प्रार्थनासमाजाचा एक नमुना
“ऐसी कळवळ्याची जाति । करी लाभावीण प्रीती ।।”
श्री. बी. बी. केसकर ह्यांनी माझे मित्र श्री. द्वारकानाथ गोविंद उर्फ भाऊसाहेब वैद्य ह्यांचे काही लेख आणि अल्पसे चरित्र ह्या ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या आग्रहावरून मी दोन स्वतःचे परिचयात्मक शब्द लिहिण्याचे धाडस करीत आहे. धाडस म्हणण्याचे पहिले कारण हे की, मी जरी प्रथम पुण्याच्या प्रार्थनासमाजाचा सभासद १८९८ चे सुमारास झालो, तरी मुंबई समाजाचा प्रचारक ह्या नात्याने सन १९०३ साली मी प्रत्यक्ष काम करू लागल्यावर भाऊसाहेबांचा व माझा निकट संबंध जडला, आणि तसा जवळचा संबंध १० वर्षेच टिकला. त्यापुढे कार्यानिमित्त मला पुण्यासच राहावे लागले. मित्रत्व राहिले तरी सान्निध्य राहिले नाही. दुसरे कारण हे की, मी हा जो अल्प लेख लिहीत आहे, तो केवळ मित्रपणाच्या पक्षपाताने किंवा औपचारिक प्रशंसेने नव्हे. भाऊसाहेबांच्या कामगिरीचे व स्वभावाचे जे ठसे माझ्या अंतःकरणावर उमटले आहेत, त्यांचे हे अस्पष्ट चित्र आहे. ह्यात केवळ माझ्या प्रामाणिकपणाची साक्ष आहे. मूळ प्रकृतीशी ही प्रतिकृती खरोखर किती जुळते ह्याची मला खात्री नाही. अशी निर्भीड चित्रकृती त्या माणसाच्या मागाहून झालेलीच बरी. पण स्वतः भाऊंनीच परिस्थितिवशात् असे धाडस किती वेळां तरी आपल्या वाङ्मयसेवेत केले आहे ! ते आठवून माझे काही ‘चुकले वाकले’ त्यांनी सांभाळावे.
मुंबई समाजाच्या व्यासपीठावरून सर नारायण चंदावरकरांनी Greatness of small men (लहान माणसांचा मोठेपणा) ह्या विषयावर एकदा एक मार्मिक प्रवचन केले. गुरुवर्य भांडारकर आपल्या विद्वत्तेच्या जोरावर आम्हांस आपलेकडे ओढीत, तर सर नारायण चंदावरकर आपल्या कोमल सहानुभूतीने आम्हांस आपलेसेच करीत. वरील प्रवचन होऊन बरीच वर्षे झाली. पण तेव्हापासून अगदी आतापर्यंत आमच्या भाऊंचे चित्र मजपुढे उभे आहे. असे (श्री. द्वा. गो. वैद्य ह्यांच्या ‘संसार व धर्मसाधन’ ह्या ग्रंथास लिहिलेली प्रस्तावना. १८ मार्च १९३५.) म्हणण्यात मी भाऊंना लहान म्हणालो म्हणून, त्यांचे कोणी विनोदहीन चहाते मजवर रागावतील, रागावोत ! मला बाहेर पहावयाचे नाही, अंतःकरणतील ठशांकडे पाहून लिहावयाचे आहे. भाऊंनी आपले महत्त्व लहानपणाचे कोंदणात बसविले आहे. ह्यावरून ते जीवितकालाभिज्ञ दिसतात. सर नारायण चंदावरकरांनी मजजवळ वारंवार जे उद्गार काढीले, त्यावरून न जाणो, त्यांनाही हाच अनुभव आला असावा. समाजाचे वाङ्मय निर्माण करण्याच्या कामी भाऊ एकटेच एक दिसतात. त्यांचे हे वाङ्मय अगदी असामान्य कोटीतले आहे, असे मी सुचवीत नाही, तरीपण ते निर्माण करण्याचे कामी त्यांनी जी निष्ठा, चिकाटी, निःस्वार्थता निरहंकारता दाखविली आहे, ती खास असामान्य कोटीतली आहे. असामान्यता कृतीतच अडकून असते की काय ? नाही. ती पद्धतीतही पसरलेली असते. असामान्य कृती करणारी आमच्या समाजात भाऊहून श्रेष्ठ किती तरी माणसे झाली. रामभाऊ माडगावकरांची ‘ज्ञानदेवी’. शंकर पांडुरंग पंडितांचे ‘वेदार्थयत्न’, आणि ‘तुकारामाची गाथा’, शिवाय न्या. रानडे व डॉ. भांडारकर ह्यांच्या अनेक कृती जगापुढे आहेतच. ह्या मोठ्यांनी प्रार्थनासमाजाच्या खास मराठी भांडारात काय भर टाकली ? जी काय भर पडली, त्यात नुसत्या भाग ह्या मोठ्या लोकांचा आणि परिश्रमाचा बोजा भाऊसारख्यावरच पडला ना ! ज्यांनी सुधारकांना विरोधच करावयाचा विडा उचलला होता, ते तर कित्येक वेळां आपसांत कुजबुजत की, ह्या जाड्या पंडितांना मराठीत लिहिताच येत नव्हते ! पण भाऊंनी आपल्या वाङ्मययज्ञात केवळ प्रार्थनासमाजासच नव्हे तर मराठी भाषेलाही वाखाणण्यालायक किती तरी आहुत्या दिल्या आहेत, हे आज नाही उद्या तरी कबूल केले जाईलच. ही भाऊंची कामगिरी प्रार्थनासमाजाचा एक नमुना नसून उलट प्रार्थनासमाजाच्या सर्व लोकांनाच एक नमुना घालून देण्यासारखी झाली आहे, नव्हे ?
