प्रेरणा आणि प्रयत्न
मनुष्य कसाही असो, ज्ञानी असो वा अज्ञानी असो, संपत्तिसुखसागरात पोहणारा असो किंवा पापाने गांजलेला असो, त्याला कोणत्या ना कोणत्या प्रसंगी तरी कमीअधिक प्रमाणाने ईश्वरी प्रेरणा ही होणारच. मानवी मन आणि ईश्वरी प्रेरणा ह्यांचा अपरिहार्य संबंध आहे. किंबहुना ईश्वरी प्रेरणेला पात्र असणे हेच मानवी मनाचे लक्षण असेही म्हणता येईल. ज्यास कधीही दैवी प्रेरणेचा स्पर्श होण्याचा संभव नाही, ते मन पशूचे समजावे. अपवादादाखलही ते मनुष्यामध्ये आढळणार नाही. प्रेरणा ह्या शब्दाचा आजच्या प्रसंगी एवढाच अर्थ घ्यावयाचा आहे की, एकाएकी अकल्पितपणे मनाची सुखमय स्थिती होऊन त्यात आदर्शाचे दर्शन होणे. ह्या दर्शनामुळे नेहमीच एकादा मोठा युगांतर करणारा, (Epoch making) शोध किंवा विचार लाभतो असे नव्हे, किंवा ‘न भूतो न भविष्यति’ असा काही अजब चमत्कार घडतो असेही नव्हे, तर केवळ मनाची अनिर्वचनीय सुखमय स्थिती होऊन त्या वेळी त्यास एकाद्या थोर ध्येयाचा साक्षात्कार होतो. ह्या साक्षात्काराचे एक लक्षण असे आहे की, तो आपल्या कसल्याही प्रयत्नांनी होत नाही व होण्यासारखा नसतो. कठोपनिषदामध्ये म्हटले आहे.
नायमात्मा प्रवचनेन लभ्यो| न मेधया न बहुना श्रुतेन||
यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तैस्यैष आत्मा| विवृणुते तनू स्वाम्||
-कठोपनिषद् ३-२-२२
(हा आत्मा आदर्श केवळ प्रवचनाच्या योगे म्हणजे पुष्कळ सांगितल्याने, किंवा बुद्धीच्या योगे किंवा ऐकण्याने मिळत नाही. ज्यावर त्याची कृपा होईल त्यालाच तो मिळतो. त्यालाच तो आपले स्वरूप उघड करून दाखवितो.)
ह्या ठिकाणी आधुनिक थिऑसॉफिस्ट किंवा सूक्ष्मवादी म्हणतील की, ह्या प्रेरणेला यद्यपि आपला ह्या जन्मातील प्रयत्न कारणीभूत झालेला नसला, तथापि पूर्वजन्मातील प्रयत्न कारणीभूत होत असावा. आणि आधुनिक मानसशास्त्रवेत्ते (Psychologists) सांगतात की, मनाच्या बाह्य आणि ज्ञात व्यापारामुळे ह्या प्रेरणेचा अनुभव घडलेला नाही, असे जरी भासले तथापि काही गूढ अंतर्व्यापारामुळे तरी तो घडत असला पाहिजे. ते व्यापार आपणांस कळत नसले, तरी मुळीच घडत असला पाहिजे. ते व्यापार आपणांस कळत नसले, तरी मुळीच घडत नाहीत असे म्हणता येत नाही. पण ह्या दोहों पक्षांचे म्हणणे काही असो, उपनिषदातील वरील उद्गाराची यथार्थता कमी होत नाही. कारण, ह्या प्रेरणेच्या सुखमय स्थितीस आपला कोणताही तिच्यापूर्वी आपल्याकडून नुकताच झालेला प्रयत्न कारणीभूत होत नाही हे खरेच आहे. पूर्वसंचितामुळे ती होवो, किंवा अंतर्व्यापारामुळे होवो, ती प्रेरणा हल्ली आपल्यास आपोआप प्राप्त झालेली आहे, अशी साक्ष आपले मन आपल्यास देते. जसे काय आपल्यासाठी एकाद्या पिढीत अनामत ठेवलेल्या शिलकेचा वारसा असून, त्यावरील व्याज आपल्यास एकाएकी मिळावे आणि आपली संकटातून मुक्तता व्हावी, किंवा एकादा कार्यारंभ करण्यास मदत व्हावी असाच ह्या प्रेरणेचा प्रकार अनुभवाला येतो. तात्पर्य इतकेच की, आदर्शदर्शन होण्याला आपले प्रयत्न कारण नसून, ते आपल्यास अकस्मात घडते.
