थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्व
गेल्या तारीख ३० जून रोजी सायंकाळी पुणे येथील मराठा स्टूडंटस् ब्रदरहूडपुढे रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए. ह्यांचे “मराठ्यांच्या इतिहासात श्रीशाहू छत्रपतींच्या कारकीर्दीचे महत्त्व” ह्या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्याते प्रथम आपल्या व्याख्यानाचा उद्देश सांगताना म्हणाले “मराठ्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या इतिहासाची अद्याप जाणीव मुळीच झालेली नाही. हया भ्रातृमंडळातील कॉलेजमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांचे लक्ष इकडे अवश्य जावे. कॉलेजमध्ये अगोदर इतिहास विषय नीट शिकविला जात नाही. तशात हिंदुस्थानचा इतिहास शिकवीत असता मोगल कारकीर्द संपताच इंग्रज कारकीर्द सुरू होते. जणू मराठे म्हणून कोणी झालेच नाहीत. कर्नल मेडोज टेलर ह्यांचा इतिहास कॉलेजमध्ये लावलेला असतो, त्यात श्रीशिवाजीचे नाव शोधून काढण्यास इंडेक्स शोधावे लागते. बहुतेक विद्यार्थ्यांनी ग्रँट डफचे मराठ्यांच्या इतिहासाचे पुस्तक नुसते पाहिलेही नसते. असे म्हणून रा. शिंदे ह्यांनी ग्रँट डफच्या इतिहासाची दोन पुस्तके व दुसरे काही महत्त्वाचे इतिहासावरील ग्रंथ आपल्या पुढे बसलेल्या विद्यार्थ्यांना दाखवून मराठा इतिहास वाङ्मयाचा थोडक्यात इतिहास सांगितला. नंतर शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे महत्त्व महाराजांच्याच शब्दांत सांगण्यासाठी त्यांनी पुढील गोष्ट सांगितली. शाहू महाराज अगदी वृद्ध झाले असता एकदा माळव्याचे राजे जयसिंग ह्यांनी शाहू महाराजांना हिंदू धर्मासाठी काय केले व काय काय दानधर्म केला असे पत्राने विचारिले. ह्यावर महाराजांनी उत्तर लिहिले की, “रामेश्वरापासून दिल्लीपर्यंत आम्ही मुसलमानांच्या हातून सर्व देश जिंकला आणि तो ब्राह्मणांचे स्वाधीन केला”. महाराजांच्या ह्या मार्मिक वाक्यात त्यांच्या कारकीर्दीचे सर्व महत्त्व वर्णिलेले आहे. श्रीशिवाजींनी हिंदुपदपादशाहीचा पाया घातला. त्यांच्या मागोमाग औरंगजेबाची स्वारी दक्षिणेवर झाली. तेव्हा राजाराम महाराजांनी मोठ्या प्रयासाने वेळ मारून नेली. पुढे (फुट नोट- बडोदे, जागृती, शनिवार ता. २७ माहे जुलै सन १९१८ मधील लेख.) शाहू महाराज अटकेतून सुटका होऊन ते दक्षिणेत आल्यावर त्यांनी आपल्या आजोबांनी मिळविलेले राज्य परत काबीज केले, इतकेच नव्हे तर भरतखंडाच्या बहुतेक भागावर मराठ्यांची सत्ता आणि जरब कशी बसविली, हे इतिहासात वाचणे अत्यंत स्फूर्तिदायक आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वाक्याचा दुसरा भाग म्हणजे त्यांना आपले राज्य ब्राह्मणांच्या स्वाधीन का करावे लागले ही गोष्टसुद्धा मराठ्यांनी अत्यंत सूक्ष्म रीतीने विचार करण्यासारखी आहे. हिंदुपदपादशाहीचा खुंटा श्रीशाहूराजांनी पुष्कळ हलवून तो खोल नेला. परंतु इतर बाबतीत हलविल्याने खुंटा बळकट झाला तरी, ह्या बाबतीत मराठी राज्याचा खोल गेलेला खुंटा ढिला कसा झाला ह्याची कारणे शाहू महाराजांच्या कारकीर्दीतच मार्मिक इतिहास वाचकांस भरपूर दिसून येण्यासारखी आहेत.
