प्रेमाचा विकास
(सोशल सर्व्हिस लीगच्या तर्फे शिंदे ह्यांचे प्रेमासंबंधाने व्याख्यान).
प्रथम प्रेम म्हणजे काय? प्रेमाच्या कल्पनेचा ख्रिस्ती. धर्मात चांगला विकास पहावयास सापडतो. आपल्याकडेही प्रेमाची कल्पना आहे परंतु तिची उत्क्रांती चागंली झालेली नाही. निदान त्या उत्क्रांतीचा इतिहास तरी उपलब्ध नाही. केव्हा केव्हा आमची प्रेमाची कल्पना ‘अवघे देखे जन ब्रह्मरूप’ ह्या उच्च कोटीला पोहोचते. परंतु ह्या भावनेचा आपलेकडे व्यवस्थित विकास झालेला दिसत नाही. तेव्हा आपण ख्रिस्ती धर्मातील ह्या कल्पनेचा विकास पाहू.
प्रथम पाचव्या शतकातील सेंट ऑगस्तीन ह्यांच्या प्रेमात वैराग्य कडकडीत दिसते. ईश्वरात पूर्म लय व्हावा म्हणून बाह्य जगताविषयी वैराग्य. यानंतरच्या सेंट बनार्ड ह्यांच्या प्रेमात वैराग्य नव्हते असे नाही. परंतु लोकांवरील प्रेम त्यात अधिक स्पष्टपणे दिसून येत होते. सेंट फ्राँसिस ह्यांनी दु:खरूपी लोखंडाला सुखरूपी सुवर्ण केले. गरिबात जाऊन गरीब व्हावे. दीनात दीन बनावे व पाण्यात जाऊन त्यांनी पाप का केले हे पहावे. अशी त्यांची वृत्ती होती. ह्या तिन्ही पाय-यांपेक्षा पूर्ण विकास सांप्रतचे मुक्ती फौजेचे उत्पादक जनरल बुथ ह्यांचे ठायी दिसून येतो. त्यांचे अंगावर तुम्हास फाटक्या छाट्या दिसावयाच्या नाहीत, काही नाही. थोडक्यात वैराग्याचे बाह्य चिन्ह काहीच दिसावयाचे नाही. त्यांच्यामध्ये तुम्हाला अखंड धडपड, चळवळ प्रवृत्ती दिसून येईल.
सारांश प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे, प्रेम म्हणजे प्रवृत्ती, निवृत्ती नव्हे, प्रेम म्हणजे जीवनाचा कंटाळा नव्हे. सेंट ऑगस्तीन मध्य प्रेमाच्या भावनेचा उदभव दिसतो. जनरल बुथ ह्यांचे ठायी तिचा पूर्ण विकास दिसतो. वैराग्याऐवजी जीवनाच्या कंटाळ्याऐवजी तुका म्हणे गर्भवासी|सुखे घालावे आम्हासी’ असे वाटले पाहिजे. प्रेमाच्या भावनेचा, मैत्रीच्या भावनेचा पूर्ण विकास आपल्याकडे बुद्ध भगवानाचे ठायी झालेला दिसून येतो. त्यांनी जे मैत्रीचे जीवन स्वीकारले ते असे की, ते पाहूनच लोकांनी बुद्धधर्मी व्हावे. प्रेम ही मनोवृत्ती स्वयंभू अहेतुक आहे. प्रेम ही कामना आहे. आत्म्याचे प्रसरण आहे. निष्काम प्रेम हा शब्दच मला कळत नाही. माझे मगजात शिरत नाही. आपण प्रेम करतो ते आपण सुखी व्हावे म्हणून नव्हे, जग सुखी व्हावे म्हणूनही नाही, ते स्वयंभू आहे. निर्हेतुक आहे. मातीच्या देहामध्ये प्रेमाची लहर, आत्म्याची स्वतंत्रता त्याचे अस्तित्व दाखवितो. वर्गसन आपल्या या ग्रंथात मेमरी, स्मरणशक्तीवरून आत्म्याची उपपत्ती लावतात. प्रेमावरूनही आत्म्याची उपपत्ती लावता येईल. प्रेम हे मातीचे कार्य नव्हे. जड जग, मृण्मय जग ह्याचे उत्क्रमण, विकसित स्वरूप हे नव्हे. प्रेमाचा तरंग, लाट पाहिल्याबरोबर दुस-याच जगाचा प्रत्यय वाटतो. त्याचेच हे स्वरूप.
अशा ह्या प्रेमास प्रयत्नाची व सातत्याची जोड मिळाली म्हणजे सेवा झाली व समुदायाने, संघटनेने ती अंमलात आणण्यास सुरूवात केली म्हणजे ती समाजसेवा झाली. आपल्या समाजसेवेत तरी सर्व मूलतत्वे आहेत की एखादे कमी अथवा कमजोर आहे ह्याचे नेहमी निरीक्षण ठेवले पाहिजे. उणीव दिसली की ती लगेच भरून काढली पाहिजे.