग ते स्वतःचे असो, किंबहुना दुस-याचे असो, मरणाला टाकणे काही अहिंसा नव्हे. गांधीजींनी एकदा आपल्या आश्रमात आपल्या लाडक्या गाईचे लाडके वासरू मारलेच ना ? आता तर ऐकतो की, देवी टोचून घ्यावयाचे नाही ह्या आग्रहामुळे त्यांच्या आश्रमात तीन मुले, देवीने मेली तरी देवी टोचण्याची परवानगी, निदान सल्लाही त्यांनी दिला नाही. एका निरुपद्रवी प्राण्याला त्रास देऊन दुस-या प्राण्याला आजाराच्या संभवातून वाचविणे हा एक उपद्व्याप आहे असे ते मानीत असावेत. तथापि आपल्या कटू उपदेशाच्या बळावर तेच गांधी आज सहस्त्रावधी निरुपद्रवी सत्याग्रहींना इतर कोट्यावधी निरुपद्रवी, बेपर्वा, परावलंबी, आळशी किंबहुना दुराचारी हिंदवासियांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून बळी देण्यास सिद्ध झाले आहेत ना ? ह्यातच अखेर क्षत्रिय धर्माचा जयजयकार आहे. श्रोते हो, तुम्हीही हा नुसत्या शब्दानेच जयजयकार करणार की तो क्षात्रधर्म स्वतः आचरून श्री शिवरायाचे व गांधींचे अनुकरण करणार हे तुमचे तुम्ही ठरवा. उपदेशाचा अधिकार माझा नाही. मी एवढेच सांगतो की, जोवर जुलूम आहे तोवर तरवारीची जरुरी आहे. नांगराचा फाळा आणि तरवारीचे पाते ही दोन्ही माझ्या मताने केवळ शेतकीचीच औते होत. आजकाल दोन्हींचीही जरुरी आहे.
चार्लस मँकेकृत एक इंग्रजी लावणी मी एका शाळेच्या क्रमिक पुस्तकात वाचली. तिच्यात ट्यूबलकेन नावाच्या एका हबशाचा (लोहाराचा) पश्चात्ताप कवीने वर्णिला आहे. ह्या घडशाने, प्रथम पाणीदार वर्च्या व तरवारी केल्या. तेव्हा क्षत्रियाने त्याचा मोठा गौरव केला. पुढे त्याच तरवारीचा व भाल्याचा उपयोग आततायी शठांनी चालविला. तेव्हा त्या घडशाला मोठा पश्चात्ताप झाला. म्हणून त्याने नांगराचे सुंदर फाळ तयार केले. पण अखेरच्या चरणात कवी म्हणतो—
But while oppression lifts his head or a tyrant would be lord. Through we may them him (cain). For will not forget the sword ‘I’ ” (Plough).
भावी शिक्षकांनो पहा, तुम्ही येथून पुढे तुमच्या अध्ययन-अध्यापन कार्यात तरवारीला विसरून चालावयाचे नाही. तुम्ही विसरल्यामुळे आमच्या हातातल्या तरवारी गेल्याच, फाळही चालले, केरसुण्या मात्र कायमच्या उरतील.