सुबोध पत्रिका (मराठी बाजू) म्हणजे भाऊंनी आपल्यापुरते एक निराळे व्यासपीठच उभारले आहे. गेल्या जवळ जवळ चाळीस वर्षांत ते ह्या पीठावरून क्वचितच खाली उतरले. हा देवाघरचा एक मक्ताच म्हणावयाचा ! फक्त तीन पानांची पत्रिका ती काय ! पण ती आयुष्याची किती बळकट हो ! भाऊंनी आपले जीवनच तिचेवर ओतून, तिला आयुरारोग्य दिले. अलीकडे तर मोठयामोठ्या आढ्यतेच्या पत्रांतून ह्या पत्रिकेच्या मताचे उतारे येत असतात. ह्यावरून, ही एक केवळ वृद्धाच नसून हिचे वैशिष्ट्य लहान-थोरांस जाणवत आहे, असे होते. पत्रिका म्हणजे वैद्य आणि वैद्य म्हणजे पत्रिका, अशी एक म्हण प्रार्थनासमाजात पडली आहे. पण, खरा प्रकार एवढाच नाही. भाऊंचे खरे सौंदर्य त्यांच्या लेखणीतच कोंदलेले नसून, त्यांच्या जीवनातही ते भरले आहे.
अनुष्ठान ह्या पारिभाषिक शब्दाचा अर्थ ब्राह्मसमाजाने घालून दिलेल्या नियमानुसार आपल्या कुटुंबाचे सर्व गृह्यविधी व संस्कार करणे असा एक आहे. ह्या संकुचित अर्थाने पाहता समाजाचे पुढा-यांवर विशेषतः प्रार्थनासमाजाचे धुरीणांवरही अनेक वेळां पत्रिकेतूनच आक्षेप प्रसिद्ध झाले आहेत. अर्थात ते सर्व भाऊंनीच घेतले असे म्हणणे नाही. भाऊंमध्ये तितका निर्भीडपणा नाही. पण कोणाही निर्भीड सभासदाला मी विचारतो की, प्रत्यक्ष भाऊवरच हा आक्षेप घेता येईल काय ? भाऊंनी समाजातील आपल्या दत्तक गुरुजनांजवळ जो भिडस्तपणा व नमतेपणा दाखविला तो आपल्या घराण्यातील प्रत्यक्ष वाडवडिलांजवळ स्वीकृत मताप्रमाणे वागण्याची वेळ आली तेव्हा, दाखविला काय ? अनुष्ठान म्हणजे अनुष्ठानच. ते घरी काय, बाहेर काय, स्वकीयांशी, तसेच स्वीकृतांशी त्याच्या कडकपणाचा ओघ सारखाच वाहिला पाहिजे. भाऊंनी आपल्या स्वतःच्या आणि आश्रितांच्या बाबतीत जो अनुष्ठानिक करारीपणा व कडकपणा धरिला, तो इतरांशी विशेषतः पुढा-याशी धरिला नाही, असे म्हणतात ते खरे. सदाशिवराव केळकरांचे हे दुधारी अनुष्ठान आमच्या भाऊंना पेलता आले नाही, तरी स्वतःपुरता तरी कधी ढिलेपणा त्यांनी दाखविला नाही, ही गोष्ट कोणास दृष्टीआड करता येईलसे वाटत नाही.