महाराज इ. स. १७०७ त दक्षिणेस आले. १७१४ पर्यंतचा काळ त्यांचाच पाय महाराष्ट्रामध्ये बळकट होण्यास लागला आणि ह्या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ ह्यांची मदत घेणे जरूर वाटले. आंग्र्यांकडून पराभव पावून भैरोपंत पिंगळे हा पेशवेहदाला नालायक होऊन देशस्थ पिंगळ्यांचे ठिकाणी, कोकणस्थ बाळाजी विश्वनाथाची स्थापना झाली. इतकेच नव्हे तर धनाजी जाधवाचा मुलगा चंद्रसेन जाधव ह्याच्याशी बाळाजी विश्वनाथाचे जे भांडण झाले, त्यात शाहूंनी बाळाजीचीच पाठ थोपटली आणि चंद्रसेन जाधव रुसून मोगलांस जाऊन मिळाला. तेव्हापासून सेनापतीपदावरही पेशव्यांचा शह बसू लागला. शिवाजी महाराजांनी जी अष्टप्रधानांची योजना केली होती, त्यात पंतप्रतिनिधीचे पद नव्हते. ते राजारामाला निर्माण करावे लागले. त्याचे कारण औरंगजेबाच्या दहशतीमुळे राजारामास दक्षिणेस दूर जिंजीस राहावे लागल्यामुळे त्यांना आपला प्रतिनिधी म्हणजे व्हाइसरॉय साता-यास ठेवावा लागला. हे प्रतिनिधीचे पद शाहू महाराजांच्या कारकीर्दीतही देशस्थ ब्राह्मणाकडेच चालू होते. वास्तविक पाहता शाहू महाराज स्वतः साता-यास राहू लागल्यामुळे ह्या पदाची जरुरीच नव्हती. पण महाराज पडले वैभवी आणि विलासी म्हणून त्यांना पेशवे आणि प्रतिनिधी म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि व्हाईसरॉय ह्या दोघांनाही आपल्या उजवी डावीकडे बसवून घेण्याची संवय लागली.
पण ह्या दोनही अधिका-यांचे एकमेकांशी कधीच जुळत नसे. बाळाजी विश्वनाथानंतर त्याचा मुलगा बाजीराव हा बापाहूनही प्रतापी निघाला. बापाची मुत्सद्देगिरी संभाळून त्याने तलवारही गाजविली. परंतु त्याला नेहमी प्रतिनिधीशी कटकट करावी लागत असे. त्याचे तोंड नेहमी उत्तरेकडे तर प्रतिनिधीचे दक्षिणेकडे. बाजीरावाने म्हणावे की माळवा जिंकून अटकेवर निशाण लावावे, तर प्रतिनिधीने म्हणावे कर्नाटक जिंकावे. श्रीशाहूंनी दोघांनाही हाताशी धरून दोन्ही दिशा जिंकल्या. परंतु खुंटा ढिला झाला तो झालाच. मराठी राज्य स्थापनेच्या समयी मराठ्यांचा देशाभिमान आणि तसाच त्यांचा स्वार्थ ह्या दोन्ही भिन्न गुणांचा हृदयभेदी देखावा दिसून येतो. हे राष्ट्रकार्य करीत असता ब्राह्मण आणि मराठे हे दोघेही कामास आले. त्यावेळी ते जसे खांद्यास खांदा लावून लढले तसेच त्यांनी एकमेकांच्या गळ्यावरही प्रहार केले. इतकेच नव्हे तर मराठ्यांनी मराठ्यांच्या आणि खुद्द आपल्या भावाच्या आणि ब्राह्मणांनी ब्राह्मणांच्या गळ्यावर शस्त्र पुष्कळ वेळां उचललेले दिसते. पेशवाईचे पदच नव्हे तर सातारच्या राजाला बाहुले बनवून सर्व सत्ता आपल्या घराण्यात आली, पण ती बाळाजी बाजीरावाच्या एकट्याच्याच हाती जाते हे सहन न होऊन त्याचा भाऊ सदाशिवराव हा रुसून कोल्हापूरकरांच्या गळ्यास मिठी मारू पहातो. आणि त्याचे समाधान करण्यासाठी महादजीपंत पुरंदरे, ज्याच्या देशस्थ ब्राह्मण घराण्याने बाळाजी विश्वनाथाच्या घराण्यावर अनंत उपकार केले होते, तो आपल्याकडचा अधिकार स्वखुषीने सोडून देतो, आणि सदाशिवराव भाऊ कोल्हापूरकरांचे पेशवाई पद सोडून परत येतो. असल्या घरभेदी भाऊबंदकीचा सुकाळ प्रत्यक्ष राजाराम महाराजांच्या कारकीर्दीतही होता, तो श्रीशाहूंच्या वैभवशाली कारकीर्दीने अधिकच बोकाळला. भाऊबंदकी आणि जातिभेद ह्यांचे विष मराठी राज्याच्या अंगी जन्मापासून मुरल्यामुळे ते चिरस्थायी होण्यासारखे नव्हते.