पण ही प्रेरणा अथवा आदर्शदर्शन झाले म्हणजे सर्व काही मिळविले असे होत नाही. उलट ह्यानंतर आपल्या ख-या आणि घनघोर प्रयत्नास सुरूवात व्हावयाची असते. कवीला एकाद्या कल्पनेची प्रेरणा झाल्यावर तिचा त्यास सारखा ध्यास लागतो, आणि त्या कल्पनेला शब्दसृष्टीतले मूर्तस्वरूप देण्यास त्याला अविश्रांत श्रम करावे लागतात. केवळ प्रेरणा झाली एवढ्यावरूनच कोणी कवी बनतो असे नाही. प्रतिभा हे काव्याचे सर्वस्व असे जरी आहे, तरी ही प्रतिभा कमीअधिक मानाने सर्वांमध्येच असते. कवीच्या अंत:करणाची सहृदयता आणि त्याला अकस्मात होणारी प्रेरणा हे दोन्हीही गुण मानवी मनास सामान्य आहेत. पण ज्या व्यक्तीमध्ये ह्या गुणांशिवाय झालेल्या प्रेरणेत शब्दाचे सुंदर आणि कायमचे स्वरूप देण्याची अलौकिक शक्ती असते, तीच व्यक्ती प्रचारात आम्ही ज्याला कवी म्हणतो त्याच्या पदाला पोहोचते. हे मूर्तस्वरूप देण्याचे काम तडीस नेण्यासाठी कवीला भाषा, व्याकरण, लोकरीती, मनुष्यस्वभाव आणि अभिरूची इत्यादी अनेक गोष्टींशी सतत झगडावे लागते. मूर्तिकाराचेही असेच आहे. प्रख्यात इटालियन मूर्ती करणारा मायकेल आजेलो ह्याने मनुष्याच्या आकृतीएवढी मोझेसची हुबेहूब मूर्ती केलेली रोम शहरामध्ये ठेविलेली आहे. ती घडविण्याचे कामी त्याला चाळीस वर्षे लागली असे सांगतात. इतक्या काळानंतर ज्या घाटाची अलौकिक मूर्ती घडविण्याचे श्रेय त्याला शेवटी मिळाले, तिची हुबेहूब छाया प्रेरणेच्या रूपाने त्याला चाळीस वर्षांच्या आरंभीच दिसली असावी. ज्याप्रमाणे एकाद्या आधीच घडलेल्या मूर्तीवर चिखलाचा जाड आणि कठीण थर सांचलेला असावा आणि तो खरडून काढून आतील मूर्ती उघडकीस आणीत असतात. हाच प्रकार चिता-याचा आणि हाच प्रकार संसारात पुरूषार्थ साधणा-या प्रत्येक पुरूषाचा. ज्याप्रमाणे कवी धिमेपणाने हळूहळू पदरचना करतो, मूर्तिकार टाकीचे घाव मारतो, चित्रकार कलमाचे फटकारे ओढतो, त्याचप्रमाणे संसारपटावर पुरूषार्थसाधकही हळूहळू आपल्या ध्येयाकडे मार्ग क्रमीत असताना प्रयत्नश: पावले टाकितो.
प्रेरणा होत असताना मोठे सुख होते, पण प्रयत्न करीत असताना घोर यातना होत असतात. प्रेरणेचा काळ मध्यरात्रीसारखा मनास मोहून टाकणारा, तेव्हा कोणत्याही रंगास जिल्हई येते; न्यूने दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. प्रेरणेस कालावधी न लागल्यामुळे श्रमाची तर गोष्टच काढावयास नको. पण प्रयत्नाचे तसे नाही. ह्यावेळी मध्यान्हाचा प्रखर उजेड पडून सर्व रंग निस्तेज झालेले असतात, न्यूने उघडी होतात, पावलोपावली विलंब लागून मार्गप्रतीक्षा करावी लागते, अनिश्चय, निराशा, प्रलोभन, प्रमाद ह्यांच्या प्रखर तापातून अडखळत जावे लागते. पुष्कळदा साधक रंजीस येऊन हात टेकितो, माघारही घेतो. अशा वेळी त्याला पूर्वी झालेल्या आदर्श दर्शनाची पुन:पुन्हा आठवण करावी लागते.