अनुष्ठानाचा हा आकुंचित अर्थ सोडून सर्वसाधारण प्रशस्त अर्थाने पाहिल्यासही भाऊंचे अनुष्ठान फार उच्च दर्जाचे दिसून येते. पुष्कळांनी मूर्तिपूजा सोडली असेल, कित्येकांनी मिश्रविवाह केले असतील, काही थोड्यांनी गुरु आणि ग्रंथांचे वगैरे प्रामाण्य झुगारून देवाकडे आपला सरळ प्रवेश करून घेतलाही असेल. ही सर्व व्यक्तिविषयक संपादणी झाली, पण प्रार्थनासमाजाचाही एक समष्टिसंसार आहेच ना ! नित्य आणि नैमित्तिक उपासना, कार्यवाहक समितीची कामे, आल्यागेल्याचा समाचार, समाजांनी चालविलेली परोपकाराची कामे, कोणी प्रचारक नेमल्यास त्याच्या खासगी गरजांची विचारपूस, ह्या आणि अशा प्रकारच्या डोळ्यात न भरणा-या आणि वार्षिक रिपोर्टात न येणा-या गोष्टींचा समावेश ख-या अनुष्ठानात झाला पाहिजे. होवो न होवो ! भाऊंचा ह्या ख-या आणि भरीव अनुष्ठानात नंबर पहिला ठरलेला. ह्या बाबतीत भाऊ हा प्रार्थनासमाजाचा एक नमुना नसून, उलट भाऊंनीच समाजाला एक नमुना घालून दिला आहे, असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.
दुर्दैवाने भाऊंना विवाहसुख व तज्जन्य कौटुंबिक जबाबदारी आणि समाधान मिळावे तितके मिळाले नाही. तरी, त्यांनी आपला कौटुंबिक आश्रितांचा जो व्याप बळेच वाढविला आहे, त्याची जबाबदारी अनुष्ठानपूर्वक त्यांनी आतापर्यंत तरी राखली आहे, अशी माझी माहिती मला साक्ष देत आहे. ह्या आकुंचित अनुष्ठानाचीही उदाहरणे प्रार्थनासमाजात विपुल नाहीत, तर मग त्यांनी संपादिलेल्या वर निर्दिष्ट केलेल्या उच्चतर अनुष्ठानाचा मासला आमच्या इकडील समाजात तरी अगदी विरळा, अशी कबुली देण्यास आम्हांस का जड जावे बरे !
भाऊ सहज बोलताना व वागताना, हे एक विनयशाली पुरुष असतील, असे वरवर पाहणा-या हृदयविहीन माणसाला वाटत नाही. वाळूतल्या प्रवाहाप्रमाणे किंवा मर्दाच्या अश्रूप्रमाणे भाऊंची विनयगंगा पडदानशीन आहे. त्यांनी केलेली आणि करविलेली किती तरी दाने त्यांच्या उजव्या हाताची डाव्या हातास माहीत नाहीत ! त्यांच्या लेखांना जसा त्यांच्या सहीचा विटाळ घडत नाही, तसाच त्यांच्या विनयाला त्यांच्या जाणिवेचा घडत नाही. जसा त्यांचा विनय, तशाच त्यांच्या मनोभावना. जणू काय, खडकाखालील पाणीच ! भाऊंचे बाह्यवर्तन म्हणजे केवळ शिस्त आणि नियमितपणाचे एक अवजड यंत्र ! त्यात कोमलपणा किंवा ओलसरपणा दिसत नाही. हे मानवी गुण त्यांच्या शिस्तीचा खडक फोडूनच आत डोकावावे, तेव्हा दिसणार ! ह्या गर्दीचे दिवसांत इतका उपद्व्याप कोण करावयाला तटला आहे ! तरी, प्रसंगी भाऊंच्या भावनेचे उमाळे वर कसे फुटून येत असतात, हे कोणी भाऊंच्या जिव्हाळ्याचा स्नेहीच सांगावयास पुढे येईल, तेव्हा कळेल !
भाऊंना संततीचे बळ अथवा सुख नाही, संपत्तीचेही नाही. घालून नटावयाला एकाद्या जाड्या विद्यालयाचा फाटका झगाही नाही. राजमान्य पदवीचे शेपूट किंवा लोकमान्य नावाचे आयाळही नाही. किती भाग्य ! ह्यांपैकी एकही जर उपाधी असती तर भाऊंचाच नव्हे, तर बिचा-या मुंबईच्या प्रार्थनासमाजाचाही तोटाच झाला असता ! आणि जर का ह्या संपत्ती उर्फ आपत्तीचा एकत्र घाला भाऊंवर पडला असता तर काय झाले असते ? व्हावयाचे काय ? नामदार भाऊसाहेब वैद्य फार तर आमचे अध्यक्ष झाले असते ! पण नमुनेदार सभासद झाले असतेच कशावरून ? त्यांच्याकडून आईसारखी पडद्याआड सेवा झाली असती कशावरून ? अलीकडे मुंबई प्रार्थनासमाजाची बहुतेक उठाठेव भाऊंकडे येऊन साचत आहे व त्यांचे एक दोन साथीदार आहेत, असे ऐकतो. पण भाऊसाहेब अध्यक्ष झाले असते तर, ही जिवापाड दगदग त्यांना सहन झाली असती काय ?
