प्रेमप्रकाश
पुत्र वित्त वारागृहादि सकळ| देऊनि दयाळ वाट पाहे||
देवाचे मनांत मज हे ध्यातील| अंती पावतील निजपद||
सोडूनि दवासि गुंतले दोरासी| झाले अविश्वासी विश्वंभरी||
तुका म्हणे फार भुलूनिया मेले| विरळा लागले हरिपायी||
ह्या अभंगातील उक्ती विचार करण्यासारखी आहे. देवाने पुत्र, वित्त, दारा देऊन गृह निर्माण केले व त्या घरामध्ये अशी एक प्रेमाची ज्योत उत्पन्न केली की त्या ज्योतीच्या प्रकाशामुळे कुटुंबातील माणसे एकमेकांस स्पष्ट दिसतात, आपणांस नेत्र आहेत पण बाहेरच्या व आतल्या गोष्टींचे संनिकर्ष करणारा प्रकाश नसता तर त्या नेत्राचा काहीएक उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे धैर्य, सहनशीलता वगैरे प्रेमाची अधिष्ठाने असूनही प्रेमाचा प्रकाश पडला नाही तर त्याचा काहीएक उपयोग होणार नाही, म्हणजे जड सृष्टीमध्ये प्रकाश हे कार्य करतो. ह्या प्रेमप्रकाशातूनच पुत्र, पती, पत्नी, बंधू, भगिनी, माता, पिता ही सर्व संबंधाच्या योगे एकत्र झालेली माणसे परस्परांस स्पष्ट दिसतात. बाह्य सृष्टीतील प्रकाशामुळे पदार्थ जसा स्पष्ट दिसतो, त्याचप्रमाणे डोळ्यांस अंधारी येऊन सूक्ष्म पदार्थही दिसत नाही किंवा तो आहे त्यापेक्षा निराळा दिसतो, त्याचप्रमाणे प्रेम हे डोळ्यांना डोळेपण देणारे आहे तसेच आंधळेपणही देणारे आहे. म्हणजे प्रेमाच्या प्रकाशातून स्वत:च्या संबंधी माणसाचे गुण जेवढे दिसतात, तेवढे अवगुण दिसत नाहीत. माता केवळ बालकाच्या लाघवाने मोहीत स्वकर्तव्यास कधी कधी विसरते. पण साधारणपणे मनुष्याच्या अंगी जाणीवबुद्धी असेल तर स्वयंस्फूर्तीने व स्वयंशक्तीने प्रेमाच्या प्रकाशाच्या साहाय्याने घरातील मंडळीचे गुणावगुण दिसतील म्हणजे मग आपण प्रेमाच्या प्रवाहात सापडून ईश्वराकडे सहजगत्या चाललो आहो हे आढळून येईल. ह्याकरिता एकमेकांविषयी यथार्थ ज्ञान होण्यास प्रेमप्रकाश ही ईश्वराची एक योजना आहे. ह्या योजनेमुळे आपणांस ईश्वराबद्दलचे ज्ञान प्राप्त होते. पण ह्या प्रकाशाचा योग्य उपयोग केला नाही तर देवास विसरून दोरीवर प्रेम बसते. म्हणजे हा प्रेमप्रकाश ज्याने उत्पन्न केला त्यासच आपण ओळखीत नाही. देव हा गारूड्याप्रमाणे आपल्याकडून खेळ करवून शेवटी आपल्या सर्वांना स्वत:कडे खेचतो, ह्यात त्याचा स्वार्थ नसून आपणांस निजपद प्राप्त करून देण्याचा त्याचा हेतू असतो.
ह्याकरिता आपणांस आपला पुढचा मार्ग सुलभ करणे असेल तर आपण आपल्या गृहातील माणसांच्याच गुणावगुणांचे निरीक्षण करावे. मात्र अवगुण काढून टाकण्याची जेव्हा त्यांना संधी प्राप्त झाली तेव्हा ती संधी त्यांनी साधली की नाही ह्याचे योग्य निरीक्षण करावे व त्यापासून आपण धडा घ्यावा म्हणजे आपोआप आपण निजपदास जाऊ. तुकारामांनी अभंगात सांगितल्याप्रमाणे पुत्र, वित्त, घर, दार, आपणास देऊन तो द्याळू परमेश्वर आपण निजपद अंती पावू अशी वाट पहात बसला आहे तर ह्याची पूर्ण गाठ बांधून ज्याने प्रेमप्रकाश निर्माण केला त्या प्रभूला आपण ओळखावे आणि ते घरातील कुटुंबाच्या गुणावगुणांच्या निरीक्षणानेच उत्तम साधले जाईल, शेजा-यावर, देशावर, राष्ट्रावर प्रीती ठेवून ईश्वरास ओळखणे हा निराळा मार्ग, पण सोपा म्हणजे वर सांगितलेलाच होय.