ह्यावरून उपनिषदात सांगितलेला आत्मा आपल्या इच्छेने ज्याच्याकडे येतो, त्याचे तेवढ्यावरूनच चांगले होते असे नाही. तुकाराम म्हणतात:
देवाची ते खूण, आली ज्याच्या घरा| त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा||
देवाची ते खूण, करावे वाटोळे| आपणा वेगळे कोणी नाही||
देवाची ते खूण, तोडी मायाजाळ| आणि हे सकळ जग हरी||
पहा देवे तेचि बळकाविले स्थळ|| तुक्यापे सकळ चिन्हे त्याची||
असाच उद्गार येशू ख्रिस्तानेही काढला आहे. “मी पृथ्वीवर आग पाखडण्यासाठी आलो आहे. मी शांती देण्यास आलो आहे असे तुम्हांस वाटते काय? मी सांगतो ‘नाही’ पण दुही माजविण्यास आलो आहे. कारण आतापासून ज्या घरात पाच असतील त्यांपैकी दोन तिहींच्या विरूद्ध होतील आणि तीन दोहींच्या विरूद्ध होतील, मुलगा बापाच्या आणि बाप मुलाच्या उलट होईल. मायलेकीचे पटणार नाही. सासू सुनेचे भांडण लागेल” (लूकसने केलेले शुभ वर्तमान भाग १२, श्लोक ४९-५३). आदर्शाचे एकदा दर्शन झाले म्हणजे ते पिशाच्चाप्रमाणे कसे माणसाच्या मागे लागून त्यास भ्रमविते, ह्याचे उत्तम वर्णन श्रीएकनाथांनी पुढील अभंगात केले आहे.
भूत जबर मोठे ग बाई| झाली झडपण करू गत काई||
सूप चाटूचे केले देवऋषी| या भूताने धरिली केशीं||
लिंब नारळ कोंबडा उतारा| त्या भूताने धरिला थारा||
भूत लागले त्या नारदाला| साठ पोरे झाली त्याला||
भूत लागले ध्रुव बाळाला| उभा अरण्यात ठेला||
एकाजनार्दनी भूत| सर्वठायी सदोदित||
ह्यावरून आदर्शदर्शन झाल्यावर जे सतत प्रयत्न करावयास लागतात त्यासच ते दर्शन किंवा प्रेरणा झाली म्हणावयाची, इतरांस नाही. एरवी काही लोक म्हणत असतात की आम्ही प्रेरणावादी आहो, आम्हांला प्रयत्न करण्याची काही जरूरी नाही. जसे काय प्रयत्नाचा आणि प्रेरणेचा काही संबंध नाही. पण वरील उदाहरणावरून प्रेरणा ही ख-या प्रयत्नास कारण आणि आरंभ आहे असे दिसून येते. आपले हे १०० किंवा ६० वर्षांचे आयुष्य म्हणजे आपल्यास मिळालेली एक संधीच होय. आयुष्याची बाळपणरूपी प्रस्तावना संपल्यावर केव्हा ना केव्हा तरी तरूणास आदर्शाचे दर्शन होतेच. हे झाल्यावर त्याच्यापुढे जे त्याचे भावी आयुष्य असते ते एकाद्या मूर्तिकारापुढे ठेविलेल्या संगमरवरी शिळेप्रमाणेच आहे. मायकेल आंजेलोने ४० वर्षांत ज्याप्रमाणे मोझेसचा पुतळा कोरिला, त्याप्रमाणे संसारातील प्रत्येक साधकास आपल्या पुढील कमी अधिक ४० वर्षांच्या आयुष्यातून आपल्या आदर्शानुरूप स्वचरित्राचा पुतळा कोरावयाचा असतो. कारखान्यामध्ये मुले शिकत असता कारखानदार त्यांना ज्याप्रमाणे लाकूड, धोंडा, धातू इत्यादी सामग्री पुरवितात आणि पुष्कळ वेळां विद्यार्थी ज्याप्रमाणे ह्या सामग्रीचे काहीच न बनविता तिची केवळ नासधूस करितात, त्याप्रमाणे आयुष्यरूपी बहुमोल धातूची नासधूस सर्वत्र चाललेली दिसते. तथापि ह्याच संसारशाळेतून ब-याच विद्यार्थ्यांनी बाहेर पडण्यापूर्वी आपणास दिलेल्या सामग्रीच्या आपल्या दर्शनानुरूप काही तर मूर्ती मागे करून ठेविलेल्या आढलतातच.