असो. भाऊंची आरती ओवाळावयाची नाही मला. तसे ते मोठे नाहीत, असले तरी मला मानवले असतेच कशावरून ? कार्लाईल ह्यांनी विभूतिपूजेचे देव्हारे माजविले, तसे ब्राह्मसमाज करणार नाही. निदान करू नयेच. जगाला मोक्ष सामान्यजनांच्या दगदगीमुळेच मिळेल—मिळालाच तर विभूतीच्या कृपेने नव्हे. त्यासाठी तळमळणारे भाऊ एक सामान्य माणूस आहेत. म्हणून गुणांप्रमाणेच त्यांच्यात दोषही अवश्य असणार. ते त्यांचे त्यांना माहीत. त्यांच्यात काय कमी आहे, ते पाहिल्यासही त्यांच्या महत्त्वास बाधा येत नाही.
भाऊ एकलकोंडे, एककल्ली, एकमार्गी आहेत. ते पुष्कळांच्या उपयोगी पडतील, पण जिव्हाळ्याचा स्नेही त्यांना एकच. पुष्कळांचे ते ऐकतील, पण एकनाथाप्रमाणे चोवीस गुरु करणार नाहीत. त्यांनी एकच गुरु केला. भाऊ लढतील, पण वीर बनून शिंगावर धूळ घेणार नाहीत. त्यांचा संप्रदाय मवाळांचा, त्यांचे धोरण तडजोडीचे ! तत्त्व मात्र तीव्र. पण उपाय सैल. भाऊ भित्रे ! मी तसा असतो तर किती बरे झाले असते ! सार्वजनिक कार्याचे वाण घेतल्यावर शरिरांची नसली तरी काही लाडक्या मनाची हिंसा घडतेच ! मग ती कळत असो वा नसो. यज्ञसंस्था अद्यापि बंद झाली नाही. कोणाचा तरी बळी पडतोच. महात्मा गांधीनी कितीतरी बळी घेतले आहेत. बुद्धांनी, ख्रिस्तांनी बळी घेतले. तेथे म. गांधीचा पाडा काय ? आध्यात्मिक मार्गात भाऊ शाकाहारी ठरले ! प्रसंगी ह्यांनी पडही खाल्ली आहे.
काही असो ! भाऊंनी पुष्कळ चहाते मिळविले, नव्हे त्यांना मिळाले. मग त्यांना एकलकोंडे कसे म्हणावे ? त्या चाहत्यांनी हा गौरवग्रंथ प्रसिद्ध केला आहे. पण ह्यात भाऊंचा गौरव नसून, ईश्वराचाच आहे. ह्या प्रसिद्धीचे बहुतेक श्रेय माझे दुसरे मित्र श्री. बी. बी. केसकरांनाच आहे. हा पडदानशीन कर्मयोग केसकरांनी भाऊपासूनच घेतला, आणि त्यांच्याशी एक होऊन आमच्या समाजाची साहित्यसेवा केली. ह्या ग्रंथातील बहुतेक लेख पत्रिकेत येऊन गेले आहेतच. श्री. वैद्यांच्या लेखणीची एक खूण मला पटली, ती ही की, तिचे टोक ज्याच्यासंबंधी लेख लिहावयाचा, त्यांच्या उलट कधीही रोखले गेले नसून, लेखकाने आपल्याकडेच रोखलेले पुष्कळदां दिसते. हिला म्हणतात सहानुभूती उर्फ मैत्री (Charity). ईश्वराच्या भीतीमुळे ही मैत्री भक्ताच्या अंगी जडते. एरवी परोपदेशपांडित्य बोकाळते. सहानुभूती हा गुण ईश्वरी देणगी नव्हे. तो कसून कमवावयाचा असतो. वाटेवर पडलेला आढळणार नाही. हीच ब्रह्मज्ञानाची खूण. ही लेकराची गोष्ट नव्हे. पोटी अनुताप असल्याशिवाय ही खूण जड लेखणीतून उतरणार नाही. उतरल्यास ती घोर प्रतारणाच म्हणावयाची !
