गुन्हेगार जातीची सुधारणा
ता. २५ रोजी रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे गुन्हेगार जातीची सुधारणा ह्या विषयावर व्याख्यान हैद्राबादचे ना. केशवराव ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्याचा सारांश असा : “मुंबई इलाख्यात भिल्ल, गुजराथी, कोळी, भियाने, महादेव कोळी, वंजारी, कातकरी मांघर, लमाण, हरणशिकारी, छपरबंद, कैकाडी, रामोशी, मांग त्याचप्रमाणे स्त्री जातींपैकी मुरळ्या, भाविणी, जोगतिणी, कुंटिणी, कसबिणी, कोल्हाटणी व व्यक्तिशः गुन्हेगार लोक” ह्याप्रमाणे एकंदर जवळजवळ ३० लाख लोक गुन्हेगार जातीचे आहेत. ह्या जातींपैकी काही जाती स्थायिक आहेत व काही फिरत्या आहेत. पाश्चात्य सुधारणेमुळे आपल्या देशातील ह्या जाती नष्ट झालेल्या नाहीतच. पण लंडन शहरातील गावगुंडांप्रमाणे मुंबई, पुणे वगैरे शहरांतून गुंड व भामटे ह्यांची संख्या वाढत चालली आहे. व्यक्तिशः गुन्हे करणारे कोठेही आढळतील. पण पिढ्यानपिढ्या गुन्ह्याचा धंदा चालविणारे लोक आपल्या देशात आहेत ही गोष्ट मात्र अत्यंत शोचनीय आहे, ह्यात शंका नाही. गुन्हेगार लोकांची सुधारणा करण्यासंबंधाने पाश्चात्यांनी बराच विचार केला असेल. “Criminology” नावाचे एक शास्त्रच तेथे निर्माण झाले आहे. ह्या लोकांना सुधारावयाचे म्हणजे पोलीस व न्यायखाते हा पहिला उपाय आहे. ही गोष्ट वरील शास्त्रज्ञांना मान्य नाही. प्रलोभनामुळे, क्षुधेमुळे किंवा शिक्षणाभावामुळे हे लोक गुन्हा करतात, तेव्हा ह्यांच्या मनातील दुर्विकार नाहीसे होतील, त्यांना पोटभर खायला मिळेल, त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण मिळून ते उद्योगधंद्याला लागतील अशी तजवीज केल्यास गुन्हे आपोआपच कमी होतील, असे ह्या शास्त्रज्ञांचे मत असून ते सर्वस्वी योग्य आहे. गुन्ह्याबद्दल शिक्षा झाल्याने गुन्हेगार मनुष्य जास्तच चिडून जाऊन बेफाम होतो व उलट जास्तच गुन्हे करू लागतो. शिवाय ह्या उपायात सूड घेण्याची बुद्धी असल्यामुळे ह्या उपायांचा केव्हा केव्हा थोडासा उपयोग होत असला तरी तो (फुट नोट – म. शिंदे ह्यांनी वसंत व्याख्यानमालेत दि. २५ मे १९१६ रोजी दिलेल्या भाषणाचा वृत्तांत, ‘केसरी’ वरून.) आसुरीच उपाय आहे, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही. ह्या जातींना शिक्षण देणे व त्यांस उद्योगधंदे लावून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हा दुसरा उपाय आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. तिसरा अत्युत्कृष्ट दैवी उपाय म्हणजे गुन्हेगार जाती—ह्या समाजातील लहान भावंडे—कारण लहान पोरे स्वभावतःच खोडकर असतात—असे समजून त्यांना ममताळूपणाने वागविणे, दयार्द्र दृष्टीने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल असे आपले वर्तन ठेवणे, जीविताची उच्च ध्येये समजून देऊन त्यांना असल्या दुष्कृत्यापासून परावृत्त करणे हा होय. इतर उपायांपेक्षा हाच उपाय अत्यंत यशस्वी होईल. परधर्मी मिशनरी व सॉल्व्हेशन आर्मीचे लोक ह्या कामी निरलस उद्योग करीत आहेत. पण ह्या प्रयत्नांत धर्मांतरांचे अनिष्ट तत्त्व असल्यामुळे व परक्यांनी आमच्याकरिता प्रयत्न करणे हे स्वाभिमानास लाजिरवाणे असल्यामुळे आपल्या लोकांच्या उद्धाराकरिता आपणच कंबरा बांधल्या पाहिजेत. ख्रिस्ती मिशन-यांप्रमाणे आपणही एक भागवत धर्माचे मिशन काढून ह्या लोकांची सुधारणा करण्यासाठी झटले पाहिजे. ह्या कामाकडे सरकारने मि. स्ट्राट ह्यांची नेमणूक केली असून त्यांनी विजापूर जिल्ह्यातील पिढीजात गुन्हेगारांना त्यांच्या धंद्यापासून परावृत्त केले आहे. तथापि ह्यांच्याकडून आज सहा वर्षांत जितके काम व्हावयास पाहिजे, तितके झालेले दिसत नाही. ह्यास्तव हिंदी निराश्रित साहाय्यकारी मंडळीने हे काम हातात घेऊन सातारा जिल्ह्यातील मांग लोकांची एक स्वतंत्र वसाहत करण्याचा प्रयत्न केला व त्याकरिता सरकारकडे एक हजार एकर जमिनीची मागणी केली, पण लढाईमुळे हे काम तसेच अर्धवट पडले आहे. हे कार्य शेवटास नेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
ह्याप्रमाणे व्याख्यात्यांचे कळकळीचे भाषण झाल्यानंतर रा. करंदीकर म्हणाले की, “गुन्हेगार जातीची गणना करताना तीत अनीतिमान स्त्रियांचा समावेश करण्यात आला तो योग्य नाही. त्याचप्रमाणे सावकार लोकांवर जो व्याख्यात्यांचा फार कटाक्ष आहे तो निष्कारण आहे. सध्या एक पतपेढ्या निघाल्या, पण ह्यापूर्वी दुष्काळाच्या वेळी सावकार लोकांनीच आपल्या गावातील कित्येक शेतक-यांना दाणावैरणीची मदत करून जगविले आहे.”