भाऊंना मी ह्या लेखात प्रार्थनासमाजाचा नमुना म्हटले ते त्यांनी प्रार्थनासमाजाचा नमुना घेतला आणि समाजाला आपल्या चारित्र्याचा नमुनाही घालून दिला, ह्या दोन्हीं अर्थांनी खरे कसे आहे, हे वरील लेखाने ओझरते जरी दिसले, तरी माझे काम होईल. प्रार्थनासमाज ही सेवक संस्था आहे, म्हणून ती अप्रसिद्ध किंबहुना अयशस्वी ठरली तरी तिला खंती वाटण्याचे कारण नाही. मग श्री. वैद्यांना ते कारण कोठून उरणार ? प्रार्थनासमाजात विद्या म्हणजे विज्ञान आहे, पण, त्या प्रमाणात विनोद नाही. तळमळ आहे, शांती नाही. शोध—उच्च प्रकारचा अंतःशोध—आहे, पण साक्षात्कार नाही, म्हणून तर त्यासाठी आमची प्रार्थना चालू आहे. धर्ममार्गात प्रार्थनासमाज ही अगदी कोवळी आणि अलीकडची संस्था असून एकाद्या जरठेप्रमाणे तिच्यात सोवळेपणाचा दोष क्वचित डोकावतो. पण आमच्या भाऊसारखे काही सभासद आहेत, त्यांनी खबरदारी घ्यावी, म्हणजे आशेला जागा राहील. प्रार्थनासमाजाची शक्ती आणि आटोप सर्व संग्राहक नाही. राजकारणात बाजू चढती नसून पडती, समाजसुधारणेत चालती नसून बोलती, लोकसेवेत राबती नसून बैठी, अशा आमच्या मर्यादा आहेत. प्रत्यक्ष धर्माचरणात आमच्या तितिक्षेपेक्षा प्रतीक्षाच फार, त्यागाहून भोगाकडे जास्त प्रवृत्ती, ईश्वरापेक्षा जगाकडेच अधिक लय ! मग तो जगाच्या हिताचेच दृष्टीने का असेना ! अशी आमची ओढाताण चाललेली असते. आमच्या प्रतिपक्षाला हा आमचा कबुलीजबाब ऐकून आनंद वाटला तर वाटो ! मात्र हे सर्व कठोर आत्मनिवेदन प्रस्तुत ग्रंथात भरलेले वाचकांना आढळो, म्हणजे श्री. वैद्य, केसकर आणि त्यांच्या साहाय्यका-यांना ह्या ओढाताणीचे काळात किंचित हायसे वाटले !
नाचत नाचत जाऊ त्याच्या गावा सुख देईल विसावा रे ।
पुढे गेले ते निघाय झाले । वानतील त्यांची सीमा रे ।।
ह्या परिचयाच्या वरील पहिल्या भागात मी केवळ माझ्या अंतःकरणावरील ठशांचे शब्दचित्र दिले आहे. आता ह्या दुस-या भागात ह्या पुढील ग्रंथासंबंधी माझी आवड-नावड कशी काय आहे हे मी जाहीर करणार आहे. हा अभिप्राय नव्हे, टीका तर नव्हेच नव्हे ! माझ्या पुढील रस मी नुसता जाहीरपणे चाखीत आहे. कोणाला काय परिचय होईल, तो ज्याचा त्याने पाहावा. मी त्याबद्दल जबाबदार नाही.
प्रथम मी बहिरंग पाहून घेतो. ग्रंथ वाजवीपेक्षा जास्त विस्तृत झाला आहे. तरी संपादक म्हणतात— ’२१ प्रकरणांपैकी ६ च घेतली. बाकीची अजीबात गाळली.’ ही मोठी कृपा ! दिवस कोण काबाडकष्टाचे येत आहेत ! आणि ग्रंथ पहावेत तर असे बोजड. तरी संपादकाने नाउमेद होऊ नये. उरलेला भाग लहानलहान ताटल्यांतून हात राखून व भूक पाहून वाढावा. अलिकडे उपदेशवाङ्मय जगाला नकोसे झाले आहे. वक्ते फार, श्रोते कमी. स्वतःचा उपदेश आम्हांला ऐकू येईना, तेथे दुस-याची काय पिरपीर, असे लोक उघड म्हणू लागले आहेत. ग्रंथ विस्तृत झाला म्हणजे त्यात वाच्य फार, व्यंग कमी असा प्रकार होतो. म्हणूनच लोक लघुकथा व भावगीते मागू लागले. असो, संपादकाचे म्हणणे असे कोठे आहे की हा ग्रंथ बसल्या बैठकीला वाचून टाकावा ! लेखकांच्या आयुष्यातले हे विचार वाचकांनीही आयुष्यभर वाचावे. देव करो, आणि हा ग्रंथ कोणाच्या तरी वशिल्याने मुंबई विद्यालयाच्या एकाद्या परीक्षेला नेमला न जावो ! नाहीतर ६४० पाने पाठ करून पहिल्या वर्गात पास झालेले विद्यार्थी पीठाकडे पाठ वळवतील आणि प्रार्थनासमाजात पाऊलही टाकणार नाहीत !
लेखक हे एका मोठ्या गुरूचे पट्टशिष्य आहेत. भाषेचा संस्कार, विचाराचे गांभीर्य, ध्येयाचे पावित्र्य आणि शोधाची आंतरिकता वगैरे गुरूच्या लहानमोठ्या गुणांच्या खाणाखुणा शिष्याच्या ह्या ग्रंथातील पानापानांवर, ओळीओळीतूनही आढळतात. लेखकाने ह्यात गुरूचे म्हणून जे उतारे दिले आहेत, ते दिले नसते आणि संपादकाने लेखकाचे नाव गाळले असते तर, भांडारकरांच्या धर्मपर व्याख्यानाची ही एक सुधारून वाढविलेली नवी आवृत्तीच आहे असा वाचकांना भास झाला असता. ह्या गुरुशिष्यांनी तुकारामाला तर अगदी सळो का पळो करून सोडले आहे. तुकाराम जिवंत असता, तर तो पुनः काही सजीव स्वर्गाला गेला नसता !
नाव पहा ! संसार व धर्मसाधन ! ही संपादकाची करामत दिसते ! ग्रंथ काही एका बैठकीला झाला नाही. अगोदर सामग्रीच भंडावून सोडण्याइतकी अवाढव्य. ती ४० वर्षांच्या आत्मिक अनुभवातून निघालेली. तिला अशी सहा प्रकरणांच्या साच्यात बसवून वर ह्या सार्थ नावाने कसा बेमालूम एकसूत्रीपणा संपादकाने आणला आहे, ही कलाकुसरी मला बाह्यांगावरून अंतरंगात ओढीत आहे. संसार व धर्मसाधन ह्यात ‘व’ हे उभयान्वयी अव्यय कशाला घुसडले ? मी म्हणतो, संसारच धर्मसाधन आहे. दुसरे काय धर्मसाधन असू शकणार ? ब्रह्मांडात दुसरीकडे काय खटाटोप चालला आहे, तो आमच्या डोळ्यांना दिसेपर्यंत तरी मी हेच म्हणत राहाणार. मीच काय म्हणतो ! ह्या ग्रंथातूनच हा मंजूळ ध्वनी उमटत आहे. संसार व धर्मसाधन हा द्वंद्वसमास थोडाच आहे ? हा आहे ठाईचा तत्पुरुष समास ! ह्यातला पुरुष व्याकरणातला नसून परमार्थातला आहे. संसार हेच धर्मसाधन. संसारातला धर्मसाधनाचा भाग वेगळा केला—हे शक्य असेल तर ना—तर उरलेला भाग म्हणजे नरकयातना. असा झरतृष्ट्रांचा द्वैतसिद्धांत आहे. पण ब्राह्मसमाज असा द्वैतवादी नाही. संसार म्हणून एक आजार आहे, त्यावर तोडगा धर्मसाधन आहे, असा द्वैतवाद कदाचित ख्रिस्त्यांचा असेल, ख्रिस्ताचा नव्हता. निदान ब्राह्मसमाजाचा तरी नाही.
धर्मसाधन म्हणजे काय ? पोथी वाचणे, प्रार्थना करणे, स्तब्ध बसणे, तप करणे, म्हणजेच धर्मसाधन काय ? मुळीच नव्हे. ब्राह्मसमाज म्हणतो प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. एकादा प्रामाणिक सुतार, हुशार न्हावी, विशेषतः प्रेमळ भंगीदेखील एकाद्या पोटभरू पुरोहितापेक्षा शतपटीने धार्मिक म्हणता येणार नाही काय ? असे जर आहे तर संसार म्हणजेच धर्मसाधन ठरते.
असो ! आता मी अंतरंगातच बुडी घेतो. मला मधले तिसरे प्रकरण प्रार्थनासमाजाचे ध्येय हे फार आवडले. ते २५८ पानापासून ४३१ पानापर्यंत पसरले आहे. ३२७ पानापासून ४३१ पानापर्यंत ‘प्रार्थनासमाजाचे कार्य’ असे चौथे प्रकरण निराळे केले असते तर ह्या गोड प्रकरणाला असा अवजडपणा आला नसता. कोणतेही ध्येय दूरच असणार. जवळ जवळ अदृश्यच असणार. ते निर्मळ मनाच्या आरशातच (आदर्शातच) दिसणार. बाह्य व्यवहारात ते पाहणेच व्यर्थ. प्रार्थना किंवा ख-या नावानेच उल्लेख करणे झाल्यास, ब्राह्मसमाजाचे ध्येय अद्यापि गणना करण्याइतक्या ब्राह्मांना तरी नुसते कळले आहे की नाही ह्याची जेथे शंका, तेथे ते साध्य कितपत झाले आहे ह्याची चर्चा करणे, हा मृगजळ पाठलाग होय ! ह्या ग्रंथाच्या ३०५ पानावर रा. वैद्यांनी बंगाल्यातील* ब्राह्मसमाजाच्या सभासदांच्या काही नैमित्तिक अनुष्ठानासंबंधी आपला स्पष्ट अभिप्राय दिला आहे. न जाणो, तेव्हापासून वैद्यांचे मन बंगाल्याविषयी उलट खाऊन आपल्या इकडील काही जणांच्या अर्थवादाला बळी पडू लागले, अशी कोणास शंका येईल, पण खरा प्रकार तसा नसावा. ह्याच दृषिने ह्या परिचयाच्या वरील पहिल्या भागात आकुंचित अनुष्ठान व बृहदनुष्ठान असा मी कृत्रिम भेद केला आहे. आणि ह्या दोन्ही अनुष्ठानांत ह्या ग्रंथकर्त्याचा नंबर पहिला ठरवला आहे. पण आमच्या काही—सर्व नव्हे—वृद्ध पुढा-यांना ही दोन्ही अनुष्ठाने लाभली नाहीत. हातचे गेले आणि पळते ते पळालेच, अशी ह्या पुढा-यांची फसगत झाल्याने आज त्यांची मुले, नातवंडे प्रार्थनासमाजाला अगदी पारखी झाली आहेत. त्यामुळे बंगाल्यातील नैमित्तिक अनुष्ठानाला नाव ठेवण्याइतकेही भाग्य, आम्हांला इकडील प्रार्थनासमाजाच्या कौटुंबिक अवस्थेत उरले नाही. ते कसेही असो, ह्या तिस-या प्रकरणाचे शेवटी पान ४२३ पासून ४३१ अखेर जो गुरु-शिष्यसंवाद कर्त्याने रचला आहे, तो (* रा. वैद्यांची ही बंगालची भेट सन १९११ मध्ये झाली. –सं.) बहारीचा वठला आहे. ते एक लहानसे ध्वनिकाव्यच झाले आहे. ह्यात शिष्याने गुरूवरही ताण केली. ह्यात नावीन्य आहे, स्वारस्य आहे, निष्ठा आहे, सर्वस्व आहे. म्हणून ह्या संवादातला शिष्यच आज गुरु झाला आहे, असा भास होतो. चौथे प्रकरण सुखदुःखाविषयीचे वाचीत असता प्रथमप्रथम मला ते किचकट वाटले. ह्यात लेखक धर्माच्या प्रदेशातून तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात शिरले आहेत. पण सिद्धांत असा काही निष्पन्न झाला नाही. संसारातील सुखदुःखाचा त्रास हा मुळी प्रमेयाचा विषयच नव्हे. हा प्रश्न समष्टीने सुटावयाचा नाही. प्रत्येक व्यक्तीने ह्या अनुभवाच्या दिव्यातून निर्वाणाकडे जावे, असा ईश्वरी संकेत दिसतो. ‘Problem of Evil’, ‘Freedom of Will’ वगैरे कोडी आहेत. ह्यांच्या नादी लागून सबंध पाश्चात्य तत्त्वज्ञान फोल ठरत आहे. तेथे रा. वैद्यांची गती खुंटली ह्यात काय नवल ? तथापि नुसत्या धर्माच्या दृष्टीने पाहू लागले असता शेवटी शेवटी हे प्रकरणही गोड झाले आहे. अखेरीस पान ४९१ पासून ४९९ पर्यंत, ज्या सहा गोष्टी सांगितल्या आहेत, त्या हृदयस्पर्शी आहेत. साधकाने त्या वरचेवर आपल्या अनुभवात ताडून पाहून मार्ग क्रमावयाचा आहे.
‘थोरांचा परिचय’ हे प्रकरण आगंतुक आणि अपूर्ण भासते. पण हे बहुतेक मृत्युलेख असल्यामुळे असे झाले आहे. तथापि, ह्या प्रकरणात ब्रह्मानंद केशवचंद्र सेन, विरक्त विजयकृष्ण गोस्वामी अशांचा अवश्य समावेश व्हावयास पाहिजे होता. काऊंट टॉलस्टॉय, रूडॉल्फ आयकेन अशा दूरच्यांची आठवण होऊन ह्या श्राद्धविधीत अगदी जवळच्यांचाच विसर कसा पडला ! प्रार्थनासमाजाच्या इतिहासात आमच्या भाऊंनी असेच एक प्रकरण जोडले आहे. त्याचवेळी मी एक आक्षेप घेतला होता की, त्यात स्त्रियांची चरित्रे नाहीत. ह्या प्रकरणात रमाबाई रानड्याप्रमाणे उमाबाई केळकर ह्यांची तरी निदान आठवण झाली असती तर बरे झाले असते !
‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ ही तुकारामाची महत्त्वाकांक्षा ब्राह्मसमाजाने पुरी करण्याचा हव्यास घेतला आहे आणि अखिल संसार हे आमचे धर्मसाधन, असे आम्ही म्हणतो. पण, स्त्रियांचा आमच्या कार्यात अभाव हे विसंगत दिसत नाही काय ? इतर चळवळीप्रमाणे ब्राह्मसमाजही पुरुषी चळवळच आहे, असे कोणी म्हटल्यास त्यास आम्ही कसे तोंड देणार ! तिसरा प्रहर झाला आहे, घरातील चूल निवाली आहे, मूल निजले आहे, एकाद्या शिवालयात पुराण चालले आहे, सांगणारा डुलक्या खात आहे आणि ऐकणा-या वाती वळत आहेत, असा प्रकार हिंदुधर्मात रोजचा दिसतो. ब्राह्मसमाजातही ह्यापेक्षा विशेष काय दिसते ! उंच व्यासपीठावर कोणीतरी आळीपाळीने बसलेला असतो ! त्याच्याभोवती थोडीबहुत माणसे ऐकत असतात ! हिंदुधर्मात जो प्रकार रोजचा, तो ब्राह्मसमाजात आठवड्याचा ! हिंदुधर्मात ऐकणा-या बायकांची बहुसंख्या तर ब्राह्मसमाजात पुरुषांची ! किंबहुना बायकांना चूल व मूल ह्यांमुळे यावयाला फावतच नाही ! असा प्रकार असल्यामुळे थोरांच्या परिचयात बायका बेपत्ता झाल्या तर काय नवल ! अवघाचि संसार अशाने सुखाचा होईल काय ? म्हणून आम्हांला पुनः प्रार्थना करावयाची आहे. दुसरा तरणोपाय काय ?
ग्रंथाच्या शेवटी ज्या २२ प्रार्थना दिल्या आहेत, त्याविषयीही संपादकाचा मी मोठा ऋणी आहे. निराशेत हाच आधार. जागृतीला हाच उपाय. हा ग्रंथ एक कमान आहे असे कल्पिले तर तिच्या शिरोभागी जो कळाशीचा दगड असतो तो ह्या प्रार्थना होत. हा प्रार्थनेचा भाग जर निखळून काढला तर ग्रंथाची सारी इमारत ढासळून जाईल. प्रार्थना म्हणजे नुसती कळसाची शोभा नव्हे, तर पायाची बळकटी आणि तसेच प्रत्येक दगडादगडामधील सिमेंटही होय. म्हणूनच न्या. रानडे म्हणतात की आधी, मध्ये आणि अंती आम्ही प्रार्थना करावी, ते खरे.
ह्या प्रार्थनांतील लीनपणा, अंतःशोध, शरणागती ही लक्षणे, ज्या थोड्या थोरांचा परिचय म्हणून भाऊंनी आपल्या इतिहासात आणि ह्या उपदेशग्रंथात नमूद केला आहे, त्या थोर पुरुषांत काही सुप्रसिद्ध आहेत, दामोदरदास सुखडवाला, रामभाऊ माडगावकर ह्यांसारखे काही असावे तितके प्रसिद्ध नाहीत, आणि भिकोबादादा चव्हाणसारखे कधी प्रसिद्धही होणार नाहीत. पण प्रसिद्धी ही केवळ उपाधी आहे. वरील तीनही लक्षणे ह्या सर्वांतून सारखीच शोभत आहेत.
प्रेमसमाजाचे प्रमुख प्रवर्तक श्री. नामदेव महाराज ह्यांचे पुढे प्रसिद्ध भरतवाक्य आठवून मी माझा हा परिचय पुरा करतो.
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ।।१।।
कल्पनेची बाधा न हो कदाकाळी । ही संत मंडळी सुखी असो ।।२।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विष्णुदासा भाविकांसी ।।३।।
नामा म्हणे तया असावे कल्याण । ज्या मुखी निघान पांडूरंग ।।४।।